महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर

सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन,पुणे  या संस्थे  कडून महाराष्ट्रातील माऊंट एवरेस्ट समजल्या जाणाऱ्या  कळसुबाई शिखरावर यशस्वी चढाई

      बारी गाव,
     ता : अकोले 
    जि : अहमदनगर 



    
     महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराचा मान कळसुबाई ला जातो, याची समुद्रापासून उंची १६४६ मी.(५३९९ फुट)आहे. याचा आम्हा महाराष्ट्र वासीयांना सार्थ अभिमान आहे.
    कळसुबाई  शिखर सर  करण्यासाठी  आम्ही सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन,पुणे  च्या ४२ सदस्यांनी  बारी या गावी  (ता:अकोले, जि : अहमदनगर) जाण्यासाठी खाजगी बस वाहनाने शनिवारी रात्री २९ एप्रिल २०१७ रोजी प्रवासास सुरुवात केली. 



३० एप्रिल ला पहाटे बारी गावात पोहचलो.



सर्व नित्य कर्मे उरकून  पहाटे ६.३०  वाजता शिखराच्या दिशेने वाटचालीस सुरुवात केली.


 बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखराकडे जाण्याचा मार्ग आहे.



शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, कळसुबाई ही तेथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने तिच्या मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते ,म्हणून आजही कळसुबाईला ते आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे.


     शिखराच्या दिशेने जाणारी  वाट अतिशय चांगली आहे, कोठेही चुकायची शक्यता नाही. 


कळसूबाई  हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकर्‍यांनी पायर्‍यांची शेती केलेली आहे. 


कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत.



 त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे.बारी गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो, हा ओढा ओलांडून पुढे गेल्यावर थोडयाच अंतरावर एक मंदिर लागते. या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट थेट शिखर माथ्यापर्यंत घेऊन जाते.


  कळसूबाईचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर,




 पहिल्या टप्प्यावर कळसूबाईचे नविन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी हे मंदिर बांधलेले आहे.


       पुढे दुसरी शिडी पार केल्यावर,



कातळात दोन पावले कोरलेली आहेत, ती कळसूबाईची पावले आहेत अशी श्रध्दा आहे. 

शेवटच्या शिडीच्या खाली विहिर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे. 



     ६ लोखंडी जिने पार करून आम्ही  कळसूबाईच्या शिखरावर  पोहाचलो.



काही वर्ष अगोदर या शिखराच्या मार्गावर तीनच लोखंडी  शिड्या होत्या, व साखरदंड ही  लोखंडी होता, त्याच्या सहाय्याने वरती जावे लागत होते.अगोदर या ठिकाणी जाणे  थोडे कठीण होते, नंतर स्थानिक लोकांच्या साहाय्याने अजुन तिन  शिड्या लावण्यात   आल्या.या मुळे या ठिकाणी पोहचने आरामदायी झाले आहे. आमच्या ग्रुप मधील  दोन  सदस्यांनी शिखराच्या  निम्म्या भागापर्यंत  चढाई केली, व ते  परत फिरले.आम्ही मात्र पुढे निघालो, ६ लोखंडी शिड्या पार करुन ३ तासात  शिखरावर पोहचलो.आमच्या ग्रुप मधील जेष्ठ ट्रेकर्स  जयंत जोशी सरांना  cramp येऊनही त्यांनी शिखर सर केले.


         शिखरावर कळसूबाईचे छोटे मंदिर आहे. देवळात साधारण ३ माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे.



       शिखरावर पोहचल्यावर कळसुबाई मंदिरातील देवीचे दर्शन घेतले.या येथे फोटो शुट केले.



      कळसुबाई शिखराच्या माथ्यावरुन येथून  समोरच्या बाजुला  खाली भंडार दर्याचा  अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामशेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया-जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.
      कळसुबाई चे दर्शन घेउन आम्ही शिखर उतरायला सुरुवात केली. मी व प्रल्हाद जानी आम्ही दोघांनी अवघ्या दिड तासात शिखर उतरुन बारी गावात पोहचलो. त्यानंतर एकामागुन एक  सदस्य बारी गावात पोहचू लागले.
  आमच्या ग्रुप मधील एका मावळ्याने  आप्पा जगताप यांनी एका दिवसात  दोनदा शिखर सर केले.
      सर्व सदस्य बारी गावात पोहचल्यावर संस्थेतर्फे सर्वाना जेवण देण्यात आले, त्यानंतर आम्ही पुण्याकडे प्रस्थान केले.

Comments

  1. खूपच छान मी 1981 साली गेलो होतो पर्युन्तु वर पर्यन्त जाऊ शकलो नाही ते आजही राहून गेले पन एकदा जायचे आहे पाहू कधी आहे योग

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण