म्हाळुंगे घाटवाट
भीमाशंकर म्हाळुगे घाटवाट
ता : खेड ,
जि : पुणे
मार्ग : पुणे - नाशिक फाटा - खेड - मंचर - भीमाशंकर-कोंढावळे-गवांडे वस्ती.
भीमाशंकरचे महत्त्व
कुंभकर्णाच्या मुलाचा वध करून भगवान शिव शंकर भीमाशंकर या ठिकाणी स्थापित झाले , अशी आख्यायिका आहे . पुण्यापासून साधारणत : १२५ किमी अंतरावर हे ठिकाण आहे .
भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे . भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र स.स.पासून ३५०० फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे.भीमाशंकर मंदिर १२०० वर्षांपूर्वीचे असून हे हेमाडपंथी बांधणीचे आहे.
हा ट्रेक करण्यासाठी आम्ही १२ ऑक्टोबर २०१४ रोजी पुण्याहून खाजगी वाहनाने प्रवासास सुरुवात केली.
पुणे-खेड-मंचर-या मार्गाने भीमाशंकर येथे पोहचलो.
देव दर्शन करून येथूनच पुढे असलेल्या कोंढावळे गावाच्या पुढे असलेल्या गवांडे वस्ती येथे खाजगी वाहनाने प्रवास करुन पोहचलो.
भीमाशंकर - कोंढावळे - गवंडे हे जवळपास आठ किलोमीटर अंतर आहे.
या गावातूनच स्थानिक वाटाड्याला बरोबर घेऊन ट्रेकला सुरुवात केली.
सुरुवातीला थोडे पठार , मग चढण , परत उतार , परत चढण व परत उतार असा इंग्रजीतील W आकाराचा हा ट्रेक आहे.
निसर्गाचा मनमुराद आनंद घेत , रमत गमत , गप्पा गोष्टी मारत आम्ही साकुरे वस्ती येथे पोहचलो.
या भागात पाण्याचे खूप अतोनात हाल आहेत, गावकऱ्यांना खूप लांब जाऊन पाणी आणावे लागते.तरीपण आपल्या सारखी भटकी मंडळी येथे आल्यानंतर गावकरी लोक आपली ऊठबस करतात , पाण्याने भरलेले हंडे आपल्यासाठी देतात. स्थानिक लोकांकडे ताक खूप चांगले मिळते.आपण या ठिकाणी आल्यावर, त्यांच्याकडून ताक योग्य मोबदला देऊन विकत घ्यावे, त्यांना थोडा फार हातभार मिळावा हा एकच उद्देश.
येथील पाहुणचार उरकून आम्ही पुढे मार्गस्थ झालो.
काही अंतर पार करून आम्ही पाटण गावाच्या बंधाऱ्यापाशी पोहचलो.
येथून आम्ही पुढे म्हाळुगेकडे निघालो.
आता येथून पुढे म्हाळुगे जवळपास अडीच ते तीन किलोमीटर आहे. रमत - गमत , थकलेल्या शरीराची समजूत काढत म्हाळुगे येथे पोहचलो.
या येथे आमचा जवळपास पाच ते सहा तासांचा आणि एक हजार मीटर उतरण,व एक हजार मीटर परत चढण , व परत तितकीच उतरण व परत तेवढीच चढण अशा प्रकारे W आकाराचा ट्रेक करुन आम्ही म्हाळुगे या गावी येऊन पूर्ण केला.
हा ट्रेक करताना आपण गवांडे वस्ती येथून चालू करतो, त्या वेळी आपले खाजगी वाहन ड्रायव्हरला सांगून म्हाळुगे किंवा नावेद या गावी घेउन जायला सांगावे . परिस्थितीनुसार आपण नावेद किंवा म्हाळुगे या गावी ट्रेकची सांगता करु शकतो.
वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
आज तुझा ब्लॉक वाचून कांती ची आठवण झाली.
ReplyDelete