शिवराज्याभिषेक सोहळा
३४४ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा
दुर्गदुर्गेश्वर रायगड
रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी, आम्हा ट्रेकर्स मंडळींची जणू पंढरीच. जसे वारकरी विठूरायाच्या भेटीला व्याकुळ झालेले असतात, त्यासाठी ते दरवर्षी पंढरपूरला जातात.त्याच प्रमाणे आम्ही राज्यभिषेक सोहळ्याला दरवर्षी रायगडला जातो. तशी ही माझी राज्याभिषेकेच्या दिवशी रायगड वर जाण्याची पहीलीच वेळ. या वर्षी आम्ही रायगड ला जाण्याचा बेत आखला .व ५ जून २०१८ ला पहाटे ६ वाजता ताम्हिणी घाट मार्गे रायगडाकडे निघालो.
प्रथम आम्ही जिजाऊ मातेच्या समाधीचे दर्शन पायथ्याशी असलेल्या पाचाड या ठिकाणी जाऊन घेतले.
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड
या गावी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मां साहेबांसाठी एक राजवाडा बांधून
घेतला होता.आज या वाड्यामध्ये इमारतीचे अवशेष व जिजाऊसाहेब, शिवाजीमहाराज
बसत असलेले ताक्याची विहीर पहावयास मिळते.या येथे जिजाउंसाहेबांची समाधी आहे. शिवरायांच्या राज्याभिशेकानंतर बाराव्या दिवशी १७ जुन १६७४ रोजी जिजाउंच्या पाचाड येथील वाड्यात निधन झाले.त्यानंतर त्यांची समाधी त्यांच्या दहन
स्थानाजवळ बांधण्यात आली. कालोघात या समाधीचीही अवस्था हि दयनीय झाली होती. इ.स.१९४८ मध्ये समाधीचा जीर्णोध्दार तिच्या मूळ स्वरुपात करण्यात आला.
समाधी चे दर्शन घेउन जिजाऊ वाडा पाहण्यासाठी गेलो.
वाडा पाहुन झाल्यावर आम्ही रायगडा कडे प्रस्थान केले.
दिड तासात आम्ही गडावर पोहचलो. बाजारपेठ येथे टेंट लावला.
पेटपूजा उरकून झाल्यावर संपूर्ण गड फेरी मारली.
६ जून ला पहाटे लवकर उठलो व राज्यभिषेक सोहळा पाहण्यासाठि निघालो.
युवराज संभाजी राजे छत्रपती, कोल्हापुर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात आला.
हा सोहळा याची देही, याची डोळा पाहता आला.
त्यानंतर आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. या वेळेस दरवर्षीच्या तुलनेत गर्दी जास्त होती.
एवढी प्रचंड गर्दी मी प्रथमच अनुभवत होतो.
गड उतरत असताना प्रचंड धक्काबुक्की व चेंगराचेंगरी होत होती.राज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर बरेचशे शिव भक्त गड पायउतार झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलीस व कार्यकर्ते यांची संख्या गर्दीच्या तुलनेत अपुरी होती.
महादरवाजाच्या जवळ जास्त प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. पिण्याच्या पाण्याची प्रचंड कमतरता जाणवली, स्टॉल धारक यांच्या कडे सुद्धा पाण्याच्या बाटल्या शिल्लक नसल्यामुळे खुप हाल झाले. जवळपास सात तासांच्या अथक व हाल-अपेष्टा सहन करित आम्ही पायथ्याशी पोहचलो.
आजच्या राज्याभिषेक सोहळा मोहिमेत हेमंत पवार, चंद्रभान पोखरकर सर, सुनील घम, अजिंक्य पोखरकर व मी सुशील दुधाने यांचा सहभाग होता.
शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानी मातेचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.
Comments
Post a Comment