बनेश्वर मंदीर
बनेश्वर मंदीर
नसरापूर
पुण्यापासुन साधारणतः ३५-३६ कि.मी. अंतरावर हे बनेश्वर मंदीर हे ठिकाण आहे. पुणे-सातारा मार्गावर खेड शिवापूरचा टोलनाका ओलांडून पुढे गेल्यावर 'नसरापूर' साठी फाटा लागतो,या फाट्यापासुन दोन किलोमीटर अंतरावर बनेश्वर मंदीर आहे.
बनेश्वर हे पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे असलेले महादेवाचे मंदिर आहे.
पुणे शहरापासून नैऋत्य दिशेला ३६ किलोमीटर अंतरावर एका निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे.आजूबाजूस दाट जंगल आणि निसर्गरम्य परिसर हे ह्या जागेचे वैशिष्ट्य.
बनेश्वर मंदिराची रचना मध्यकालीन वास्तुशिल्पाप्रमाणे असून, ह्या मंदिराची स्थापना पेशवे बाजीराव ह्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे, ह्यांनी १७४९ मध्ये केली. मंदिरास उभारण्यास एकूण खर्च ११४२६ रुपये ८ आणे आणि ६ पैसे असा आला. मंदिराच्या आवारात एक विशाल घंटा आहे. चिमाजी अप्पा ह्यांनी एका युद्धात पोर्तुगीस सैन्यास पराभूत केल्याचे विजयचिन्ह म्हणून ही घंटा ओळखली जाते. ह्या घंटेवर १६८३ हे साल असून एक क्रॉस आहे. त्याअर्थी ही घंटा एका चर्चमधील असावी असे कळून येते.
मंदिराच्या भोवतीचे वन संरक्षित आहे. या वनात अनेक फुलझाडे असून ते विविध प्राणी पक्षी यांचे आश्रयस्थान आहे. निसर्गप्रेमी अन यात्रेकरूंसाठी हे एक आवडीचे स्थान आहे. मंदिराच्या मागील बाजूस शिवगंगा नदीवर असलेला धबधबा हे या भागातील प्रमुख आकर्षण आहे. धबधब्याच्या बाजुला करंजाई देवीचे मंदीर आहे, या मंदिरात जिजाऊ माता दर्शनाला येत असत, असे येथील स्थानिक लोक सांगतात.
बन म्हणजे जंगल आणि ईश्वर म्हणजे देव. जंगलातला देव म्हणून बनेश्वर. या मंदिराची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी भव्य प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या प्राकाराभोवती तटबंदी होती. प्राकारात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या उतरून जावं लागतं.
तिथं पाण्याचे चार कुंड आहेत.
त्यापैकी दोन पायऱ्या उतरल्यानंतर लगेच दिसतात. तिसरे डाव्या हाताला आणि चौथे उजव्या बाजूला आणि गाभाऱ्याजवळ आहे.
मंदिराची रचना हेमाडपंती पद्धतीनं काळ्या दगडांत केली आहे.
बांधकामामध्ये लाकडाचा वापर अजिबात केलेला नाही. सभागृहाबाहेरच्या स्तंभांवर कोरीवकाम केलं आहे. मंदिराचा डोलारा सांभाळण्यासाठी पायातल्या दगडांना मधोमध छिद्र पाडून त्यात लोखंडी गजांच्या साह्यानं मजबुती दिली आहे. शंकराच्या अनेक मंदिरांप्रमाणेच बनेश्वरमध्येही गाभाऱ्यात पायऱ्या उतरून जावं लागतं. नित्य पूजेतल्या पिंडीखाली छोटं तळघर आहे आणि त्यात पाच शिवलिंग आहेत.
मंदिराचा मुख्य गाभारा आणि सभागृहाच्या इमारतीला लागून पाण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण मार्गिका केल्या आहेत. त्यांचा आकार मृत्युंजय यंत्रासारखा आहे. या मार्गिकेच्या दगडांची रचनाही आगळी आहे. समोरचे दोन आणि डावीकडचा एक, असे तीन कुंड परस्परांशी जोडले आहेत. प्रत्येक कुंडाला दोन आरपार छिद्र आहेत. त्यापैकी खालचं छिद्र छोटं आणि वरचं मोठं आहे. पहिल्या कुंडातल्या पाण्याची पातळी सम राहावी म्हणून ही योजना होती. पहिल्या कुंडातलं पाणी दुसऱ्या कुंडात आणि त्यातून तिसऱ्या कुंडात जातं. तिसऱ्या कुंडातील अतिरिक्त पाणी परस्पर मंदिराच्या प्राकाराबाहेर जातं. या व्यवस्थेमुळे तिन्ही कुंडांमध्ये पाण्याची पातळी समान राहते. या सर्व कुंडांमध्ये जिवंत झरे आहेत.
मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर उजव्या बाजूला गायमुख आहेत.
ते जमिनीच्या पातळीखाली आहे. त्याच्या शेजारीच चौथं कुंड आहे. या कुंडातल्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर ते अंतर्गत वाहिनीद्वारे गाभाऱ्यातील शंकराच्या पिंडीवर पडतं. पाण्याच्या या अद्वितीय व्यवस्थापनामुळे या मंदिराला जलमंदिरही म्हणतात. मंदिराला लागून वन खात्यानं उपवन विकसित केलं आहे. मंदिराच्या आवारात सभागृहासमोर नंदी आहे. त्याला लागून पहिला कुंड आणि ,
त्यामागं गणेश मंदिर आहे.
खुप सुंदर माहिमा आहे सर
ReplyDeleteधन्यवाद
Delete