माणगाव (पानशेत) ते हारपुड
ट्रेक माणगाव ( पानशेत ) ते हरपूड
ता : पानशेत ,
जि : पुणे
मार्ग : पुणे - पानशेत - शिरकोळी गाव .
पानशेत धरण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरील धरण आहे.हे धरण पुण्यापासून आग्नेयेला अंदाजे ५० कि. मी. अंतरावर आहे.हे धरण मातीचे आहे . धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजी सागर असे नाव देण्यात आले आहे.
१२ जुलै , इ.स.१९६१ या दिवशी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटून पुणे व आजुबाजुच्या परिसरात पूर आला. हा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो.
हा ट्रेक करण्यासाठी आम्ही सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन सदस्य ५ जुलै २०१५ रोजी सिंहगड रोडने , पुढे पानशेत वरून शिरकोळी गावात पोहोचलो.
या मंदिरातील शिरकाई देवीची मूर्ती खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवून घेऊन ती रायगडावर स्थापना केली होती. काही कारणाने पुढे त्याच मूर्तीची स्थापना शिरकाई गावी करण्यात आली . पानशेत प्रकल्पात ते मंदिर पाण्यात बुडाल्यामुळे पुन्हा एकदा ती मूर्ती सध्याच्या नवीन मंदिरात विधिवत स्थापित केली आहे. वाटेवरुन जाताना पाण्यात बुडालेल्या जुन्या मंदिराच्या कळसाचा वरचा काही भाग आपणाला दिसतो.
ट्रेकची सुरुवात माणगावच्या आधीच डाव्या बाजूला एका लगेचच वर चढणाऱ्या व रुळलेल्या पायवाटेने सुरुवात केली.
खूप गर्द घनदाट झाडी व प्रचंड मोठे वाढलेले वृक्ष आम्हाला या वाटेवरुन जाताना नजरेस पडले. ही पुरातनकाळापासून राखलेली देवराई असल्याचे समजते. एकदम समृद्ध जंगल असल्यामुळे जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. त्यामुळे तेवढ्या परिसरात गवत बिलकूल वाढलेले दिसत नाही.थोड्याच वेळात आम्ही एका सपाटीवर असलेल्या जननीमातेच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो.थोड्याशा चढणीनंतर एक छोटी ५ / ६ घरांची वस्ती लागते.
थोडे खाली उतरून एक निर्मळ पाण्याचा ओढा ओलांडून उजवीकडे असलेल्या विहिरीजवळून वर चढणारी रुळलेली वाट आम्ही धरली.
येथून पुढची वर चढणारी वाट दमछाक करणारी आहे व अध्येमध्ये मोकळे रानही लागते. वर चढून गेल्यावर लागलेल्या सपाटीवर समोर दिसणाऱ्या सुळक्याच्या आकारावरून लिंगाणा आहे असा भास होतो, परंतु तो कोकणदिवा गड आहे , हे नंतर आम्हाला समजले.
काही अंतरावर एक वस्ती दिसते , तिला उजवीकडे ठेवत आम्ही पुढची वाटचाल सुरू ठेवली. तेथे आल्यावर ती महादेव कोळी समाजाची चांदर गावची वरची वाडी असल्याचे समजले. समोर उजव्या हाताला तळात चांदर गावाची घरे दिसू लागतात.आपण डावीकडच्या धारेवरून थोडेसे चालत गेल्यावर धारेच्या डाव्या बाजूला थोडी शोधाशोध करून खाली उतरणाऱ्या वाटेने चालत गेल्यावर तळातील एका छान दगडी बांधबांधस्तीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या धारेजवळ असणाऱ्या खडकाळ जमिनीवर येऊन पोहचलो.
काही वेळातच ५-६ घरांची एक वस्ती लागली.
येथून पुढे घामाघूम करणारी चढण सुरु झाली.
येथून पुन्हा सपाटीला आल्यावर,
एक लहान उतरण उतरून ओढा लागला. येथून समोर दिसणारा प्रचंड मोठा डोंगर चढून वर आल्यावर सपाटीवर एक देवीचे मंदिर लागते. येथून एक यू टर्न घेतल्यावर वर व खालीही खूप छान असे रोडावलेले दोन धबधबे दिसले. पावसाळ्यात यांचा अवतार दृष्ट लागण्यासारखा नक्कीच असेल याची खात्री पटली.अजून एक पहिल्यासारखाच डोंगर चढून गेल्यावर आम्ही मोहरी गावात पोहचलो. येथपर्यंत पुण्याहून नसरापूर - वेल्हा - केळद खिंडमार्गे पार सिंगापूर ( लिंगाणा किल्ला करण्यासाठीचे शेवटचे मुक्कामाचे गाव ) पर्यंत गाडीवाट आहे.आता येथून पुढे उरलेले अंतर फारफार तर तासाभराचे उरले होते. निम्म्याहून अधिक उतारच आहे,वाटेत तीन लहानमोठे ओढे लागले. मोहरी गावाच्या कडेने बाहेर पडल्यावर समोरच एक डांबरी रस्ता दिसला,तो उजवीकडे सिंगापूर व डावीकडे केळद खिंडीतून वेल्हे मार्गे पुण्याला जातो. अजून डावीकडे एक कच्चा रस्ता सोडून खाली उतरणारी पायवाट हरपूडला जाते.
उजवीकडे दूरवर ट्रेकर्ससाठी ऑल टाइम ग्रेट लिंगाणा गड नजरेस पडला. त्याच्याही पाठीमागे दूरवर स्वराज्याची राजधानी म्हणून ज्ञात असलेला रायगड किल्लाही दिसला.
येथून पुढे वाट उताराची व घसरडी असल्यामुळे काळजीपूर्वक उतरलो.या टप्प्यावर कारवीला छान जांभळी फुले आल्याचे दिसले. जवळजवळ सहा तासांची डोंगरदऱ्यातील उन्हातान्हातील २० मिनिटांची चढण चढून आम्ही हरपूड मधील मंदिरात १५ किलोमीटर पदभ्रमण करून पोहोचलो.
वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
Comments
Post a Comment