जरंडेश्वर,कल्याणगड( नांदगिरी), पाटेश्वर : एक अविस्मरणीय भटकंती

जरंडेश्वर , कल्याणगड (नांदगिरी),  पाटेश्वर ट्रेक 

जरंडेश्वर , कल्याणगड
ता :कोरेगाव , 
जि : सातारा 

पाटेश्वर 
 ता : सातारा ,
 जि :सातारा

मार्ग : पुणे - सातारा- सातारा कोरेगाव रस्त्याने दहा किलोमीटर अंतरावरील जांब गाव.


       पुणे- सातारा- देवगाव- पाटेश्वर हा पुण्यापासून अडीच तासांचा प्रवास.पाटेश्वर हा साधारणत : ४०० फूट उंचीवर असलेला डोंगर आहे . निसर्गरम्य उंच ठिकाणी शिवाचे स्थान आहे , शिव मंदिर हे बहुतेक वेळा उंच डोंगरावरच असतात. पाटेश्वराचे हे शिल्प वैभव निसर्गाच्या सान्निध्यात पाहून मन थक्क व्हायला होते. पावसाळ्यात तर या ठिकाणी रानोमाळ रानफुलं आणि निसर्ग देवता हिरवा शालू परिधान करून पर्यटकांना व आपल्यासारख्या भटक्या मंडळींना  आकर्षित करीत असतात.पाटेश्वर मंदिरातील नंदीचे रूप म्हणजे , पाय दुमडून बसलेल्या म्हशीने आपल्या पाठीवर शिवलिंग तोलले आहे , असे तिचे रूप, केवळ अप्रतिम, अशा प्रकारची पिंड अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही.
          जरंडेश्वर , कल्याणगड व पाटेश्वर हा एकदिवसीय ट्रेक करण्यासाठी आम्ही सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन चे सदस्य ६  ऑक्टोबर  २०१३ रोजी पुणे सातारा, सातारा- कोरेगाव रस्त्याने साधारण १० किमी. अंतरावरील,


 जांब या गावी खाजगी वाहनाने प्रवास करुन  पोहचलो.





 समोरच जरंडेश्वरला जाणारी पायऱ्यांची वाट आहे.



पायरी मार्गाने  चालताना  तुलनेने जास्त त्रास होतो.





 जांबगावाकडून चढाई करून विरुद्ध दिशेला असणाऱ्या पाडळी या गावात उतरता येते. या दिशेने पुढच्या नांदगिरी गावी जाणे सोईचे होते व तसेच, त्याच वाटेने उतरण्यापेक्षा एक वेगळी वाट ही माहितीची होते.वाट चांगलीच रुळलेली व फारशी अवघड नाही. 

पाऊण तासात आम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलो.


वाटेवर तुरळक झाडी असून बरीच पानगळ झालेली आहे. सकाळी लवकर चालणे चालू केले की चढाईचा त्रास जाणवत नाही. या ठिकाणी नियमित येणारे भक्त , तसेच नियमित चालण्याचा व्यायाम करायला आलेले बरेच जण आम्हास  भेटत होते. 


रामदास स्वामींनी स्थापना केलेला , परंतु त्या प्रसिद्ध ११ मारुतींपैकी नसणारे हे येथील मारुती मंदिर आहे. 



मंदिर बरेच प्राचीन व सुस्थितीत आहे . वनविभागानेही बऱ्याच ठिकाणी माहितीचे बोर्ड लावलेले आहेत. बऱ्यापैकी शिल्लक राहिलेल्या वनसंपदेमुळे,  बऱ्याच  पक्षांचाही वावर  येथे आढळतो.
    जरंडेश्वर हनुमानाचे दर्शन घेऊन , लगेचच विरुद्ध दिशेला असलेल्या एकमेव पायरी मार्गाने आम्ही उतरायला सुरुवात केली.या वाटेवर ठराविक अंतरावर   छान , आकर्षक सिमेंट काँक्रीटचे बसण्यासाठी भक्कम बाक बसविलले दृष्टीस पडले.थोड्याच वेळात आम्ही  बाजूचे पायथ्याचे गाव पाडळी या ठिकाणी  पोहोचलो. येथून पुढे आम्ही आमच्या  खाजगी वाहनाने नांदगिरी या पायथ्याच्या गावाच्या दिशेने प्रवास सुरू केला . 


७-८ कि.मी. अंतर पार करुन व २५-३० मिनिटांत आम्ही  शाळेसमारील मोकळ्या पटांगणात पायउतार झालो. 


कल्याणगड उर्फ नांदगिरी वर  पाणी असल्यामुळे सोबत एकच लीटर पाणी,  दुपारच्या जेवणाचा डबा व बॅटरी(टॉर्च) घेऊन लगेचच चालायला सुरुवात केली. 



ऊन असल्यामुळे हवेत फारसा गारवा जाणवला  नाही, तसेच वाटेवर फारशी झाडीही नाहीत.उन्हाची झळ  जाणवत होती.

वाट बरीचशी चांगलीच चढणीची असल्यामुळे चांगलीच दमछाक होऊन घाम ही येऊ लागला. 


पद्भ्रमण मार्गावरुन जाताना  मध्ये एक कोरडे पडलेले चांगले मोठे खांबटाके लागले. 

पाऊण तासाच्या एकसलग चढाईनंतर आम्ही  कातळकड्यालाच जाऊन भिडलो. 


उजव्या बाजूला जाणारी रुंद वाट पवनचक्क्यांकडून खाली गावात जाते, 


तर डावीकडची वाट गडाच्या भक्कम दरवाजातून सरळ पुढे पायऱ्या उतरून ,

या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणून ज्ञात असलेल्या भल्याथोरल्या अंधाऱ्या गुहेत जाते.


 या ठिकाणी आत जाण्यासाठी आपणाकडे  बॅटरी असणे गरजेचे आहे. पूर्वी संपूर्ण पाण्यातून गेल्यावरच आपणास दत्त महाराजांचे दर्शन घडत होते. पावसाळ्यात अगदी छातीपर्यंत तर उन्हाळ्याच्या दिवसात घोट्यापर्यंत पाणी असते. एवढ्यात कधीतरी त्या ठिकाणी मध्यभागी सिमेंट - काँक्रीटचा उंचवट्याचा रस्ताच तयार केला आहे, वाटेच्या दोन्ही बाजुला  स्वच्छ पाणी मात्र आजही उपलब्ध आहे.

 गुहेच्या शेवटच्या टोकाला दत्त महाराजांची  मूर्ती आहे. 


त्याच्याशेजारी थोडे अलीकडे जैन धर्मियांची देवता आहे. 



गुहेतून परतल्यावर आल्या वाटेने मागे जाण्याऐवजी, उजव्या हाताला वर गडाच्या पठारावर जाणारी वाट आहे. थोडे वर चढल्यानंतर समोरच एक छोटेखानी मंदिर आहे . अजून थोडे वर गेल्यावर सरळ 
गवतातून जाणाऱ्या वाटेने आम्ही  गडाच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचलो . डाव्या  हाताला असणाऱ्या व नव्यानेच बांधलेल्या इमारतीत साधूमंडळी वास्तव्य करतात.
अजून थोडे पुढे गेल्यावर वर पत्र्याचे छत असलेला मोठा लांबरुंद चौथरा आढळला. पुढे थोड्या अंतरावर एकुलता एक वटवृक्ष दृष्टीस पडला. सर्व परिसर बघून झाल्यावर आम्ही  गडपायउतार झालो. पाऊण तासात आम्ही  खाली पोहचलो.




      येथून आम्ही  खाजगी वाहनाने साधारण २० कि.मी. अंतर पार करून सातारा येथे पोहचलो, येथून पुढे १५-१६ कि.मी. चा प्रवास संपवून देवांग या गावी पोहचलो.


गावातून जाणाऱ्या डांबरी , परंतु अतिशय अरूंद व तीव्र चढणीच्या रस्त्याने पुढे निघालो. 




या वाटेवरही फारशी झाडी नाहीत . ऊन कमी असेल तर, फारशी चढण चढावी न लागता,

 आम्ही २०-२५ मिनिटांतच  मुख्य मंदिराच्या परिसरात पोहोचलो.



     मंदिराचा परिसर प्रशस्त व खूपच रमणीय असा आहे . सगळीच बांधकामे अतिशय आखीव - रेखीव आहेत . त्यातील कलाकुसर व बारकावे कल्पनातीत स्वरूपाचे आहेत.



रस्ते , वाहतुकीची साधने व कोणतीही आधुनिक अवजारे उपलब्ध नसताना इतके सारे काम कसे केले असेल असा पश्न पडल्याशिवाय राहत नाही . त्याची भव्यता ही शब्दात मांडता येण्यासारखी नाही . त्यासाठी या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देणेच योग्य ठरेल.
त्यासाठी पावसाळ्याच्या नंतरची वेळ निवडता आली , तर मात्र ‘ सोने पे सुहागा ' असेच म्हणावे लागेल . मुख्य मंदिराच्या आजूबाजूलाही अक्षरश : हजारोंच्या संख्येने वेगवेगळ्या आकाराच्या व ठेवणीच्या लहानमोठ्या पिंडी आहेत . वर पाण्याची कोरलेली व बांधीव टाकीही आहेत . त्यापैकी एकात छान उमललेली कमळेही पाहायला मिळतात . सर्व परिसर फिरून परतीच्या प्रवासास सुरुवात केली.
     जरंडेश्वर , दत्त महाराजांचे कल्याणगड उर्फ नांदगिरी व शंकर भगवानांचे पाटेश्वर अश्या तिन  अप्रतीम ठिकाणांची जवळजवळ १५ की.मी.ची चढाई, उतराई  करून आमचा  ट्रेक पूर्ण झाला.


वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.

     आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.





Comments

Popular posts from this blog

पद्भ्रमण ठोसेघर ते जुंगटी

कान्हुर पठार

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर