वाघजाई दरा

         वाघजाई दरा ते खंडोबा मंदीर 
          कोळेवाडी, जांभुळकर वाडी 

        १ ऑगस्ट २०२० रोजी हिंगने खुर्द, सिंहगड रोड पुणे येथून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघजाई दरा हे ठिकाण आहे.या ठिकाणी जाण्यासाठी मी सुशिल दुधाणे व अतुल हरगुडकर जांभुळवाडी च्या दिशेने निघालो, जाताना स्वामी नारायण मंदीर येथे आमचे मित्र तुषार होले या ठिकाणी आम्हाला भेटणार असल्याने त्यांची  वाट पाहत बसलो.वाघजाई दरा हे ठिकाण माझ्या दुष्टीने अपरिचित असेच होते.तुषार होले यांना या ठिकाणाची माहिती होती.ते आल्यानंतर आम्ही स्वामी नारायण मंदीरा पासुन पुढे दरी पुलाच्या दिशेने  निघालो.दरी पुलाच्या खालच्या बाजुने  जांभुळकर वाडीकडे जाणाऱ्या कॉंक्रिटच्या  रस्त्याने ऊतार उतरुन,


 कोळेवाडी या गावात पोहोचलो.




कोळेवाडी हे गाव स.स.पासुन ७२६ मी.(२३८१ फुट) उंचीवर आहे.




कोळेवाडी गावात टू व्हीलर पार्क करुन येथूनच वाघजाई दरा येथील वाघजाई मंदिराच्या दिशेने पद्भ्रमण सुरु केले.





सुरुवातीलाच एक छोटे शंकराचे मंदीर लागले.मंदिराच्या बाहेर दगडी नंदी आहे, मंदिरात शंकराची पिंड आहे.


 एकंदरीत हे मंदिर पाहता, हे खुप जुने मंदीर असावे अशी दाट शक्यता वाटते, असा माझा अंदाज आहे.मंदिरातील पिंड व नंदी चे दर्शन घेउन पुढे निघालो.

वाट अतिशय मळलेली व प्रशस्त अशी आहे, या मार्गावरुन टू व्हीलर गाडी अगदी आरामात जाऊ शकते.



पाऊण किलोमीटर अंतरावर आपणाला वाघजाई दरा असा बोर्ड लागतो.


या येथे दोन वाटा आहेत, डावीकडची वाट वाघजाई मंदिराकडे जाते, तर उजवीकडची वाट खंडोबा मंदीराकडे जाते.

डावी कडची वाट धरुन आम्ही पुढे निघालो.




येथून पुढची वाट जंगलातून सुरू होते, दोन्ही बाजुला घनदाट जंगल.





कोळेवाडी पासुन साधारणतः दोन किलोमीटर सपाटीची वाट चालून गेल्यावर, येथून पुढे खढी चढण असलेली वाट सुरु होते.





घनदाट जंगलातील वाट असल्याने उन्हाची झळ जाणवत नाही.७० मिटरची खढी चढण पार करुन ४० मिनिटात व २.३५ किलोमीटर चे पद्भ्रमण करुन आम्ही वाघजाई मंदिरापाशी ७९६ मी .( २६११ फुट) पोहचलो.




वाघजाई मंदीर हे खुप प्राचीन आहे, असे स्थानिकांनी आम्हाला सांगितले.येथे देवी मुर्ती रुपात नसुन,एका गोलाकार दगडाच्या लाल शेंदुर लावलेल्या रुपात विराजमान आहे.



देवीचे मनोभावे दर्शन घेतले.येथील स्थानिकांच्या माहितीनुसार असे समजले की या भागाला पुणे खिंड या नावाने सुद्धा ओळखले जाते.व या ठिकाणाची माहिती  पुणे खिंड आहे, हे ई.चौथीच्या   इतिहासातील मराठी भाषेच्या  पुस्तकात आहे, असे समजले.या माहितीची सत्यता पडताळणीसाठी मी ऑनलाइन वरुन  चौथी चे  पुस्तक काढून वाचले,परंतू त्यात काही मला ही माहिती मिळाली नाही.त्यामूळे पुणे खिंड या नावाने हे ठिकाण आहे की नाही, हे मी सांगू शकत नाही.मंदिराच्या येथे दोन वाटा आमच्या दुष्टीस पडल्या, एक वाट डावीकडे जात होती, तर दुसरी वाट ही मंदिराच्या वरच्या बाजुने.


आम्ही मंदिराच्या वरच्या बाजुने जी मोठमोठ्या  दगड-धोंड्याची होती,त्या बाजुने वर निघालो.



येथून पुढची वाट ही अतिशय खढी चढणीची व दगड-धोंड्याची असल्याने चढताना त्रास व दमछाक करणारी होती.





वाघजाई मंदिरापासुन १११  मी.(३६४ फुट) ची खढी चढण पार करुन आम्ही ९०७ मी.स.स.पासुन उंचीवर असलेल्या  माथ्यावर पोहचलो.



कोळेवाडी येथून येथील माथ्यावर पोहचायला  जवळपास २.९४ किलोमिटर व सव्वा तास लागला.

माथ्यावरुन पुढे अवघ्या ३०० मिटरवर दुईच्या डोंगरावर पोहचलो.



येथून डावी कडे वर जाणारी वाट ही सिंहगड किल्ल्यांकडे जाते, तर उजवीकडची वाट सरळ खंडोबा मंदिराकडे जाते.


आम्ही खंडोबा मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या वाटेने पुढे  निघालो.



दुई डोंगराच्या येथून २.५६ किलोमीटर व एक तासाचे पद्भ्रमण करुन आम्ही खंडोबा मंदिरात पोहचलो.




कोळेवाडी येथून खंडोबा मंदिरापर्यंत पोहचालायला आम्हाला एकुण ५.८०किलोमिटर व २.३० तासाचा वेळ लागला.




खंडोबा मंदीर हे स.स.पासुन ८८७ मी.(२९०९ फुट) उंचीवर आहे.

खंडोबा मंदीर हे खुप प्राचीन मंदीर आहे.



हे मंदीर श.के.१६१२ मधील आहे.


खंडोबाचे दर्शन घेउन आम्ही परत माघारी फिरलो, आलेल्या वाटेने न जाता, येथून पुढे दुई डोंगराच्या दिशेने निघालो,खंडोबा मंदिराच्या पुढे अवघ्या काही वेळातच डाव्या बाजुला खाली जाणाऱ्या वाटेने उतरायला सुरुवात केली.वळणा-वळनाच्या उतार वाटेने खाली जात राहिलो. 


२.२० किलोमीटर व दिड तासाचे पद्भ्रमण करुन वाघजाई दरा बोर्ड लावला आहे, त्या ठिकाणी पोहचलो.




येथून पुढे कोळेवाडी च्या दिशेने निघालो.

एका  ठिकाणी आम्हाला पांगारा चे झाड दिसले.


या झाडाचे वैशिष्ट्य असे आहे की हे झाडाचा बुंधा वजनाने हलका असतो.याचा उपयोग पाण्यात पोहताना खुप होतो, वजनाने हलका असल्याने पाण्यात पोहताना या झाडाचे लाकूड पाण्यावर तरंगते.अजुन एक याचा असा उपयोग होतो, तो म्हणजे या झाडाच्या पानांपासुन   जेवणाच्या पत्रावळ्या व  द्रोन बनवीतात.
     कोळेवाडी येथे पोहचल्यावर दुचाकी घेउन पुण्याकडे मार्गस्थ झालो.

    आजची मोहीम खुपच आनंददायी झाली.माझ्या दुष्टीने वाघजाई दरा हे ठिकाण अपरिचित होते.मी या ठिकाणी प्रथमच भेट दिली.खंडोबा मंदिराला मी या अगोदर रायकर मळा, धायरी येथून या डोंगराची परिक्रमा केली होती.


     आजच्या मोहिमेत लिंगाणा विर आर्यन बेनकर वय वर्ष आठ, आयुष बेनकर, विठ्ठल बेनकर, तुषार होले,अतुल हरगुडकर व मी सुशिल दुधाणे यांचा विशेष सहभाग होता.


Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर