आडवाटेवरची भटकंती : काळ भैरवनाथ मंदीर व सोनजाई मंदिराची

सोनजाई डोंगर 

ता : वाई 
जि : सातारा 
पायथ्याचे गाव बावधन धनगर वाडा : स.स.पासुन उंची ७३२ मी.(२४०१ फुट)
मार्ग : पुणे-बंगलोर हाईवे-शिवापुर-कापूरहोळ-किकवी-सारोळा-पारगाव  खंडाळा-वाई फाटा-वाई सुरुर रोड-बावधन रोड-बावधन-सोनगिरवाडी रुरल-सोमजी नगर-बावधन धनगर वाडा.
अंतर : 
पुण्यापासुन ८६ किलोमिटर.
वाई फाट्यापासुन ३९ किलोमिटर.
स.स.पासुन डोंगराची उंची: ९३० मी.( ३०५० फुट)
डोंगराची पायथ्यापासुन प्रत्यक्ष चढाई: १९८ मी.( ६५०  फुट)


     सोनजाई डोंगर या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही वरिल दर्शविलेल्या मार्गाने चार चाकी वाहनाने प्रवासास सुरुवात करुन प्रथम,

 बावधन येथील काळ भैरवनाथाचे  मुळ  स्थान असलेल्या मंदीरापाशी पोहचलो .या मंदिरापर्यत  जाण्यासाठी दगडातील पायरी मार्ग आहे.




पायथ्याची उंची स.स.पासुन ६९३ मी.(२२७३ फुट) आहे.

पायरी मार्ग पार करुन आम्ही  पंधरा मिनिटात मंदिरापाशी  पोहचतो.



मंदिराची स.स.पासुन उंची ७५९ मी.( २४९० फुट) आहे.पायथ्यापासुन आम्ही  जवळपास ६६ मी.(२१६ फुट)  उंची पार करुन येथे  पोहचलो.


 मंदीर कपारित आहे.मंदिराच्या  गाभाऱ्यात काळभैरव नाथाची मुर्ती , हनुमाची मुर्ती, शिवपिंड, तसेच कासव या सर्व मुर्ती आहेत.




या काळभैरव नाथ मंदिराची एक अख्यायिका येथील स्थानिक लोक सांगतात ती अशी, या गावात ठोंबरे नावाचा एक धनगर राहत असे, तो नेहमी सोनई येथील भैरव नाथाचे दर्शन घेण्यासाठी जात असे.परंतू वृध्दापण आल्यामुळे त्याला सोनई येथील भैरव नाथाचे दर्शनाला जाणे कठिण झाले.त्या वेळी भैरवनाथाने त्याला दृष्टांत देऊन सांगितले की तू माझ्या बरोबर ये, पण माझ्या बरोबर येत असताना मागे वळुन पाहू नकोस.ठरल्या प्रमाणे ते निघाले, परंतू काही अंतर चालल्या नंतर धनगरा ने मागे वळुन पाहिले तर भैरव नाथ गुप्त झाले.ते ज्या ठिकाणी गुप्त झाले, त्या ठिकाणी हे मंदीर आहे.

मंदीर पाहुन आम्ही मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या पठारावर फेरफटका मारून आलो .या येथून सभोवतालचा सर्व परिसर खुपच  छान दिसत होता.



फेरफटका मारून आम्ही पुन्हा मंदीरापाशी आलो.

मंदिराच्या मागच्या बाजुला एक छोटे से भुयार आहे, हे छोटे से भुयार पांडवानी केले आहे, असे येथील स्थानिक सांगतात.



     भुयार पाहुन  पायरी मार्ग उतरुन आम्ही परत पायथ्याशी पोहचलो.


      नंतर येथून  तिन किलोमीटर वर असलेल्या बावधन  धनगर वस्तीच्या,

 भैरवनाथाच्या मंदिरापाशी पोहचलो.


भैरव नाथ मंदिरा च्या  येथेच  गाडी पार्क केली .जर आपणाकडे महिंद्रा  जीप सारखी वाहने असतील तर आपण घाट रस्त्याने एक किलोमिटर पर्यत वाहन घेउन जाऊ शकता.टू व्हीलर सुद्धा एक किलोमीटर पर्यंत आरामात घेउन जाता येते.

   भैरव नाथाचे दर्शन घेउन


येथूनच आम्ही  पदभ्रमणाला  सुरुवात  केली .



येथून पाचच मिनिटात आम्हाला ' श्री श्रेत्र  सोनजाई काळूबाई  देवस्थान , बावधन ता..वाई ' असे लिहिलेली कमान लागली.


कमानी तून  आतमधे प्रवेश करुन पुढे निघालो. वाट अतिशय प्रस्त आहे, चार चाकी वाहन आरामात जाऊ शकेल, इतकी मोठी वाट आहे.


कमानी तून प्रवेश केल्यावर खढी चढण व नागमोडी घाट मार्ग असलेला  कच्चा मातीची  वाट सुरु झाली.


दहा मिनिटात आम्ही मारुती मंदीरा पाशी पोहचलो.


येथे दर्शन घेउन पुढे मार्गस्थ झालो .उभी नागमोडी चढण असल्यामूळे चालताना खुपच दमछाक होत  होती.


पायथ्याच्या  भैरव मंदीरा पासुन एक किलोमीटर वर आम्हाला एक  लोखंडी गेट लागले , या ठिकाणा पर्यत आपण गाडी ने प्रवास करुन येऊ शकतो.




या गेट पासुन पुढे वाहनांना प्रवेश बंद असल्याने येथेच चार चाकी व टू व्हीलर गाड्या पार्क केल्या जातात.

     येथून पुढे निघालो.




येथून पुढे २८० मी.नागमोडी वळणावर आम्हाला दगडात कोरलेली गणराया ची सुबक मुर्ती नजरेस पडली.गणरायाचे मनोभावे दर्शन घेउन पुढे निघालो.


     येथून पुढे  थोड्याच वेळात  आम्ही  उजव्या बाजूला असलेल्या तळ्या पाशी पोहचलो.



तळे पाहुन पुढे अवघ्या १०० मी.वर  आम्ही सोनजाई मंदिराच्या परिसरात  पोहचलो.




पायथ्याच्या भैरव नाथ मंदीरापासुन येथे आम्ही पाऊण तास व १.४९ किलोमीटर चे पद्भ्रमण करुन पोहचलो .सोनजाई मंदीराचा परिसर हा जवळपास वीस एकर मधे विखुरलेला आहे.


या येथे सोनजाई मातेचे  प्राचीन मंदीर आहे.



सोनजाई मंदिराच्या पुढे गेल्यावर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने धार्मिक विधी चे आयोजन करण्यासाठी एक भव्य मोठा हॉल आमच्या नजरेस पडला.


येथून पुढे काळूबाई मातेचे मंदीर लागले .मंदिराच्या मागच्या बाजुला भिमाचे खोरे आहे.



  या भिमाच्या खोऱ्याची एक आख्याहिका सांगितली जाते ती अशी,
   कृष्णा नदी दक्षिण वाहिनी करून ती बावधन वरून पुढे जावी यादृष्टीने भिमाने ती दक्षिणवाहिनी करण्याचा निश्चय केला होता. मात्र हे काम कोंबडा आरवायच्या आत पूर्ण व्हायला पाहिजे अशा प्रकारची अट देवीने घातली होती. त्यानुसार भिमाने एकच खोरे मारले इतक्यात कोंबडा अरवला. त्यामुळे भीमाचा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. हा संकल्प पूर्ण होऊ शकला असता तर नदीचा प्रवाह नैसर्गिक राहिला नसता. काळुबाई देविने मुद्दामून लवकर कोंबडा आरवून याच्यामध्ये घाट घातला होता अशा प्रकारची एक दंतकथा या भागातील लोक आजही सांगतात. या खिंडीला "भीमाचे खोरे" म्हणूनही संबोधले जाते.

ही माहिती आम्हाला येथील सोनजाई मंदीरातील  तुकाराम गिरी महाराज यांनी सांगितली.ते या ठिकाणी १९७२ पासुन मंदिराची देखभाळ करित आहेत.




    काळूबाई मंदिराच्या मागच्या बाजुला एक मोठे पठार आहे.हा संपूर्ण परिसर निसर्गाने आच्छादलेला आहे.या येथून संपूर्ण वाई परिसर, पांडव गड, केंजळगड , नागेवडी धरण, धोम धरण, मांढर देवीचा डोंगर हा सर्व परिसर मनमोहक दिसतो.




पठार फिरुन आम्ही  परत मंदीरा पाशी आलो .या येथून आल्या वाटेने परत  पायथ्याशी असलेल्या भैरवनाथ मंदीरा कडे निघालो.येथून संपूर्ण उताराची वाट सुरु झाली .अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात आम्ही  पायथ्यापाशी पोहचलो.

     पायथा ते सोनजाई मंदीर व पठार आणि  परत पायथ्या शी येउन जाऊन आम्हाला साधारणतः साडेचार किलोमीटर व दोन ते सव्वा दोन तास लागले.
     


येथून पुढे साधारणतः तिन किलोमीटर अंतरावर नागेवाडी चे धरण आहे.ते पाहण्यासाठी आम्ही निघालो.



        धरण पाहुन आम्ही पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.

    देवराई - Sacred grove म्हणजे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. हे परंपरेने चालत आलेले सरकारच्या वनखात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले ‘अभयारण्य‘च होय.
     देवाच्या नावाने राखून ठेवले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलांचे हे पुंजके आढळतात.
भारताच्या विविध राज्यांमध्ये पन्नास हजारांहूनही अधिक देवराया आढळतात. महाराष्ट्रातही सुमारे तीन हजार च्या   आसपास  देवराया आहेत. काळूबाई, रानजाई, भैरोबा, म्हसोबा, सोनजाई अशा अनेक देवतांच्या नावाने त्या त्या देवतांची जंगलातील मंदिरे व त्या भोवतालचा परिसर तेथील आदिवासी, गांवकरीच जतन करीत असतात. महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम घाटात अनेक देवराया आढळतात. या देवरांयामध्ये झाडावरचे फूलही निसर्गतःच खाली पडल्याशिवाय देवाला वाहिले जात नाही. देवरायांच्या परिसरात वृक्षतोड, चराई यांनाही बंदी असते. देवराया या जंगलातील आदिवासींनीच जतन केलेले संरक्षित क्षेत्र असल्याने विविध प्रकारचे वनस्पती, प्राणी, कीटक तेथे आश्रय घेतात. कित्येक दुर्मीळ सजीव केवळ देवरायांच्या परिसरात आढळतात. वनस्पतींची येथे कोणतीही हानी होत नसल्याने वनस्पतींच्या जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यातही शेकडो कीटक, कवक, गांडुळांच्या जाती तेथे सापडतात.
    सह्याद्रीच्या कड्या कपारीत हजारो फुट उंचीवर दोन समोर-समोर डोंगरावर सोनजाई देवीचे तर दुसऱ्या डोंगरावर मांढरदेवीचे मंदीर आहे. फार वर्षांपूर्वी पासून या देवींचे नवरात्र काळात मोठ्या भक्ती- भावाने नवरात्र उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. बावधनच्या उत्तरेला तिन  हजार फुट उंच डोंगरावर सोनजाई देवीचे मंदीर आहे.वाई तालुक्‍यात मांढरदेवची श्री काळूआई, रेनावळे येथील श्री काळेश्वरी, ओझर्डे गावातील श्री पद्मावती, आसले गावातील तुळजा भवानी, भुईंज गावातील श्री महालक्ष्मी तसेच सोनजाई गडावर सोनजाई देवीचा जागर नवरात्रात केला जातो.सोनजाई देवीचे नवरात्र उत्सव साजरे करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे.सोनजाई देवी देवस्थान व मंगल गिरी महाराजांच्या पुढाकाराने या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येते.
   या नऊ दिवसांमध्ये दररोज पहाटे चार वाजता काकडा आरती, पाच वाजता पूजा आरती, सकाळी ६ ते ९ पर्यंत सप्तशती पठाण,व हवन, सकाळी १०  ते १२.३०  पर्यंत श्रीमददेवीभागवत कथा, दुपारी १२.३०  ते ४ पर्यंत भोजन व विश्रांती, दुपारी ४ ते ६  कीर्तन व संध्या आरती, रात्रो ९ ते १० वाजता देवी जागर करण्यात येतो.
    वाईच्या दक्षिणेस सह्याद्री पर्वत रांगांमधील डोंगरावर सोनजाई देवीचे मंदिर आहे. त्यामुळेच या डोंगराला सोनजाई डोंगर म्हणतात. डोंगरावर जाण्यासाठी उत्तरेला वाईहून व दक्षिणेला बावधनहून अशा दोन्ही बाजूंनी पायवाट आहे. सोनजाईचे दगडी मंदिर असून, आतमध्ये पिण्याच्या पाण्याचे कुंड आहे. मंदिरालगतच्या कुंडात वर्षभर पाणी असते.

Comments

Popular posts from this blog

पद्भ्रमण ठोसेघर ते जुंगटी

कान्हुर पठार

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर