टाकळी ढाकेश्वर
टाकळी ढाकेश्वर
ता : पारनेर
जि : अहमदनगर
३१ जानेवारी २०२०
अहमदनगर जिल्ह्य़ातील पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वरची लेणी, सोमेश्वर मंदिर पाहण्यासारखे आहे.
अनेक वेळा प्रसिद्ध लेणी, मंदिरं यांबद्दल खूप लिहिलं जातं. प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या यादीत देखील त्यांचा समावेश असतो. पण, अनेकदा मुख्य मार्गाच्या आसपासची अशी अनेक ठिकाणं असतात त्याबद्दल फारसं काही ऐकायला मिळत नाही. कल्याण-नगर रस्त्यावर नगरच्या अलीकडे ४० किलोमीटरवर टाकळी ढोकेश्वर गाव आहे. महामार्ग सोडून गावात जाणाऱ्या रस्त्याने गाव पार करून पुढे गेल्यावर,
टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी दिसते.
लेणींपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत.
लेणींपासून पाऊण उंचीवर मध्य युगात बांधलेलं प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूची तटबंदी दुरूनच आपलं लक्ष वेधून घेते.
पायऱ्यांच्या सुरुवातीलाच एक दगडी रांजण आडवा पडलेला दिसतो. येथूनच पुरावशेष आपलं लक्ष वेधून घेऊ लागतात. पायऱ्या चढताना प्रवेशद्वाराच्या अलीकडे उजव्या बाजूला दोन समाधी मंदिरं आहेत. त्यावर दगडी फुलं कोरलेली आहेत.
याच ठिकाणी एक शरभ शिल्पही पडलेलं आहे.
हा दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी जेव्हा बांधली असेल तेव्हा प्रवेशद्वारावर शरभ शिल्प असणार, पण कालांतराने डागडुजी करताना ते मूळ जागेवरून काढून टाकलं असावं. लेणींच्या पायऱ्या चढताना नक्षीकाम केलेले दगड पायऱ्यांसाठी वापरलेले आढळतात.
टाकळी ढोकेश्वरचं मुख्य लेणं प्रशस्त आहे.
लेणीत शिरताना दोन्ही बाजूला शालभंजिकेच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे.
सभामंडपातील डाव्या बाजूच्या भिंतीवर पाच वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृका त्यांच्या वाहनांसह कोरलेल्या आहेत. त्यांच्या एका बाजूला गणेशाची तर दुसऱ्या बाजूला वीरभद्राची मूर्ती कोरलेली आहे.
गाभाऱ्याच्या दारावर द्वारपालाचं शिल्प आहे.
गाभाऱ्यात पिंड आणि सभामंडपात नंदी आहे.
गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणापथ कोरून काढला आहे.
या प्रदक्षिणा मार्गावर अनेक वीरगळ ठेवलेल्या आहेत.
एक मोठा नंदीही आणि सर्पशिळा येथे ठेवलेल्या आहेत.
मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाकेदेखील कोरलेले आहे. त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरून काढलेली आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे.
त्याला सीता न्हाणी या नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या आहेत.



















Sir chan varnan
ReplyDelete