राम नवमी स्पेशल ट्रेक : खानापूर ते सिंहगड
राम नवमी स्पेशल ट्रेक
खानापूर ते सिंहगड
खानापूर गाव.
ता : हवेली
जि : पुणे.
२५ मार्च २०१८ आज रामनवमी, रम्य पहाटे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे दर्शन घेतले, व हिंगने खुर्द, विठ्ठलवाडी पुणे येथे पी.एम.टी.बस स्टॉप वर सिंहगड ला जाणाऱ्या बस ची वाट पाहत थांबलो.तेवढ्यात आमच्या सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन च्या एक सदस्या धावडे मॅडम या बस स्टॉप वर पोहचल्या. त्यांच्या शी बोलणे झाल्यावर असे समजले की त्यांचा एक ग्रुप खानापूर ते सिंहगड असा ट्रेक करणार आहे.मी माझा सिंहगड ला जाण्याचा बेत रद्द केला व खानापूर च्या बस मधे बसुन खानापूर च्या दिशेने निघालो.
पहाटे ६ वाजता आम्ही खानापूर ला पोहचलो.
त्यांच्या ग्रुप मधील एक- एक सदस्य खानापूर येथे जमा होऊ लागले. मी धरून एकुण ४९ सदस्य जमा झालो.
या ग्रुप मधील दोन ते तिन सदस्य सोडले तर, यातील सर्व जण माझ्यासाठी अपरिचित होते.परंतू मी हाडाचा ट्रेकर असल्याने या ग्रुप बरोबर माझा परिचय व ओळख लगेचच झाली.
सर्वांची ओळख परेड झाली.
ओळख परेड झाल्यावर मला असे समजले की, या ग्रुप चे सर्व सदस्य हे मे महिन्यात हिमालयातील देव तीब्बा च्या बेस कॅम्प ला जाणार आहेत, व त्याचा सराव व्हावा, या उद्देशाने हे सर्व जण खानापूर ते सिंहगड हा ट्रेक करण्यासाठी जमले होते. श्री उपाध्ये सर व कोल्हटकर काका यांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रेक आयोजित केला होता. वय वर्ष ८ ते ७५ या सर्व वयोगटातील तरुण तुर्क.. म्हातारे अर्क... यात सामील झाले होते.
ओळख परेड झाल्यावर पहाटे ६.१५ वाजता आम्ही ट्रेक ला सुरवात केली.
मजल-दर-मजल करित सकाळी ८ वाजता मंदिरापाशी पोहचलो.
येथे थोडी न्याहरी करून पुढे मार्गस्थ झालो.
थोड्याच वेळात एका छोटे खानी असलेल्या देवीचे मंदीर असलेल्या ठिकाणी पोहचलो.या ठिकाणी कातळ दगडातील पाण्याचे टाके व शिव पिंड नजरेस पडली.
येथे मनोभावे दर्शन घेउन पुढे निघालो , येथून पुढे आमची खरी सत्वपरिक्षा सुरु झाली.
अतीशय खढी चढण असलेली वाट सुरु झाली.
आता मात्र पावलांचा वेग मंदावला, एक- एक पाऊल कासवाच्या गतीने पडु लागले. नागमोडी वळणाची खडी चढण असलेला मार्ग पार करीत आम्ही पुढे पुढे जाऊ लागलो.
अंतिम टप्प्यावर असलेल्या मार्गावर दहा ते पंधरा फुटाची कातळ निर्मित दगड-धोंड्याची अवघड वाट पार करून जावे लागले.
सकाळी दहा वाजता आम्ही कलावंतीण बुरुंज (हवा पॉईंट ) येथे पोहचलो.सर्व सदस्यांना त्यांच्या हिमालयातील देव तिब्बा या मोहिमेस शुभेच्छा देऊन व त्यांचे आभार मानुन,जास्त वेळ येथे न थांबता, तसाच पुढे निघालो.
शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन, नंतर गड पायउतार झालो.
११ वाजता मी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकर वाडीत पोहचलो.येथून पी.एम.टी. बस ने प्रवास सुरु करुन हिंगने खुर्द येथे पोहचलो.
अश्या पद्धतीने अचानक धनी-मनी नसताना माझ्यासाठी अपरिचित असलेल्या मार्गाने हा ट्रेक सव्वा पाच तास व १०.७५ किलोमीटर चे पद्भ्रमण करुन पुर्ण झाला.
Comments
Post a Comment