कुकडेश्वर मंदीर

                  कुकडेश्वर मंदीर 
                 १ सप्टेंबर २०१९

         कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काली  बांधलेल्या दगडी मंदिरांपैकी एक आहे. अखंड दगडात केलेले कोरीव काम आणि स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर तुलनेने अप्रसिद्ध आहे. सदर मंदिर पांडवकालीन असल्याचे समजले जाते. प्रत्यक्षात इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले, असा उल्लेख आढळतो. या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे. या धरणामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे.
      शिलाहार वंशातील/घराण्यातील अनेक राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले. त्यापैकी कपर्दिन, पुलशक्ती, झंझ, वज्जड, चित्तराजा, मुन्मुणी, अनंतदेव , अपरादित्य, केशीदेव व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होते. ह्या शिलाहारांनी अनेक मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाणे येथील कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकिर्दीत बांधले गेले, तर झंझ राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी शिवालये बांधली.
साधारण इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. तरीही यास पांडवकालीन का म्हणत असावेत हे उलगडत नाही. या राजांनी बहुतेक पांडवकालीन वा पुरातन मंदिरांची स्थापत्य कलेच्या आधारे पुनर्बांधणी केली असावी असाही एक मतप्रवाह आहे.

मंदिराची उंची साधारण १५ फूट असावी. 
प्रत्येक भिंतीवर आतून, बाहेरून पूर्णतः कोरीवकाम केलेले आढळते. 
मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश नाही.
 पुढील बाजूस उजवीकडे गणपती कोरलेला आहे. 

दारासमोरच एका अखंड दगडात नंदी कोरून काढला आहे. 

संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. 
दारावरील कोरीव गणेशपट्टी,

 उंबरठ्याजवळील दोन कीर्तिमुखे, 
दारासमोरचा नंदी आणि गणेश, 

वेलबुट्टी आणि अलंकारणे, 


शिवपिंडीची पूजा करणारी पार्वती 
अशी अनेक शिल्पे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आतील भागातही लक्षवेधी नक्षीकाम केलेले आढळते. 


मंदिराच्या पश्चिमेस एका गोमुखातून पाणी पडत आहे. त्या भागातही शिल्पखंड आणि नागशिळा मांडून ठेवल्या आहेत.

हे  शिव मंदिर पुरातन असले तरी त्यावरील शिल्पे सुस्थितीत आहेत. 

मंदिरासमोरच दगडात खोदून तयार केलेला नंदी आहे.
 याच्या डाव्या बाजूस अजून एक छोटेसे मंदिर आहे. त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे आहेत.
मंदिराला आधार देणारे खांब पूर्णतः नक्षीकाम केलेले होते.
 येथे सर्वात वरती गणपती कोरलेला दिसतो आहे. खांबाच्या इतर दोन्ही बाजूस सारखेच शिल्प आहे. त्याखाली ढोल वाजवतानाच्या व्यक्तीप्रतिमांचे शिल्प आहे. त्याखाली तोरणासदृश्य नक्षीकाम आहे.
त्याच्या पुढच्याच/समोरच्या खांबावर कोरलेले एक नृत्यशिल्प आहे. गावातील वृद्धांकडून मंदिराचा इतिहास तपशिलात ऐकावयास मिळू शकतो.

Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर