ढाकोबा -दुर्ग पठार पद्भ्रमण

      ढाकोबा - दुर्गपठार ट्रेक
       (आंबोली ते भिवाडे खुर्द)

ता : जुन्नर ,
जि : पुणे
 मार्ग :  पुणे - नारायणगाव- आंबोली गाव.




     ढाकोबा सह्याद्रीच्या अनेक उत्तमोत्तम ट्रेकपैकी एक सुंदर दुर्गभ्रमंती म्हणजे दुर्ग ढाकोबा ट्रेक होय . नाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे एक उत्तुंग पर्वत रांग दिसून येते. नाणेघाट , दाऱ्याघाट , खुटेदार , त्रिगुणधारी , साकुर्डी घाट , सादडे घाट , अहुपे घाट , माळशेज घाट इ. घाटवाटा याच डोंगररांगेत आहेत.


    याच रांगेतील एका डोंगरावर  ढाकोबा गड आहे. 




ढाकोबाच्या सरळ रेषेत असणारा दुसरा गड म्हणजे 'दुर्ग'. दुर्गमता आणि विरळवस्ती हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. कल्याण बंदरात उतरणारा माल मुरबाड , वैशाखरे मार्गे विविध घाट मार्गांनी सह्याद्रीची रांग ओलांडून घाट माथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या घाट मार्गावर नजर ठेवण्यासाठी प्राचीन काळापासून अनेक गड बांधण्यात आले. या गडांचा मुख्य उद्देश म्हणजे या व्यापारी मार्गांचे रक्षण करणे , त्यावर नजर ठेवणे , ढाकोबा गडाचा उपयोग ही टेहळणीसाठी होत असावा.
      ढाकोबा गडावर,  गड असल्याचे कोणतेही अवशेष नाहीत. ढाकोबा गडावरून नाणेघाट ,जीवधनची मागची बाजू , दाऱ्याघाट आणि कोकणचे विहंगम दृश्य दिसते.
 पावसाळ्यात सह्याद्रीत भटकंती करणे म्हणजे स्वर्ग सुख काय असते....याची प्रचिती येणे.
याची देही ... याची डोळा. निसर्ग आपणाला भरभरून देत असते. आपणाला ती घेण्याची कुवत असली पाहिजे .
     म्हणतात ना , '' देणाऱ्याने देत जावे , 
 घेणाऱ्याने घेत जावे, 
घेणाऱ्याने घेता घेता ,
 देणाऱ्यांचे हातच घ्यावे.''

       या ट्रेकला जाण्यासाठी आम्ही  १५ जानेवारी २०१२ रोजी पुणे - नाशिक रोड - नारायणगाव मार्गे आंबोली गावात  पोहोचलो.



येथून दाऱ्या घाटाच्या दिशेने पद्भ्रमणास  सुरुवात केली.




सुरुवातीस  उभी चढण सुरू झाली. 




दाऱ्याघाट उजवीकडे ठेवून डाव्या बाजूने वर निघालो. 


सुमारे दोन सिंहगडा इतकी  उंची पार करुन आम्ही  ढाकोबाच्या  डोंगरावर  पोहचलो.


 दर सात वर्षांनी कारवी फुलते, याला येणारे पांढरे फूल हे खूप दुर्मीळ असते. खूपच कमी प्रमाणात हे फूल आढळते. ढाकोबा पठाराचा परिसर हा 'सड्याचा  आहे. 



महाराष्ट्रातील बराचसा भाग लाव्हारसापासून तयार झालेल्या खडकांनी बनला आहे . यात शेवटच्या टप्प्यात जांभा ( लॅटराईट ) हा विटेसारखा दिसणारा खडक निर्माण झाला . सह्याद्रीच्या पठारावर दुरूनही एखादया टोपीसारख्या दिसणाऱ्या या जांभ्याच्या पठारावर झाडी उगवत नाहीत . म्हणून अशा पठारांना सडा ( stony waste ) म्हणतात . ढाकोबा आणि दुर्गपठार परिसरात असे उजाड आणि दगड धोंड्याने व्यापलेले माळरान मोठ्या प्रमाणावर दिसते . याच ढाकोबाच्या सर्वात उंच भागावर जेव्हा आपण पोहचतो , ज्या ठिकाणी ढाकोबा डोंगर येतो , तेथे दाऱ्याघाटाचा कोकणकडा दिसतो .तेथून नजर जाईल तिथपर्यंत सर्वत्र पांढरेशुभ्र ढग दरीपासून वर पठारापर्यंत गच्च भरून तरंगताना दिसतात . अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळते . हा सर्व नजारा डोळ्यात साठवून खाली उतरायला सुरुवात करावी . या येथून आपणाला जीवधन , वानरलिंगी सुळका ( खडा पारशी ) , हडसर , चावंड , निमगिरी सर्व गडांचे दर्शन घडते .


खाली उतरून सडा , ढाकोबा मंदिर इत्यादी उरकून थोडं जंगलाबाहेर उताराने उतरून एका ओढ्याकाठी आपण पोहचतो.





 दुर्गपठारच्या टेकडीवजा दुर्गापासून डावीकडे वळून ट्रेक चालू ठेवला. माळ्याच्या वस्तीवरून खाली भिवडी गावात उतरायला सुरुवात केली.उतार हा चढणी इतकाच कठीण आहे . जवळपास नऊ तासांच्या व २१ किलोमीटरचे पदभ्रमण करून आम्ही  भिवडी गावात पोहोचलो.  या येथे आमच्या  ट्रेकची सांगता झाली.
    संपूर्ण पद्भ्रमण मार्गा वरुन  ढाकोबा गड कोठूनही दिसतो.शेकडो वर्षे दाऱ्याघाट , खुटा घाट इ. वाटांवर वीज , वारा , पाऊस , ऊन झेलत जराही न झिजता तो उभाच आहे . अशीच कणखर , राकट आणि निष्ठावान माणसे या सह्याद्रीत जन्मली . म्हणूनच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या मोगल साम्राज्याशी महाराष्ट्रातील एक छोटे राज्य यशस्वी टक्कर देऊ शकले . या पदभ्रमण मार्गावर पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात या ठिकाणी धबधबे दिसत होते. परंतु गावकऱ्यांनी त्या ठिकाणी पाणी अडवून पाईपद्वारे पाणी गावात आणले आहे.


वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.

     आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.



Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर