वाघजाई घाटवाट
ठाणाले लेणी ते वाघजाई घाट
ता . सुधागड
जि . रायगड
मार्ग - पुणे - खंडाळा - बोरघाट - पाली - ठाणाळे गाव .
हा ट्रेक करण्यासाठी आम्ही ३१ जुलै २०१६ रोजी पुणे , खंडाळा ( बोरघाट ) उतरून पालीच्या गणपतीचे दर्शन घेऊन व बाजूलाच असलेल्या सरसगडाचे दुरुनच दर्शन घेउन,
पुढे ठाणाळे ( ता . सुधागड , जि . रायगड ) येथे पोहचलो.
ठाणाळे गाव पार करून ,आम्ही मागील जंगलात प्रवेश केला.येथून समोर दिसणाऱ्या डोंगराच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
पावसामुळे समोरच्या डोंगराला अनंत पाझर फुटून सर्व डोंगरच आकर्षक दिसत होता.
तेथूनच वाहत येणारे दोन ओढे ओलांडून उजव्या बाजूचा खडकाळ डोंगर चढायला सुरुवात केली.
तीन तासाची सतत चाल चालून आम्ही ठाणाळे लेणी येथे पोहचलो. किंचित धोकेदायक असणारी छोटी वाट ओलांडून आम्ही लेण्याच्या मोठ्या सभागृहात पोहचलो.
लेणी पाहून येथेच पेटपूजा उरकली. या लेण्यांचा स्वातंत्र्यसंग्रामाशी असलेला संबंध म्हणजे आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे भारतीय क्रांतिकारक होते . त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते . हे इंग्रजांपासून भूमिगत झाल्यावर या लेण्यांमध्ये लपून राहिले होते. आज इतक्या आधुनिक काळात हे ठिकाण इतके निर्जन आणि दुर्गम आहे , तर त्या काळी काय परिस्थिती असेल ! हा नुसता विचार करूनच क्रांतिकारकांच्या त्यागा ची कल्पना करता येईल . त्या काळी तर इथे जंगली श्वापदांचा मुक्त वावर असेल ! मनातूनच त्यांच्या त्यागाचे स्मरण करून , पुढची वाट चालू लागलो.
उजव्या बाजूने लेणीला वळसा घालून लहानमोठे आणखी ३/४ ओढे ओलांडून मागच्या बाजूची वाघजाई घाटवाट चढायला सुरुवात केली.
पूर्वीची ही वाट खूपच प्रचलित होती . शेजारीच सवाष्ण घाट आणि आणखी एक घाट आहे . याच
परिसरात कोराईगड ( आंबवणे - पेठशाहापूर ) , तैलबैला , घनगड , सुधागड असे गड दुर्ग आहेत . भटक्यांसाठी हा परिसर समृद्ध म्हणावा लागेल.
वाघजाई घाट वाट चढून आम्ही वाघजाई मंदिरापाशी पोहचलो.
या येथे पावसाळ्यात मोठा धबधबा वाहत असतो.
दगडात कोरलेली उरलेली वाट चढून आम्ही घाट माथ्यावर पोहचलो.
येथून पुढे मात्र दक्षतेपूर्वक पद्भ्रमण सुरु ठेवले, कारण या ठिकाणी वाट चुकण्याची शक्यता जास्त होती.येथून उजवीकडची वाट पकडून चालत राहिलो.
साधारणतः एक तासभराची पायपीट करून आम्ही तैलबैला गावातील गणपती मंदिरात पोहचलो.
ठाणाळे गावापासून जवळपास सहा तास व १४ किलोमीटरचे पदभ्रमण करून आमचा ट्रेक येथे पूर्ण झाला.
वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
Comments
Post a Comment