कुडे बौद्धकालीन लेणी

        कुडे मांदाड बौद्धकालीन लेणी 
                कुडा गाव 
    ता : तळा.
    जि: रायगड.


      कुडे मांदाड ही बौध्दकालीन लेणी खाजगी भालगाव पुलामुळे मुरूड शहरापासून दक्षिणेस केवळ २५ किमी. अंतरावर आहेत. मुंबई-गोवा हाय वे वरील माणगांवपासून २१ किमी वर हे गाव राजपूरी खाडीच्या मांदाड उपखाडीवर असून या गावाच्या पूर्वेकडील महोबा डोंगरावर ही लेणी आहेत. 
   कुडा हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. लेणीपर्यंत जाण्याकरिता राजापुरी येथील खाडी ओलांडून जावे लागते म्हणून खूप वर्षे ही लेणी फारशी प्रसिद्ध नव्हती. लेणीजवळ मांदाड बंदर आहे. मांदाड म्हणजे रोमन लेखकांनी सांगितलेले मॅंडागोरा बंदर. मांदाड येथील उत्खननात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची विटा व खापरे सापडले आहेत.हे सातवाहन साम्राज्यात महाभोजांच्या मांदव घराण्याचे केंद्र होते.

         ही  लेणी पहाण्यास स्वताचे  वाहन असेल तर थेट लेण्यांपर्यंत पोहचता येते.
इ.स.पूर्व १०० वर्षाच्या काळात दंडा राजपुरी येथे सातवहनांचे सामंत महाभोज याची राजधानी होती. त्यांनी बौध्द भिक्षुकांच्या वास्तव्यासाठी खोदलेली ही लेणी समुद्रसपाटीपासून २०० फुट उंच असून एका डोंगर रांगेत इ.स.१८४८ साली डोंगराच्या कपारीतील या लेण्यांचा शोध लागला. 

रौद्र कातकाळातील ही २६ लेणी दोन स्तरांत असून लेणी क्र. १ ते १५ खालच्या रांगेत व लेणी क्र. १६ ते २६ वर आहेत. 


यात ५ चैत्य व २१ विहार असून त्यात ,

ब्राम्ही लिपीतील प्रकृत व संस्कृत शिलालेख आहेत.

कुड्याच्या २६ गुहांपैकी ४ चैत्यगृहे आहेत. यांचे निरीक्षण केले असता क्रमशः होत गेलेला विकास दिसून येतो. येथील भिंतींवर आणि खांबांवर असणारे शिलालेख दात्यांची (दान देणाऱ्यांची) माहिती देतात. येथील क्रमांक १ चा चैत्य पुढील विकास दाखवितो, 

ज्यामध्ये आपल्याला मंडप, अंतराळ आणि स्तूप असलेले गर्भगृह या भागांनी युक्त मंदिर पहावयास मिळते. 

स्तूपयुक्त गर्भगृहाला लागून कोरलेले अंतराळ हे येथे आढळणाऱ्या स्थापत्यशैलीतील नवे वैशिष्ट्य आहे. 
अंतराळामध्ये भिंतींलगत बसण्याकरिता ओटे केलेले दिसून येतात. व्हरांड्याच्या आतील बाजूस कोरलेल्या लेखात सुलसदत आणि उतरदत यांचा मुलगा शिवभूती याने हे दान दिल्याची नोंद सापडते. सदर लेण्याचा दाता शिवभूती आणि त्याची पत्नी नंदा हे दोघेही सदगेरी विजय याचा पुत्र महाभोज मांदव खंदपालित याच्याकडे लेखक म्हणून कामाला होते. विशेष म्हणजे स्वतः दात्यानेच हा लेख कोरला आहे. त्यामुळेच की काय, लेखातील अक्षरे प्रयत्नपूर्वक आकर्षक आणि सुबक वळणाची काढली असावीत. चैत्य क्र. ६ हा येथील सर्वात शेवटी कोरला गेलेला, सर्वात मोठा आणि सर्वात चांगला चैत्य असून तो योग्य प्रकारे, काम अर्धवट न सोडता पूर्णत्वाला नेला आहे. 

कुडा येथील शिल्पांच्या ठेवणीवरून ती सातवाहनकालीन असावीत असे अनुमान करता येते. 

ही शिल्पे कार्ले येथील शिल्पांपेक्षा किंचित ओबडधोबड, मात्र कान्हेरीच्या (चैत्य क्र. ३) तुलनेत उजवी आहेत.

 आत एक भव्य स्तूप आहे. 

लेण्यांच्या सुरूवातीला असलेले खांबदेखील खूप देखणे असून येथील पाण्याची टाकीही पाहण्यासारखी आहेत.

     हा सगळा परिसर पश्चिमाभिमुख असून येथून समोर अथांग अरबी समुद्र पूर्वेस तळागड,  उत्तरेस घोसाळा किल्ला दिसून येतो. शतकानुशतके समुद्रावरून येणारे जोरदार वारे नैरुत्य मान्सुन पावसाचे तडाखे यांना ही लेणी तोंड देत असल्यामुळे काळाच्या प्रवाहात काही शिलालेख व प्रतिमा झिजून अस्पष्ट झाल्या आहेत. तरीदेखील बरेच शिलालेख अजूनही वाचता येतात.

 ही लेणी म्हणजे भिक्षुकांचे ध्यानधारणा व निवास करण्याचे एकांतातील अतिशय निसर्गरम्य परिसर असलेले त्याच काळातील मोठे स्थान असावे असे वाटते. 
एससंध दगडी डोंगर कोरून निर्माण झालेल्या लेणी पहाताना पहाणार्‍याच्या चेहर्‍यावर आश्चर्यमिश्रीत भाव सहज उमटतात.

Comments