भामचंद्र डोंगर
भामचंद्र डोंगर
भांबुर्ले गाव
ता : खेड
जि : पुणे
मार्ग : पुणे-वाकड-देहूरोड फाटा-देहू चिखली रोड-देहू येळवडी रोड-तळेगाव चाकण रोड- खालुंबे- -हुंडाई-वसुळी-शिंदे रोड-भांबुर्ले.
अंतर : पुण्यापासुन ५२ किलोमिटर
पायथ्याची स.स.पासुन उंची : ६२४ मी.( २०४७ फुट)
भामचंद्र डोंगर माथ्या ची स.स.पासुन उंची : ८८७ मी.( २९०९ फुट)
पायथ्यापासुन माथ्यापर्यत ची प्रत्यक्ष उंची : २६३ मी.( ८६३ फुट)
महाराष्ट्र राज्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, गड-दुर्ग , देशातून कोकणात उतरणारे अनेक घाट वाटा , समुद्रकिनारे, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत.
जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे
परमेश्वराच्या भेटीसाठी तब्बल पंधरा दिवस तहानभूक विसरून तुकाराम महाराजांना जिथं समाधी लागली, ते ठिकाण म्हणजे भामचंद्राचा डोंगर किंवा भामगिरी. तूकाराम महाराजांची घोरवडेश्वर, भंडारा डोंगराप्रमाणेच भामचंद्र डोंगर ही अभंग लिहिण्याची प्रेरणास्थळे होती. येथील शांत व सुंदर वातावरणामुळे विठ्ठलाची आस लागलेल्या महाराजांना निर्गुण, निराकार विठ्ठलाची भेट झाली. देहूगावातील मुख्य मंदिरातून समोरच एक मोठा डोंगर दिसतो तो भंडारा डोंगर याच भंडारा डोंगराच्या समोर कातळकड्याची जणूकाही उलटी टोपी घालून निसर्गाच्या सान्निध्यात एकांतात समाधी लावून बसलेला भामचंद्र डोंगर आहे.
धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥
तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे.
देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंगामुळे. देहूगावातील संत तुकाराम महाराज व आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज असे दर्शन करणारे अनेक भक्त या भंडारा व भामचंद्र डोंगरावर गेल्यावाचून राहत नाही. देहूतून सुमारे १२ ते १३ किलोमीटरवर असलेल्या भामचंद्र डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत जाण्यासाठी पायवाट आहे.
भामगिरी डोंगररांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. या डोंगर रांगेच्या पश्चिमेला गेलेल्या फाट्याला त्याच्या तळातील नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे नाव मिळालेले आहे. भामगिरी डोंगर दोन भागात विभागलेला आहे पायथ्यापासून अर्ध्या उंची पर्यंत गच्च झाडी आहे. त्यावरील भागात डोंगराने अंदाजे ८०० फूटी कातळ टोपी घातलेली आहे. या कातळात नैसर्गिक आणि कोरीव गुहा आहेत.
वर दर्शविलेल्या मार्गाने आम्ही भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी पोहचलो.
गाडी पार्क करुन कमानीच्या उजव्या बाजुने असलेल्या भामचंद्र डोंगराच्या दिशेने वाटचाल सुरु केली .
कमानीतून पुढे गेल्यावर मारुती मंदीर आहे.या मंदिराच्या बाजुने ही भामचंद्र डोंगराकडे जाणारी वाट आहे.
आम्ही कमानीच्या उजव्या बाजुने असलेल्या वाटेने निघालो.
येथून लगेचच चढण असलेली वाट सुरु झाली.दाट झाडी असल्यामूळे उन्हाची झळ बसली नाही.
तशी ही वाट दमछाक करणारी आहे.आज वातावरण खुपच आल्हाददायक होते.हवेत गारवा ही होता.आज एकादशी असल्याने भाविकांची संख्या ही जास्त होती.रमत -गमत निसर्गाचा मनमुराद आनंद उपभोगत आम्ही वाटचाल सुरु ठेवली.
पद्भ्रमण मार्गावर निसर्गाची एक अदभुत किमया अनुभवयाला मिळाली.झाडाच्या फांदित जिराफ प्राण्याशी मिळती जूळती छबी साकारलेली दिसली.
साधारणतः ४५ मिनिटे व पाऊण किलोमिटर पद्भ्रमण करुन आम्ही भामचंद्र भगवान मंदिरापाशी पोहचलो.
भामचंद्र भगवान मंदीर हे स.स.पासुन ७८९ मी.उंचीवर आहे.येथे पांडवकालीन भगवान महादेवाचे प्राचीन मंदीर आहे.पांडवानी हे मंदीर एका रात्रीत पुर्ण केले आहे, अशी अख्यहिका सांगितले जाते.श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविक मोठ्या संखेने येथे येत असतात.मंदिराच्या बाहेर एक कातळात खोदलेले प्राचीन पाण्याचे टाके आहे.येथील पाणी अतिशय गार व चवीला मधुर आहे.
कातळात कोरून काढलेल्या या मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग आहेत. सभामंडप चार दगडी खांबांवर तोललेला आहे. सभामंडपात नंदीची मूर्ती आहे. सभामंडपाला लागूनच पाण्याच टाक खोदलेल आहे. गाभार्याच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. गाभार्यात शिवलींग व पार्वतीची मुर्ती आहे. छतावर नक्षीकाम केलेले आहे.
महादेवाचे मनोभावे दर्शन घेउन आम्ही येथूनच काही अंतरावर असलेल्या गुफेकडे निघालो.
कातळ भिंतीत कोरलेल्या पायर्यांनी तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेकडे जाण्यासाठी निघालो.
तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेपाशी भामगिरी डोंगराचा कातळकडा काटकोनात वळलेला आहे.या ठिकाणी उभा सरळसोट जवळपास ८०० फुटांचा कातळटप्पा आहे
गुहेच्या पायथ्याशी शिलालेख कोरलेला दगड पडलेला आहे. त्याच्या बाजूला दगडात कोरलेली गणपतीची मुर्ती आहे.
गुहेची अंदाजे उंची ६ फूट असून ती आतल्या बाजूस उतरती आहे. गुहेची लांबी अंदाजे १० फूट व रूंदी ६ फूट आहे. गुहेत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीवर तुकाराम महाराजांची मुर्ती कोरलेली आहे. त्यांच्या हातावर विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत. गुहेच्या टोकाशी विठ्ठल रखुमाईची मुर्ती आहे.
या गुहेच्या बाजूला ३ फूट उंच व ६ फूट लांब गुहा आहे. या गुहेत एक माणूस आरामात झोपू शकेल अशी जागा आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी तपश्चर्य़ेच स्थान कस असावे याबद्दल अभंग लिहिले आहेत. भामगिरीच्या ध्यान गुंफेला हे वर्णन लागु पडत.
बहुत करोति निशब्द
दाट न रिगे श्वापद !
शुक अन षटपद
तेऊते नाही !!
तपश्चर्य़ेच्या ठिकाणी शांतता असावी , श्वापदांचे येणे जाणे, पक्षी (पोपट) , किटक (भुंगे) यांचा आवाज नसावा.
आणिकही एक पहावे
जे साधकही वसते होआवे !
आणि जनाचेनी पायरवे
मळेचिना !!
हे साधकांनी वसवलेले स्थान असावे येथे सामान्य जनांचा वावर नसावा.
हे ठिकाण स.स.पासुन ८०७ मी.उंचीवर आहे.
ईश्वरप्राप्तीसाठी महाराजांनी भंडारा, भामचंद्र व घोरावडेश्वर सारख्या एकांतवास असलेल्या ठिकाणी समाधी लावून विठ्ठलाचे चिंतन केले.
एकदा तुकाराम महाराज घरी परत न आल्याने त्यांचे बंधू कान्होबा आजुबाजूच्या परिसरात त्यांना शोधू लागले. शोधत-शोधत ते भामचंद्रावर आले. तेथे त्यांना तुकाराम महाराज दिसले. निवार्णीचा संकल्प करून तब्बल पंधरा दिवस महाराज ध्यान करत होते. तुकोबांच्या अंगावर मुंग्या, विंचू, सर्प चढले, ते अंगाला झोंबले व पीडा देऊ लागले, वाघाने झेप घातली. मात्र तुकोबांचा निश्चय ढळला नाही. पंधराव्या दिवशी सत्याचा साक्षात्कार झाला. साक्षात ईश्वर प्रकट होऊन त्यांचे रक्षण केले. ज्या स्थळी देव तुकोबांना भेटले, त्या पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि स्मृती अखंड राहण्याकरिता त्या ठिकाणी कान्होबांनी काही दगड रचले. त्यानंतर कान्होबांनी येथे तुकोबांची प्रतिमा कोरून घेतली. मूर्तीच्या मागे विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत.
साक्षात्काराविषयी तुकाराम महाराज म्हणतात,
पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार झाला।
विठोबा भेटला निराकार ॥१॥
भामगिरी पाठारी वस्ति जाण केली।
वृत्ती स्थिरावली परब्रम्ही ॥२॥
निर्वाण जाणोनि आसन घातले
ध्यान आरंभिले देवाजीचे ॥३॥
सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले।
पीडू जे लागले सकळीक ॥४॥
दिपकी कर्पूर जैसा तो विराला
तैसा देह झाला तुका म्हणे॥५॥
अशा या निसर्गाने रम्य ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले.
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥
येणों सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥२॥
आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेंथे मन क्रीडा करी ॥ध्रु॥
या अभंगाचा येथे प्रत्यय येतो.
संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेउन खाली उतरलो.खाली उतरल्यावर उजव्या बाजुने पुढे निघालो.
मंदिर पाहून पुढे गेल्यावर कातळात कोरलेल अजून एक टाक पहायला मिळाले, टाक्याच्या वरच्या बाजूला गुहा आहे. या गुहेत वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारी काही मुले रहातात.
येथून पुढे चढण असलेल्या वाटेने डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी निघालो.
वाट थोडी खडतर अशीच आहे.उभी व नागमोडी वळनाची वाट चढून आम्ही अर्धा तासात माथ्यावर पोहचलो.
या ठिकाणी दोन कमी-अधिक उंचीचे डोंगर आहेत.
संपूर्ण डोंगर माथा फिरलो,फोटो शुट केले.
या डोंगराच्या माथ्यावरुन चहुबाजूचा परिसर नयनरम्य असा होता.डोंगराच्या जवळच जाधववाडी नावाचे छोटे धरण दिसते. तेथून जवळच सुधा नदीचे उगमस्थान आहे, ही नदी जांबवडे, सुदवडी, सुदुम्बरे, येलवाडी मार्गे देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते.
सह्याद्री पर्वत राजीत तासुबाई चा डोंगर आहे.हा डोंगर पुर्व पश्चिम पसरला आहे.पश्चिमे कडे या डोंगराच्या माथ्यावर तासुबाई , वरसुबाई यांची मंदीरे आहेत. तर पुर्वे कडे ही डोंगर रांग संपते तेथे डोंगराचा चंद्रा सारखा आकार आहे.व या डोंगराच्या पायथ्या पासुन जवळून भामा नदी वहाते.म्हणुन या डोंगराला " भामचंद्र " म्हणतात.
आम्ही संपूर्ण डोंगर माथा फिरुन परतीच्या मार्गाला लागलो.भामचंद्र डोंगर माथा हा स.स.पासुन ८८७ मी.( २९०० फुट) उंचीवर आहे.डोंगर उतरताना खुप काळजीपूर्वक व सावधगिरी बाळगून उतरावे.वीस-पंचवीस मिनिटात आम्ही डोंगर उतरुन गुहेपाशी पोहचलो.पुन्हा एकदा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे मनोभावे दर्शन घेऊन पायथ्याच्या दिशेने निघालो.
उतार उतरुन मारुती मंदिरापाशी पोहचलो.
बजरंग बलिचे दर्शन घेउन कमानीपाशी पोहचलो.
डोंगर पायथा ते डोंगर माथा व परत डोंगर पायथ्याशी यायला आम्हाला पावणेपाच तास व चार किलोमिटर आणि ८८७ मी.ची चढाई-उतराई करावी लागली.
येथून आम्ही भंडारा डोंगर करण्यासाठी निघालो.
आजच्या भटकंतीत सचिन मांढरे, मधुसूदन बेंन्नूर व मी सुशिल दुधाणे यांचा सहभाग होता.
Comments
Post a Comment