शारिरीक श्रमतेचा कस पाहणारा सह्याद्री रांगेतील एक भन्नाट ट्रेक : ढवळे ते आर्थर सीट
ढवळे ते ऑर्थरसीट ( महाबळेश्वर )
ढवळे गाव
ता : पोलादपूर ,
जि : रायगड
मार्ग : पुणे- महाड - पोलादपूर - आंबे नळी घाट - कापडे गाव- उंबरठ - ढवळे गाव .
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे एक नगरपालिका असणारे तालुक्याचे शहर आहे . सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे शहर वसलेले आहे. भारतातील जी हिरवळीने सजलेली काही मोजकीच ठिकाणे आहेत, त्यातीलच हे एक ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती. याचे क्षेत्रफळ १३७.५१ किमी . ( ५२.९ ५ स्क्वे . मीटर ) आहे . समुद्रसपाटीपासून याची उंची १३५३ मीटर आहे . सह्याद्री डोंगर रांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी , सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाट माथा असे तीन भाग पडले आहेत . येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशाशी व्यापार चाले . कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गानी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे . त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे , शहरे , बाजारपेठा तयार झाल्या .
ढवळे ते ऑर्थर सीट पॉईंट ( मढी महल ) हा सुद्धा प्राचीन ढवळे घाटमार्ग होता . चंद्रगड , बहिरीची घुमटी , जोरचे पाणी हे प्राचीन अवशेष याची साक्ष देत आजही उभे आहेत . ढवळे ते ऑर्थर सीट हा सह्याद्रीतील अति कठीण ट्रेकपैकी एक आहे . या ट्रेकमध्ये कोठेही रोप लावून चढावे लागत नाही , तरीही आपण समुद्रसपाटीपासून ४७२१ फूट उंच महाबळेश्वरपर्यंत एका दिवसात चढून जातो त्यामुळे हा ट्रेक शरीराची व मनाची कसोटी पाहणारा आहे .
ढवळे ते ऑर्थर सीट ही रेंज प्रामुख्याने खालील प्रकारात विभागता येऊ शकते .
१ ) ढवळे ते बहिरीची घुमटी.
२ ) बहिरीची घुमटी ते गाढवाचा माळ .
३ ) गाढवाचा माळ ते ऑर्थर सीट पॉईंट .
सह्याद्री रांगेतील अनेक कठीण व शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा हा ट्रेक आहे . या ट्रेकला जाण्यासाठी आम्ही सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन चे सदस्य २० डिसेंबर २०१५ रोजी पुणे - सातारा रोडने , नवीन बोगदा , मुंबई - गोवा हायवे , महाड , पोलादपूर , आंबेनळी घाटाने वर चढून पुन्हा डाव्या हाताला वळत कापडेतून,
तानाजी मालुसरेचे उंबरठ येथून शेवटचे गाव ढवळे या गावी पोहचलो.
ढवळे ऑर्थर सीट किंवा चंद्रगड / ढवळगड हा बहुपरिचित ट्रेक असल्यामुळे गावात बाहेरून येणाऱ्यांचा बराच राबता असतो.
त्यामुळे आम्ही स्थानिक गाईडला बरोबर घेऊन ट्रेकला सुरुवात केली.
गावातील घरांच्या अंगणातून चालत थोड्याच वेळात आम्ही गावाबाहेर पडलो.येथून आमच्या उजव्या हाताला अगदी जवळच आडवा पसरलेला जो डोंगर दिसतो तो म्हणजे चंद्रगड .
येथून पुढे साधारणतः ५-१०
मिनिटांवर आम्हाला ढवळे गावाची १०-२० घरांची आदिवासी वस्ती लागली. ही वस्ती ओलांडून पुढे गेल्यावर उजव्या हाताला वर चढणारी वाट चंद्रगडावर जाते व सरळ जाणारी वाट महाबळेश्वरला जाते . वाटेवर बऱ्याच ठिकाणी पांढऱ्या ऑईल पेंटने दगडांवर खुणा केलेल्या आहेत.
वाट हळूहळू वर चढायला लागते व जंगलही दाट होत जाताना दिसते.
आम्ही चंद्रगडाला वेढा मारून त्याच्या डाव्या बाजूला आलो. अध्येमध्ये लागणारे लहानमोठे कोरडे पडलेले धबधबे आपली वाट चुकवू शकतात, त्यामुळे वाटाड्याची आवश्यकता का लागते , याची अनुभूती येथे आम्हाला आली. येथून पुढे वाट अधिक चढणीची होत जाते . तीव्र घसाऱ्यामुळे काळजीपूर्वक चालावे लागते . तासाभराचे अंतर पार केल्यावर मोकळ्या टप्प्यावरून उजवीकडे दूरवर प्रतापगड व त्याच्याही पलीकडे मधूमकरंदगड , डाव्या बाजूला दूरवर कांगोरी / मंगळगड आपल्या दृष्टीस पडतो.त्याच्या थोडे अलीकडे अस्वलखिंडही नजरेस पडते.समोर दूरवर कोळेश्वर , रायरेश्वर पठार व कमळगड दिसतो.
या ट्रेकच्या वाटेवर आपणाला बरेच गड व घाटवाटा दिसतात.
चढण खूपच असल्यामुळे थकवा व घामाच्या धारा येत होत्या.
१५/२० मिनिटात एक थोडा अवघड व निसरडा ट्रॅव्हर्सनंतर ( पद्श्रिना ) पुन्हा थोड्या चढाईनंतर आम्ही जवळपास तीन ते साडेतीन तासांची पायपीट करून घुमटीजवळ पोहोचलो.
या येथे थोडा वेळ आम्ही विश्रांती घेतली.
येथून एक वाट बांबूच्या बनात जाते , येथून पुढे वाटचाल करित आम्ही , पाचच मिनिटात वाटेच्या डाव्या बाजूला असलेल्या पाण्याने भरलेल्या टाक्यापाशी पोहचलो.येथे रिकाम्या झालेल्या बाटल्या भरुन घेतल्या व पुढे भटकंती सुरू ठेवली. येथून समोर दूरवर महाबळेश्वरचा ऑर्थर सीट पॉईंट आम्हाला खुणावत होता. चढण चढताना आमच्या बाजूला दोन ते तीन हजार फूट खोल दऱ्या बघताना छातीत धडकी भरली.
येथून पुढचा टप्पा थोडासा अवघड व काळजीपूर्वक चढावा लागतो . १०-१५ फुटांचा कातळ टप्पा पार करावा लागतो.
जवळ रोप असेल तर उत्तम, अन्यथा तसेही जाता येते.दगडांच्या कपारीत पकडायला खाचा आहेत.
हा शेवटचा टप्पा पार करून आपण आर्थर सीट पॉईंटला पोहचतो.
ढवळे गावातून आम्ही चालायला सुरुवात केली होती, तेव्हा आम्ही समुद्रसपाटीपासून २०० मीटर उंचीवर होतो, आर्थर पॉईंट येथे आम्ही अत्यंत तीव्र चढ चढून ११०० मिटरपेक्षाही जास्त उंची गाठत , जवळपास १५ किमी.चे पदभ्रमण करून महाबळेश्वरच्या थंडगार व वनश्रीने नटलेल्या परिसरात दाखल झालो.
वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
अप्रतिम सर ❣
ReplyDelete