भिमाशंकर रांगेतील एका घाट वाटेची भटकंती: आहुपे घाट

आहुपे घाट

ता : जुन्नर 
जि : पुणे 
गाव : आहूपे 

मार्ग : पुणे-चाकण-खेड-मंचर-घोडेगाव-आंबेगाव-आहुपे.


     
    देश आणि कोकणाला जोडणाऱ्या सह्य़ाद्रीतील अनेक घाटवाटा या ‘ट्रेकर्स’च्या कायम आवडीच्या जागा असतात. एखादी घाटवाट पकडून भटकताना निसर्ग, सह्य़ाद्रीच्या अधिक जवळ जायला होते. भीमाशंकर रांगेतील आहुपे घाट हा  त्यापैकीच एक.

   इ.स.सन पूर्व ३० मध्ये उदय पावलेल्या सातवाहन काळापासून अस्तित्वात असलेला नाणे घाट या भागातील घाटांचा राजा होय. त्याच्या दक्षिणेकडे असणारे दाऱ्या, आहुपे हे पायी उतरण्याचे घाटमार्ग. त्याचे सवंगडीच म्हणायला हवेत. नाणेघाटाच्या पायथ्याला त्या काळातले व्यापारी केंद्र ‘वैसाखरे-वैश्यगृह’ म्हणजे आजचे वैशाघरे आहे. दाऱ्या घाटाच्या पायथ्याला पळू गाव आहे, तर आहुपे घाटाच्या पायथ्याला मुरबाड-कर्जत मार्गावरील खोपीवली गाव आहे. आजही ह्य़ा भागातील भूमिपुत्र आदिवासी मंडळी पायी तासा- दोन तासात हे घाट चढ-उतार करून देश आणि कोकणातील आपले संबंध, नातीगोती, बाजारातील खरेदी-विक्री निगुतीने करतात. घाटावरील भीमाशंकर अभयारण्य आहुपे गावापर्यंत आलेले आहे. सुमारे ६००-७०० वस्तीचे आहुपे गाव अगदी सह्य़ाद्रीच्या टोकावर वसलेले आहे. आहुप्याजवळच्या दाट अरण्याला ‘भट्टीचे रान’ म्हणतात. या अरण्यात आईन, हिरडा, आंबा, जांभूळ अशी वनसंपदा आणि कोल्हे, सांबर, रानडुकरे, साळींदर, अगदी बिबटय़ांचासुद्धा वावर आढळतो. 

     हा ट्रेक करण्यासाठी आम्ही सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन चे सदस्य २० जुलै २०१४ रोजी  पुणे-चाकण-खेड-मंचर-घोडेगावहून आहुपे(ता:जुन्नर , जि :पुणे ) या गावी पोहचलो.



सह्य़ाद्रीच्या कुशीत तीनही अंगाने कडा तुटलेल्या सोंडेच्या टोकावर हे निसर्गरम्य गाव आहे. गावाच्या अलीकडेच एक डौलदार आम्रवृक्ष आहे. आंब्याचा एवढा विशाल वृक्ष सहसा आढळत नाही. डावीकडे टोकाला शाळेची बैठी पांढऱ्या रंगाची छोटी इमारत असून तिच्या मागे हरिश्चंद्रगडावरील कोकणकडय़ासारखा एक अजस्र कडा आहे. 

त्याला गावकरी ‘ढग’ म्हणतात. बहुदा त्यावर पाण्याचे ढग आदळून पाऊस पडत असावा.




     गावातून वाटाड्या ला  सोबत घेऊन ट्रेकला सुरुवात केली.




शाळेच्या इमारतीजवळूनच दाट झाडीतून एक उताराची घळ दरीत उतरताना दिसते.


 हाच तो आहुपे घाटाचा प्रारंभ. दगड-धोंडय़ांनी भरलेली बोराटय़ाच्या नाळेसारखीच ही वाट. 





पूर्वापार जुना मार्ग असल्याने कुठे कुठे कातळात पायऱ्याही कोरलेल्या आहेत. 

साडेतीन-चार हजार फुटांच्या उभ्या कातळकडय़ातील हा मार्ग असल्याने  उतरायला मजा वाटते. 




परंतु घाट उतरताना काळजी पुर्वक उतरावे.शिवाय संपूर्ण मार्ग गर्द झाडीने आच्छादलेला असल्याने ‘उन्हाळी ट्रेक’साठीही याचा विचार करता येऊ शकतो. दीड-दोन तासात आपण पायथा गाठतो.

    आहूपे गावाहून आपण घाट उतरून खाली येतो.

    हा ट्रेक आपण पायथ्याचे गाव खोपीवली (ता:मुरबाड , जि : ठाणे ) या गावाहून ही करु शकतो.

     ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका हा गड-किल्ल्यांसाठी जसा प्रसिद्ध आहे , तसाच येथील अनभिज्ञ घाटवाटंबद्दल ही तितकाच लोकप्रिय आहे.पायथ्याच्या खोपीवली गावातून निघाले की मछिंद्रगडाची धार सुरू होते.या धारेला बिलगून अजुन एक डोंगर रांग पठारावर जाऊन पोहचते.जुन्नर आणि मुरबाड तालुक्यांना जोडणारी ही पुरातन पायवाट म्हणजेच ' आहुपे घाट '.घाट माथ्याच्या आहुपे गावापर्यंत गाडी रस्ता झालेला असल्यामुळे सध्या ही घाट वाट मोडकळीस आली आहे.ठराविक अंतरावर विशिष्ट पद्धतीने रचलेले दगड-धोंडे हे या घाट वाटेच्या राबत्या काळाचे मूक साक्षीदार आहेत.

    खोपीवली गावातून आपण घाट मार्ग चढून,





 आहुपे येथे पोहचतो.


वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.

     आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.




Comments

  1. छान लेख वाचला

    ReplyDelete
  2. आज आपला पायलट ग्रुप अप्पा, भाऊजी, बुटाला, आरेकर, मोटा, माने..... व इतर सर्व मेंबर बरोबर केलेले ट्रेक तसेच सह्याद्री व त्याचे अंतर्गत रुप परत एकदा अनुभवण्यास मिळाले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर