पळस देव
पळस देव
भटकंती प्राचीन मंदिरांची
५ मे २०१९
ता : इंदापूर
जि : पुणे
मार्ग : पुणे , भिगवण, पळस देव
अंतर : कात्रज पासून १२६ किलोमीटर.
पळस देव हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. जुने पळसदेव गाव उजनी धरण जलाशयात बुडाल्यामुळे नव्याने वसवलेले हे भीमा नदीकाठी असलेले गाव आहे .
पुण्यापासून पळसदेव गाव १२० किमी.वर आहे.
मंदिर यादवकालीन असावे. त्याच्या पक्क्या विटांनी बांधलेली शिखरे आजही टिकून आहेत.
मंदिर आवारात सतीशिळा, वीरगळ, (भंगलेला) घोडा, मारुतीची मूर्ती, दीपमाळेचे अवशेष भक्कम विटांची भग्न ओवरी असे अनेक अवशेष पाणी ओसरले की पाहता येतात.
मंदिरासमोरची विटांची ओवरी ही फलटणकर निंबाळकरांनी बांधली असे सांगितले जाते. मूळ मंदिरातील काही मूर्ती नव्याने बांधलेल्या मंदिरात ठेवल्या आहेत.
उन्हाळ्यात धरणाचे पाणी आटले की पाण्याखाली बुडालेले पळसदेवाचे मंदिर दिसू लागते. पुणे-सोलापूर रस्त्यावर भिगवण हे प्रसिद्ध गाव आहे. या गावापासून काही अंतरावर पळसदेव गावाचा फाटा फुटतो. गावातून गेलेला तो रस्ता थेट पुढे कच्चा होत थेट उजनी नदीच्या पात्रात पोहोचतो.
एका छोट्याशा होडीप्रवासाने
पाण्यातून वर आलेल्या पळदेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचता येते. या मंदिराशेजारी आणखी एक मंदिर आहे, पण कोणत्या देवाचे ते समजत नाही. समोरच्या टेकाडावर एक रिता गाभारा असलेले मंदिर आहे.
या मंदिराभोवती कातळी भिंतींवर रामायण कोरले आहे.
१९७५ साली उजनी धरण पूर्ण झाले, आणि त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पळसदेव गांव पाण्याखाली गेले. गांवाबरोबरच उजनी अर्पण झाली गावात असलेली पाच यादवपूर्वकालीन मंदिरे. पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या पळसदेव गांवात असलेल्या पाच मंदिरांपैकी पळसदेव मंदिर भव्य आहे. २०१६ साली पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे पाणलोट क्षेत्रातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे पाण्याखाली असलेली मंदिरे सर्वांसाठी खुली झाली, आणि मंदिरांना बघण्यासाठी लोकांची पावले पळसदेव गावाकडे वळू लागली. पळसदेव मंदिराला आजूबाजूच्या परिसरात सरडेश्वर नावाने ओळखले जाते. नहुष राजा शापामुळे सरडा झाला आणि तो या ठिकाणी पडला अशी दंतकथा ह्या परिसर सांगितली जाते.
जुन्या काळात पळसदेव गाव रत्नपूर नावाने ओळखले जात होते आणि बाजारपेठेचे मुख्य केंद्र होते. या परिसरात एकूण पाच मंदिरे आहेत. त्यापैकी पळसदेव मंदिर आकाराने व उंचीने मोठे आहे, त्यामुळेच मंदिर पाण्याखाली गेलेले असले तरी मंदिराचा कळस पाण्याच्या वर असतो.
पळसदेव मंदिर
भीमा नदीच्या संगमाच्या ठिकाणी शंकर आणि विष्णू या दोन्ही देवतांचे मंदिर बांधून त्यांची प्रतिष्ठापना करावी ह्या उद्देशाने शके १०७९ (सन ११५७) मध्ये दंडनायक चंगदेव याने या विष्णूगृहाची उभारणी केली. बसवण उपाध्यायाने ईश्वर संवत्सरात ह्या प्रासादाची निर्मिती केली असावी. तसेच आपल्या भाई नाव असलेल्या पुत्राच्या ठेवीतील सोन्याची १००० नाणी, प्रासादासाठी करमुक्त जमीन (अकरवातोत्तर) आणि १०० सुवर्णमुद्रा दयाप्रसाद (दाउपसाउ) अर्पण केल्या. हे विष्णूगृह शके १०७९ साली पूर्ण (मंगलमहर्षी) झाले. पळसदेव शिवमंदिराच्या शेजारी असलेल्या विष्णूमंदिराच्या सभामंडपातील स्तंभावर दोन ओळीचा शिलालेख कोरलेला असून त्यात मंदिरासंदर्भातील वरील माहिती मिळते.
मंदिरातील शिलालेख
विष्णूमंदिर आणि शिवमंदिर पश्चिमाभिमुख असून या दोन्ही मंदिरांची वास्तूरचना साधारणपणे सारखीच आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह, तीनही बाजूंना असलेली प्रवेशद्वारे, तीनही बाजूंना असलेले मुखमंडप अशी रचना दोन्ही मंदिरांची आहे. विष्णू मंदिराचा शिखर पूर्णपणे नष्ट झाले आहे. शिवमंदिरावर गर्भगृहावर मुख्य शिखर असून इतर तीन मुखमंडपावर प्रत्येकी एक शिखर असावे.
मंदिराचे शिखर भूमिज पध्दतीचे असून ते सप्तभूमिज आहे. शिखरावर गवाक्षे असून त्याच्या लतापट्टावर वर्तुळाकार सर्पवेटोळे दिसतात. मंदिरांतील खांबावरून हि दोन्ही मंदिरे यादवपूर्व काळातील असे वाटते.
मंदिराचा भूमिज कळस
शिवमंदिर २८ फुट उंच असून दगडी बांधकाम ८ फुटांचे आणि त्याच्यावरती विटांचे बांधकाम आहे. मंदिराचे प्रवेशद्वार पाचशाखीय असून त्याच्यावर व्याल, पद्मपत्र, स्तंभशाखा, वेलीशाखा, वाद्यांसहित गंधर्व आणि सूरसुंदरी आहेत. शिवमंदिराचे मूळ शिखर कोसळल्यानंतर उत्तरकाळात मूळ शिखराप्रमाणेच नवीन शिखर बांधले असावे. शिखर उत्तरकाळात पुन्हा बांधले ह्याला पुरावा बांधकामात वापरलेला चुना आणि भाजक्या पक्क्या विटा. शिखरावर असलेल्या गवाक्षांच्या कमानीत विटांचे पुढे आलेले कंगोरे घासुन तयार केले आहेत. शिखरावरील कळशाचा आकार अमलाकर असून सर्वात वर स्तुपिका आहे. स्तंभांवरील नाजूक शिल्पकाम सुंदर आहे. स्तंभांवरील साखळदंडांची नक्षी, छोट्याछोट्या घंटांची नक्षी बघून त्याकाळातील शिल्पकारांचे दगडावर कोरीवकाम करण्याचे कसब दिसून येते. शिवमंदिरातील शिवलिंगाची स्थापना पुनर्वसित झालेल्या पळसदेव गावात नवीन भूमिज पध्दतीचा प्रासाद बांधून त्याच्यात करण्यात आलेली आहे. तसेच परिसरात सापडलेल्या शेषशायी विष्णूचीही प्रतिस्थापना करण्यात आलेली आहे.
मंदिर परिसरात अनेक वीरगळ, भग्न नंदी, दशावतार शिल्पपट, उमा-महेश्वर शिल्प, सतीशिला आणि मंदिराचे अवशेष पडले आहेत. मंदिराच्या समोर विटांनी बांधलेली प्रशस्त धर्मशाळा आहे. धर्मशाळा कमानीयुक्त असून तिचे छत अष्टकोनी व वर्तुळाकार पध्दतीने बनवले आहे. ब्रिटीश गॅझेटिअरनुसार या धर्मशाळेचे आणि मंदिराच्या प्राकाराचे बांधकाम १६८० साली बारामती येथील बाबुराव जहागीरदार यांनी केले. विष्णूमंदिर आणि शिवमंदिर यांच्या भोवती तटबंदीसदृश्य भिंत बांधलेली आहे
पळसदेव गावाजवळून वाहणाऱ्या उजनी नदीवर पाण्यात उतरण्यासाठी घाट बांधले होते. घाटाजवळ काशीविश्वेश्वर आणि सोमेश्वर दोन मंदिर आहेत. ही मंदिर कायम पाण्याखाली असतात. त्याशिवाय थोडेसे उंचीवर पश्चिमाभिमुखी विष्णूचे अजून एक मंदिर आहे. हे मंदिरसुध्दा अर्धे पाण्याखाली असते. विष्णूमंदिराकडे जाताना नदीतीरावर दुर्लक्षित असलेले नागशिल्प दृष्टीस पडते. पश्चिमाभिमुख असलेल्या मंदिराच्या शिखराच्या पूर्वाभिमुख गवाक्षामध्ये योगविष्णूची सुंदर मूर्ती आहे. त्याचबरोबर मंदिराच्या बाह्यभिंतीवर विष्णूच्या विविध रूपातील मुर्त्या, सूरसुंदरी आणि रामायणातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. वाली-सुग्रीव युध्द, पंचमुखी रावण, हनुमान आणि अशोकवाटिका, सेतू बांधण्यासाठी डोक्यावर दगड वाहून नेणारे वानर, झाडाखाली बसलेली सीता, सेतू निर्माण करणारी वानरे इ. शिल्पांकने अप्रतिम आहेत. सेतूचे बांधकाम करणाऱ्या वानरांचे शिल्पांकन करताना कारागिराने समुद्रातील मासेसुध्दा कोरले आहेत.
*सुरसुंदरी*
अनेक मंदिराच्या बाह्यभिंतीवर स्त्रियांची शिल्पे कोरलेली असतात. मंदिर वास्तुशास्त्रात या शिल्पांना सुरसुंदरी या नांवाने ओळखले जाते. शिल्पप्रकाशानुसार आणि क्षीरार्णवानुसार अनुक्रमे १६ व ३२ सुरसुंदरी आहेत. सुरसुंदरी मंदिरातील अंतराल, सभागृह, प्रदक्षिणापथ, स्तंभ किंवा बाह्यभिंतीवर कोरलेल्या असतात. ह्या सुरसुंदरींचे मंदिरात काय प्रयोजन असू शकते?
आपण देवदर्शनासाठी मंदिरात जातो. पण मंदिरात खरेतर मोक्षप्राप्तीसाठी करण्याच्या उपासनेसाठी जायचे असते. मोक्षप्राप्तीसाठी विकार किंवा विषय नष्ट होणे आवश्यक असते. मनात विषयाची इच्छा असेल तर मोक्ष मिळत नाही. मंदिरात साकारलेल्या सुरसुंदरी रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श या आणि इतर विकारांची आपल्याला कल्पना देतात. तसेच त्या आपल्याला स्वतःची ओळख, निर्मल दृष्टी इ. गोष्टीसुध्दा सुचवतात. मंदिरात मोक्ष सहजसाध्य आहे आणि त्याचबरोबर मंदिर आकर्षित करण्यासाठी ह्या सुरसुंदरी शिल्पांचा उपयोग होता. सुरसुंदरी शिल्प सुडौल कमनीय बांध्याच्या, बारीक कटीप्रदेशाच्या असतात.
पळसदेव मंदिराच्या बाह्यभिंतीवर सुरसुंदरी नसल्या तरी दुसऱ्या काठावर असलेल्या विष्णूमंदिरात अनेक सुरसुंदरी शिल्प आहेत. ह्या मंदिरात आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहून केसरचना ठीक करणारी दर्पणा, लहान बाळाला डाव्या कडेवर घेऊन उभी असलेली पुत्रवल्लभ किंवा मातृमुर्ती, दोन्ही हातांनी ओले केस पिळून काढणारी कर्पूरमंजिरी, उजव्या हातात म्हाळुंगसदृश फळ आणि डाव्या हातात चवरी घेतलेली चामरा किंवा चामरधारिणी, सुंदरी आणि तिचे वस्त्र खेचणारे खट्याळ माकड, आलसा म्हणजे आळस देणारी सुंदरी किंवा लीलावती, डमरू वाजवणारी सुंदरी, मृदुंग वाजवणारी सुंदरी, नृत्य करणारी सुंदरी, पायाला आळीते लावणारी सुंदरी, नमस्कार मुद्रेतील चंद्रावली, पद्मगंधा, सुंदरी व विंचू इ. वेगवेगळ्या प्रकारच्या सुरसुंदरी आहेत.
पक्षीनिरीक्षण
पक्षीनिरीक्षकांसाठी उजनी पाणलोट क्षेत्र म्हणजे पर्वणीच आहे. ह्या भागात छोटा पाणकावळा (Little Cormorant), राखी बगळा (Grey Heron), उघड्या चोचीचा करकोचा (Asian Openbill), माळटिटवी (Yellow-wattled Lapwing), चमचा (Eurasian Spoonbill), शेकाट्या (Black-winged Stilt), रंगीत करकोचा (Painted Stork), मोठा रोहित (Greater Flamingo), छोटा रोहित (Lesser Flamingo) आणि इतर पक्षी बघायला मिळतात.
आजच्या भटकंती मधे डॉ.अजय इंगळे , विष्णू धनवडे , दिलीप कुलकणी , किरण वेल्हाळ व मी सुशिल दुधाणे यांचा सहभाग होता.
















छान माहिती मिळाली
ReplyDeleteधन्यवाद
Delete