शनिवार वाडा
शनिवार वाडा
शनिवार पेठ,पुणे.
शनिवार वाडा हा महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक १७ जून, इ.स. १९१९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती.
ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत.
वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत.
येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दार/मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत.
सर्व दरवाजे टोकदार कमानींमधे असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत.
यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे.
वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.
दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.
एक मुसलमान सरदार पत्रात लिहितो: "बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो. मात्र आत स्वर्गासारखा दिसतो."
शनिवारवाड्यातील गणेश रंगमहाल हा नानासाहेब पेशव्यांनी १७५५मध्ये बनवून घेतला.
गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे एका वेळीशंभर नर्तकी नृत्य करू शकत असत. महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशमूर्ती होती,
तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती.
फुलांचा सुगंध व कारंज्यांचा नाद यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे..
संभाजीमहाराजांचे पूत्र शाहूमहाराज मोगलांच्या कैदेतून सुटले. त्यानंतर त्यांनी सातारा येथून राज्यकारभार करण्यास सुरूवात केली. पुण्याचे सरसुभेदार बाळाजी विश्वनाथ होते. त्यांना १७१३ मध्ये शाहूंनी ‘पेशवे’ हे पद दिले. बाळाजी विश्वनाथांनी आपला कारभार सासवड व सुप्यावरून सुरू केला. १७२० ला बाळाजी विश्वनाथ मृत्यू पावले. त्यानंतर त्यांचा थोरला मुलगा बाजीरावला १७ एप्रिल १७२० ला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बहाल केली. सुरूवातीची काही वर्षे त्यांनी सासवड व सुप्यावरून पेशवाईचा कारभार सुरू केला. पाण्याची कमतरतता व राजकीयदृष्ट्या सोयीचे म्हणून पुणे येथे कारभार करण्याचे ठरले. कारण जवळच असलेले राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड सारखे बळकट किल्ले होते. पुण्यात पेशव्यांचे स्वत:चे घर नव्हते. पुणे पूर्वी फार लहान गाव होते. छोट्या छोट्या वस्त्या होत्या. यातच कसबा पेठ होती. पेठेजवळ शनिवार पेठ होती. लाल महालाच्या शेजारीच बाजीरावांनी स्वत:चा वाडा बांधण्याचे ठरविले. वाड्याची पायाभरणी शनिवार, १० जानेवारी १७३० ला केली गेली. बांधकाम २२ जानेवारी १७३२ रोजी पूर्ण झाले. १६,०१० रुपये खर्चून हा वाडा उभारला गेला. वाडा शनिवारपेठेत होता. म्हणूनच की काय या वाड्याचे शनिवारवाडा असे नाव ठेवले असावे. तटबंदी आणि बुरुज
शनिवारवाड्याचा आकार चौकोनी असून जवळपास ६.२५ एकर जमीन वाड्याने व्यापली आहे.
तटबंदीची उंची अंदाजे ३३ ते ३४ फुट असून खालील १० ते १८ फूट उंचीचा तट हा दगडी चिरेबंदी आहे तर वरचे बांधकाम विटांचे आहे.
संपूर्ण वाड्याभोवती असलेल्या तटबंदीमध्ये बंदुकीतून गोळ्या झाडण्यासाठी जंग्या अर्थात भोके ठेवण्यात आली आहेत. तटास एकूण ९ बुरुज आहेत.
या सर्वांवर तोफा बसवण्याची व्यवस्था असे.
उत्तर पेशवाई मध्ये वायव्य बुरुजास तोफेचा बुरुज तर पश्चिम बुरुजास पागेचा बुरुज म्हणत. तट रुंद असल्याकारणाने आत शिपायांच्या खोल्या होत्या.
तटावर जाण्यासाठी एकूण नऊ जिने १ दिल्ली दरवाज्याजवळ, १ मस्तानी दरवाज्याजवळ, १ नारायण दरवाज्याजवळ, २ पागेच्या बुरुजाजवळ आणि २ तोफेच्या बुरुजाजवळ, २ खिडकी दरवाज्याजवळ आहेत.
पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१४०२ हिरे, ११३५२ माणके, २७६४३ पाचू, १७६०११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडुर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १५६२ पिरोजा, १९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना दुस-या बाजीरावांनंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब (दुसरे) यांना मिळाला. कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्येकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्या वेळी ब्रिटिशांना मिळाला होता.
Comments
Post a Comment