निघोज चे रांजणखळगे

          निघोज चे रांजणखळगे
             २३ फेब्रुवारी २०२०

ता : शिरूर 
जि : पूणे 
गाव : निघोज 
मार्ग : पूणे-वाघोली -लोणीकंद-शीक्रापुर-रांजणगाव गणपती -मळठण फाटा- मळठाण -टाकळी हाजी  निघोज 
अंतर : ९२ किलोमीटर 

निघोज हे  २७३५ हेक्टर क्षेत्रफळ  असलेले गाव आहे.या गावाच्या सर्वात जवळचे शहर अहमदनगर ५१ किलोमीटर अंतरावर आहे.

     रांजणखळगे हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.
वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजणखळग्यांची निर्मिती होते. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक असू शकतात. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रात रांजणखळगे तयार होतात.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळीहाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे निघोज गाव यांच्या,

 सीमेवरून कुकडी नदी वाहते. 


नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहे. 

नदीने वाहून आणलेले दगड-गोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगट भागात अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड-खोटे या भागात गोलगोल फिरून खॊलगट भागाचे,

अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होते.


 या प्रक्रियेला थोडी-थोडकी नव्हे तर हजारो वर्षे जावी लागतात. कालांतराने या खड्ड्यांचे रांजणाकार खळग्यांत रूपांतर होते.


    निसर्गाचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार - रांजणखळगे
निघोज हे गाव तेथील रांजणखळग्यांमुळे जगभरात प्रसिध्द आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर ह्या दोन तालुक्यांच्या सिमेवरील तसेच अहमदनगर पासून ७०  कि.मी.अंतरावर असलेल्या निघोज येथील, कुकडी नदीच्या पात्रात असलेल्या खडकात पाण्याच्या अव्याहत प्रवाहाने नैसर्गिकरित्या जे असंख्य खड्डे तयार झालेले आहेत तेच रांजणखळगे.

 नैसर्गिकरित्या तयार झालेले हे खड्डे म्हणजे निसर्गाचा अक्षरश: विस्मयकारी चमत्कारच आहे. ह्या खड्डयांचा आकार रांजणा सारखाच असून ह्या कुंडातील पाणी दुष्काळातसुध्दा आटत नाही. अनेक वर्षापूर्वी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे ह्या कुंडांची निर्मिती झाली असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे.
कुकडी नदीच्या पात्रात साधारण २०० मीटर लांब व ६० मीटर रुंद इतक्या भागात खडकामध्ये रांजणखळग्यांचे विविध आकार आपणास पहावयास मिळतात. या रांजणखळग्यांना स्थानिक भाषेत ‘कुंड’ म्हणतात. निसर्गाने बहाल केलेल्या ह्या छानशा कुंडांमुळे कुकडी नदीच्या सौंदर्यात भर पडलेली आहे.

कुकडीचे रांजणखळगे देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करीत असून भौगोलिक बदलांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकही येथे येत असतात. रांजणखळग्यांची निर्मिती कशी झाली, कोणत्या भौगोलिक कारणांमुळे झाली ह्या सर्व बाबींचा अभ्यास करण्याकरीता जगभरातील तज्ञमंडळी आवर्जून भेट देत आहेत. रांजणखळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील करण्यात आलेली असल्याने त्याची ख्याती संपूर्ण जगभर पसरलेली आहे. आपल्या महान महाराष्ट्रातील अजिंठा-वेरुळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, हेमाडपंथी प्राचिन मंदिरे अशा अनेक अद्भूत अविष्कारांप्रमाणेच रांजणखळग्यांचे आकर्षण जगभरातील पर्यटकांना, अभ्यासकांना, तज्ञांना भूरळ पाडत आहे.
रांजणखळग्यांच्या परिसरात म्हणजेच कुकडी नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूस मळगंगा देवीची दोन मंदिरे आहेत 

आणि या दोन मंदिरांना जोडणारा राज्य सरकारच्या वतीने बांधण्यात आलेला,

 झूलता पूल देखील बघण्यासारखा आहे.


 पूलाच्या मध्यभागी उभे राहून कुकडी नदीचे दर्शऩ नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूस असलेल्या रांजणखळग्यांमुळे विलोभनीय दिसते.

 निसर्गाचा हा चमत्कार तासन् तास बघत रहावा वाटतो. निघोज गावात मळगंगा माता मंदिराबरोबरच कपिलेश्वर मंदिर, वाघजाई माता मंदिर आणि राम मंदिर बघण्यासारखी आहेत. दरवर्षी भरणाऱ्या मळगंगा मातेच्या जत्रेस लाखो संख्येने भक्तगण मोठ्या भक्तीभावाने ,

मळगंगा मातेच्या दर्शनासाठी येत असतात.



निघोजपासून साधारण २५ कि.मी.अंतरावर निसर्गरम्य चिंचोली गाव आहे. ह्या गावात आपल्याला असंख्य प्रमाणात मोर बघावयास मिळतात. हे गाव मोराची चिंचोली ह्या नावाने प्रसिध्द आहे.

Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर