शिखरेश्वर महादेव डोंगर
ट्रेक शिखरेश्वर (महादेव डोंगर)
लवार्डे गाव,
ता: मुळशी
जि: पुणे
अरेच्या आज रविवार का, नाही हो आम्हा ट्रेकर मंडळींना सुट्टी आली की रविवार आहे असे वाटते. वाटणे साहजिकच आहे म्हणा, आज १५ ऑगस्ट २०१७ स्वातंत्र दिवस, गोपाळ काळा व त्यात श्रावण महिना म्हणजे काय मज्जाच- मज्जा. श्रावणात पाऊस कधी बरसतो, तर कधी नाही. आज तर त्याने चक्क मेडिकल सुट्टी च घेतली, अर्थात हवामान खात्याची परवानगी घेऊनच. एक दिवस त्याने परिवारासाठी दिला म्हणायचा का ? असो तर मित्रांनो आज आम्ही सह्याद्री ट्रेकर्स चे १७ सदस्य लवार्डे ता :मुळशी, जिल्हा :पुणे,
या गावी वाहनाने प्रवास करुन पोहचलो.
लवार्डे हे गाव टेमघर या धरणाच्या बाजूला लागून आहे, गावातील लोकसंख्या जेमतेम २०० ते ३०० च्या आसपास, व घरे ५० च्या आसपास. भगवान चवले यांच्या घराच्या बाजूने महादेव डोंगर कडे जाणारी वाट आहे.
या येथून आम्ही पद्भ्रमण सुरु केले.
तसे हे ठिकाण अपरिचित असेच म्हणावे लागेल, बहुतेक ट्रेकर्स मंडळींना हे माहित नसावे.लवार्डे,माले,वेगरे, आंदेश, मांडेदे या गावातील स्थनिक लोकांना माहित आहे.
आज वातावरण छान होते, हवेत गारवा ही होता.चालताना दमछाक होत न्हवती.
सुरवातीला सपाटी भागातून पद्भ्रमण केल्यावर नंतर चढण सुरु झाली.
साधारणतः ६ किलोमीटर चे पद्भ्रमण केल्यावर
प्रथम आपणाला काळूबाई मंदिर लागते.
त्यानंतर येथून ५०० मिटर वर शिखरेश्वर महादेव डोंगरावरिल मंदीर लागते.
या मंदिराची आख्यायिका अशी आहे की, स्थानिक लोकांच्या नुसार प्रथम बारगिर बुवा गोसावी येथे राहत होते.ते एका दिवसात येथून शनिशिंगणापूर येथे जात असे.कालांतराने त्यांना जाणे अवघड होऊ लागले, त्यांना महादेवांनी दृष्टांत दिला की आता तुम्ही इकडे येऊ नका, मी च तिकडे येतो, त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी विहीर खांदण्यास सुरुवात केली, प्रथम प्रयत्नात यश आले नाही.नंतर परत खांदण्यास सुरुवात केली, तर तेथे रक्ताचा ओघ येऊ लागला.बघतात तर तेथे शिवलिंग प्रकट झाले, त्यानंतर आजपर्यंत तेथे महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात सोमवारी भाविक दर्शनाला येत असतात. या येथील मंदिराची रचना खूप वेगळी आहे, या मंदिराची पूजेची जबाबदारी भागू आखाडे वय वर्ष ८२ उत्तमपणे सांभाळतात.विहीर १५ फूट खोल आहे व ५ ते ६ फूट व्यासाची आहे.विहिरीत महादेवाची पिंड आहे, परंतु येथे पाणी नसते.या येथे दर्शन घेउन आम्ही परत लवार्डे गावात पोहचलो.
मित्रांनो आजचा आमचा ट्रेक खूपच मस्त झाला, वाटही खूप चांगली व मळलेली आहे. कोठेही चुकायची भीती नाही.
सकाळी ७.१५ ला ट्रेकला सुरुवात केली व दुपारी १ वाजता ट्रेक ची सांगता झाली. येउन-जाऊन १२ किलोमीटर ची भटकंती झाली.
प्रत्येक ट्रेकर मंडळींनी हा ट्रेक अवश्य करावा.
आजच्या ट्रेकचे नेतृत्व भगवान चवले याने केले, त्याचे लवार्डे हे गाव असल्याने त्याचे सर्व बालपण या गावीच झाले असल्याने, या ट्रेकमध्ये त्याने आम्हाला मार्गदर्शन केले.
खुप छान
ReplyDelete