भटकंती भिवपुरी घाट व कुसुर घाट वाटेची
भिवपुरी घाट व कुसूर घाट
ता :मावळ ,
जि : पुणे
मार्ग :पुणे - तळेगाव - वडेश्वर - कुसूर - खांडी गाव.
कुसूर पठार हे मावळ तालुक्यातील बरेच मोठे प्रसिद्ध व बहूपरिचीत असे पठार आहे.
हा ट्रेक करण्यासाठी आम्ही १२ फेब्रुवारी २०१७ रोजी आम्ही पुणे- तळेगाव स्टेशन- वडेश्वर- कुसूर- खांडी असा प्रवास करुन आम्ही खांडी या गावी पोहोचलो.
गावातून स्थानिक माणसाला सोबत घेऊन शाळेच्या कंपाऊंडच्या कडेने उजव्या हाताच्या डोंगराच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले.
सुरुवातीस सिमेंटच्या रस्त्याने चालत राहिलो.
पाचच मिनिटात थोडावेळ,गाडीवाटेने व नंतर दाट झाडीतील पायवाटेने वर चालल्यावर अर्ध्या तासात आम्ही टॉपला पोहोचलो.
खाली तळात असलेली हिरवाई , टाटा कंपनीचा त्या ठिकाणी असलेला हायड्रोईलेक्ट्रीक प्रोजेक्ट व वसाहत दिसू लागली.
आम्ही साधारण १५० मीटर वर चढून आलो होतो. ६५० मीटर उतरून साधारण तेवढीच चढाई करून आम्हाला शेवटचे गाव कुसूर येथे पोहचावे लागले. खाली उतरणारी वाट बऱ्यापैकी रुळलेली.काही ठिकाणी घसरडी, मुरमाड जागेतून जाणारी तर काही ठिकाणी कातळटप्पे ओलांडत जावी लागणारी आहे. बऱ्याच ठिकाणी दाट सावली व डेरेदार वृक्ष आढळतात.मध्ये एका ठिकाणी डांबरी सडक ओलांडून पुन्हा जंगलातील वाट पकडावी लागली.
शेवटच्या टप्यात वाटेवर एक अगदीच छोटे वनदेवतेचे मंदिर लागले.
त्यानंतर लगेचच तेथील वसाहतीतील घरे , ऑफिस व अंतर्गत डांबरी रस्ते नजरेस पडतात.
आम्ही भिवपुरी घाटवाटेने अडीच तासात तळातील भिवपुरी गावात पोहोचलो.
डांबरी सडक लागल्यानंतर डाव्या बाजूला वळून थोडे चालल्यावर अगदी एकच माणूस जाईल इतक्या रुंदीच्या लोखंडी साकव पुलावरून पलीकडे गेल्यावर व एका जुन्या वस्तीला ओलांडल्यावर मस्त ऐसपैस दाट सावलीची जागा लागली.
या येथे ट्रेकचा निम्मा भाग म्हणजे भिवपूरी घाट संपलेला होता. उरलेला निम्मा भाग म्हणजे कुसूर घाट फक्त बाकी राहिला होता.
येथून पुढे संपूर्ण उरावरची चढण, व तीही अध्येमध्ये मोकळ्या रानातून असल्यामुळे पायपीट करताना चांगलाच घाम निघत होता.
सुरुवातीची अर्ध्या तासाची चढण वाळलेल्या गवताळ रानातून सुरू झाली. नंतर ५-१० मिनिटे थोडी सपाटी चालून गेल्यावर वाट पुन्हा दाट जंगलात घुसली. वाटेत डाव्या उजव्या बाजूला बऱ्याच धबधब्याच्या जागा लक्षात येतात.पावसाळ्यात येथील सौंदर्य निश्चितच वाखाणण्याजोगे असते.
वाट थोडी उजव्या बाजूला जात शेवटी एकदाची टोकावर निघते.
डाव्या बाजूला टोकाजवळच एक नव्यानेच बांधलेले हॉटेल की रिसॉर्ट असल्याचे दिसले. पुढे गावाकडे जाणारी वाट सोडून त्याबाजूला गेल्यास एक जुनी पिण्यालायक व भरपूर पाणी असलेली विहीर लागली. जवळच्या बहुतांशी जमिनीवर सपाटीकरणाचे काम चाललेले दिसले. काही दिवसातच याही निरोगी , निकोप जागांचे बाजारीकरण होऊन विद्रुपीकरण होणार हे नक्की.
सरळ पायवाटेने चालत गेल्यावर कुसूरची एक वाडी ओलांडल्यावर प्रथम सिमेंटच्या अंतर्गत रस्त्याने व नंतर मुख्य डांबरी रस्त्याने आम्ही एका लवणाजवळील डाव्या बाजूला असणाऱ्या पाण्याच्या हात पंपावर पोहचलो.
येथे जवळपास सहा तास व तेरा किलोमीटरचे पदभ्रमण करून ट्रेकची सांगता झाली.
वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
Comments
Post a Comment