संग्राम दुर्ग/ चाकणचा भुइकोट
संग्राम दुर्ग/चाकणचा भुईकोट
चाकण,
ता : खेड
जि : पुणे
संग्राम दुर्ग आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे.प्राचिनकाळी चाकण हे घाटमाथ्यावरील व्यापारी केंद्र होते. त्याच्या रक्षणासाठी चाकणचा भूइकोट बांधण्यात आला. या किल्ल्यावरुन घोटण, पौड या मावळांवर आणि घोडनेर, भीमनेर या नेरांवर नजर ठेवता येत असे.
पुण्यापासून २० मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे वाहन उद्योगाने प्रचंड विस्तारते शहर आहे. चाकणमध्ये दोन्ही पैकी कुठल्याही वेशीतून प्रवेश केल्यानंतर जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरून चालत आल्यास अवघ्या काही अंतरावर भग्नावस्थेतील तटबंदी दिसू लागते. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या चाकण गावात संग्रामदुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे.
शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाहीची नोकरी सोडून स्वराज्यात सामील झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी स्वराज्यात येताना चाकणसारखा अतिशय देखणा आणि मजबूत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला. शिवरायांसारखा रत्नपारखी राजा, त्यांनी ह्या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामीलच करुन घेतले नाही तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारीपण बहाल केली. स्वराज्यावर एकापेक्षा एक भीषण संकटे येऊनसुद्धा फिरंगोजीनी चाकण आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, अतिशय मेहेनतीने राखला, सजवला.
शाहिस्तेखानाच्या बलाढ्य फौजेला चाकणचा भुईदुर्ग म्हणजे तसे अगदी मातीचे छोटेसे ढेकूळ. तरीही शहिस्तेखानाच्या अवाढव्य लमाजम्याला हा एक किल्ला घ्यायला तब्बल ५६ दिवस लागले. फार फार उमेदीने आणि प्रचंड सैन्यानिशी हा खान दख्खनेत आला होता, मात्र चाकणच्या किल्ल्याचा एक टवका उडवायला एवढा संघर्ष करावा लागल्याने खान नाराज झाला. या किल्ल्याची सध्याची स्थिती पाहिल्यास काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल, अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.
शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार असा हा चाकणचा दुर्ग आहे. बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शाहिस्तेखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला. या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला. या दुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता. त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती. संग्रामदुर्ग म्हणजे काही खूप भक्कम दुर्ग नव्हे.आधीच तो स्थलदुर्ग; पण खंदकाने वेढलेला. त्यामुळे थोडी बळकटी आलेला. खडकात पाणीही होते, शिवाय दिवस पावसाचे होते.२१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला. हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला. तोफा -बंदुकांचा काही उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर शाहिस्ते खानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा केली. ताबडतोब कामाला सुरुवात झाली. हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते.आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते. फिरंगोजी नरसाळ्याने सयाजी थोपटा, मालुजी मोहिता, भिवा दूधावडा, बाळाजी कर्डीला याच्यासह शूर ३०० - ३५० लोकांनीशी चाकण तब्बल ५६ दिवस झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला. मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली.पूर्वेच्या कोपऱ्याचा बुरुज अस्मानात उडाला. त्यावरचे भिवा दूधावडासह सव्वाशे मावळेही हवेत उडाले. आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले. फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली. तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मोघली सैन्याने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. मावळ्यांचे साहसपर्व कडू घोट घेत संपले.
चाकणचा किल्ला भुईकोट प्रकारात येत असून कालौघात किल्ल्याची पडझड झाली असून फारसे अवशेष बघायला मिळत नाहीत.
चाकणचा किल्ला पूर्व पश्चिम असा असून पूर्वेकडून आपण किल्ल्यात प्रवेश करतो.
प्रवेश करतांना खंदक आणि तटबंदी पाहायला मिळते.
त्यावरून किल्ल्याची सुरक्षा चोख असावी असे कळते.
किल्ल्याची तटबंदी उंच असून दगड आणि विटांचे बांधकाम आढळून येतं.
प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला देवडी आहे. प्रवेशद्वार पाहून सरळ किल्ल्यात गेल्यास श्री दामोदर विष्णू मंदिर बांधलेले दिसते आणि ,
मंदिराच्या दोन्ही बाजूला तोफा ठेवलेल्या असून ,
बाजूला कातळात कोरलेली ३ शिल्पे पाहायला मिळतात आणि मंदिराच्या विरुद्ध दिशेला एक तोफ ठेवलेली दिसते,
त्याच्याच बाजूला मशिद आहे. मंदिर आणि मशिद अलिकडच्या काळातील बांधणीचे असावे.
तिथूनच किल्ल्याच्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर न्ह्याहाळता येतो.
किल्ल्याची दुरुस्ती सिमेंट वापरून करण्याचा प्रयत्न केला असावा असा तटबंदीवरील कामावरून अंदाज लावता येतो. तटबंदीवर बंदुका डागण्यासाठी आजूबाजूला सलग ५ ते ६ खोबण्या केलेल्या दिसतात.
तटबंदीवरून ३ बुरुज स्पष्टपणे पाहता येतात.
अतिक्रमणामुळे आणि अनधिकृत बांधकामामुळे किल्ल्यातून जाण्या येण्याचा सिमेंटचा रस्ता बांधण्यात आला आहे.
दुर्ग भ्रमंती मधे डॉ.अजय इंगळे व मी सुशिल दुधाणे सहभागी झालो होतो.
🔅 facebook link
https://www.facebook.com/sushil.dudhane
👉 Add me as a Friend
🔅 Personal Website link
http://www.trekkersushil.in/
👉 Please Visit
🔅 Instagram Link
https://instagram.com/dudhanesushil?igshid=zomighmlsbrd
👉 Please Follow
🔅 YouTube Channel
https://www.youtube.com/channel/UCM1y1OfkIn3O3SvD636hSsA
👉 Do Subscribe , Like & Share
🔅 Personal Blog link
trekkersushil.blogspot.com
👉 Please Follow
Regards
Sushil Dudhane
9822377653
Comments
Post a Comment