कुंडमळा रांजनखळगे : एक उपेक्षित ठिकाण

भटकंती अपरिचित धार्मिक व नेसर्गिक कुंडमळा  येथील  रांजणखळग्यांची

कुंडमळा,
ता: मावळ 
जि: पुणे 


     आज पहाटे २६ जुलै २०२० रोजी तळजाई टेकडी सिंहगड रोड येथे  सुप्रभात फेरीसाठी गेलो होतो,  साधारणतः तिन किलोमिटर पर्यंत गेलो असताना सचिन मांढरे यांचा सकाळी  सव्वासात ला  फोन आला,आपणाला कुंडमळा या ठिकाणी जायचे आहे.नविन ठिकाण असल्याने मी लगेचच त्यांना होकार दिला, व सुप्रभात फेरी अर्धवट सोडून  माघारी फिरलो.सकाळी पावणे आठ वाजता टू व्हीलर वरुन प्रवास सुरु केला.सिंहगड रोड ने पुढे वडगाव वरुन मुंबई च्या दिशेने  हाईवेने प्रवासास सुरुवात केली.वारजे, कोथरुड, चांदणी  चौक, बावधन, बाणेर, सोमाटणे फाटा, घोराडेश्वर येथे  पोहचलो. घोराडेश्वर च्या समोरच्या बाजुला ,म्हणजे पुण्याहून आल्यानंतर उजवीकडच्या बाजुला बेगडेवाडी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या फाट्या पासुन आत पुढे निघालो.हा संपूर्ण परिसर देहूरोड लष्करी तळाच्या हद्दीतून जातो, त्यामुळे जागोजागी चौक्या उभ्या केलेल्या दिसतात. या भागात फोटो काढण्यास मनाई आहे.

थोड्याच वेळात बेगडेवाडी रेल्वे स्थानकापाशी आम्ही  पोहचलो.


रेल्वे स्थानकापासून थोडे पुढे निघालो  की लगेच डाव्या बाजुला एक रस्ता जातो,त्या ठिकाणी परत दोन मार्ग लागतात आपण येथून डावी कडची वाट सोडून जी यस.आर.एफ. कडे जाते, त्या बाजुने न जाता उजवीकडची रेल्वे क्रॉसिंग लाईन ची वाट धरुन पुढे निघालो .येथून थोड्याच वेळात आपण, हायवेच्या फाट्यापासून दोन किलोमिटर अंतर पार करुन  कुंडमळा येथे पोहचतो.

येथे पोहचल्यावर आम्हाला  इंग्रजांच्या काळात ' इंद्रायणी ' नदीवर बांधलेला बंधारा दिसला. 


या इंग्रजांच्या काळातील बांधलेल्या बंधाऱ्यावरून वाहणारे पाणी आपले मन प्रसन्न करते. 

याच इंद्रायणी ' नदीवर बांधलेला एक छोटा पूल देखील आपले लक्ष वेधून घेतो.


 इंद्रायणी नदीवरील बांधलेल्या या पुलावरून एकच  दुचाकी एका वेळी  जाऊ शकेल एवढा हा छोटा पूल आहे.


पुलाची लांबी मात्र  ८० ते ९० फुट असावी.जर आपण चार चाकी वाहनाने या ठिकाणी आलात तर आपले वाहण या ठिकाणी पार्क करावे.

येथून खाली नदीपात्रात उतरावे.



या ठिकाणी इंद्रायणी नदी वाहते.इंद्रायणी नदीच्या या पात्रात येथे मोठे कुंड आहे.हे कुंड पाहण्यासारखे आहे.



 या ठिकाणच्या पात्रात निसर्गाची अदभुत किमया पाहायला मिळते, ते म्हणजे रांजनखळगे.हे रांजनखळगे पाहिले की आपणाला निघोज येथील रांजणखळग्याची ची आठवण होते.निघोज येथे ज्या प्रमाणे रांजनखळगे आहेत, अगदी त्याच प्रमाणे येथेही आहेत.


    रांजणखळगे हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजणखळग्यांची निर्मिती होते. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक असू शकतात. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रात रांजणखळगे तयार होतात.



    या ठिकाणी मोठे कुंड आहे, इंद्रायणी नदीचे पाणी या कुंडाच्या ज्या ठिकाणी पडून खाली जाते,तेथे एक धबधबा तयार झाला आहे.हा छोटा धबधबा खुपच आकर्षक दिसतो.हा अदभुत  नजारा पाहण्यासारखा आहे.



   जर आपल्याकडे दुचाकी असेल तर आपण या पुलावरुन दुचाकी घेउन जावू शकता,पूल उतरुन पुढे डाव्या बाजुला कुंड देवीचे मंदीर आहे.हे मंदीर साधारणतः चार ते  पाच वर्षापूर्वी बांधले आहे.हे मंदीर बांधण्याच्या अगोदर या ठिकाणी कुंड मातेचे छोटेसे मंदीर होते.


     या येथील कुंड मातेची एक  अख्यायिका म्हणा अथवा ऐकीव माहिती अशी आहे.
    या ठिकाणी ज्या वेळेस गोऱ्या लोकांचे म्हणजे इंग्रजांचे राज्य होते, त्यावेळी  या नदीच्या पात्रातील भागात  तंबू टाकुन ते राहत असायचे.एके दिवशी या भागातून कुंड देवी जात असताना, गोर्‍या लोकांनी तिला या नदीच्या पात्रात ढकलून दिले होते. कालांतराने येथील एका अधिकाऱ्याच्या स्वप्नात देवी आली, व तिने सांगितले की मला या नदीच्या पात्रातून वर काढा, व माझे मंदीर येथे बांधा.त्याप्रमाणे या ठिकाणी छोटे मंदीर बांधले गेले, नंतर आत्ता या ठिकाणी स्थानिक लोकांनी मोठे मंदीर बांधले आहे.
     दुसरी अख्यायिका अशी सांगितली जाते की , ज्या वेळेस पांडव या भागातून मार्गक्रमण करित चालले होते, त्यावेळेस या ठिकाणी मोठे कुंड निर्माण झाले, म्हणून या भागात कुंड आहे. अश्या या दोन अख्याहिका आम्हाला या ठिकाणी आल्यावर स्थनिक गावकरी मंडळीनी सांगितली.
     यात किती तथ्य आहे, या विषयी आम्हाला कल्पना नाही.


     कुंडमळा हा भाग मावळ तालुक्यातील इंदुरी गावाच्या हद्दीत येतो.तसे पहायला गेले तर ' कुंडमळा ' हे ' इंदोरी ' आणि ' शेलारवाडी ' या गावांच्या सीमेवर वसलेले ठिकाण आहे.पुण्यापासुन ३५ ते ४० किलोमिटर अंतरावर आहे.



     या येथून मंदिराच्या समोरच्या बाजुला दुरवर घोराडेश्वर चा डोंगर आपले लक्ष्य वेधून घेतो.



      तसे पहायला गेले तर महाराष्ट्रामध्ये निघोज येथील रांजणखळगे हे जगप्रसिद्ध आहेत.या निघोज येथील रांजण खळग्यांना सगळेच भेट देतात परंतु पुण्यापासून अगदी जवळ असलेले     'कुंडमळा ' येथील इंद्रायणी नदी निर्मित रांजण खळगे आजही उपेक्षित आहेत.

     इंदुरी गाव येथून फक्त चार ते पाच किलोमिटर वर आहे.
     कुंडमळा चा  सर्व परिसर फिरुन, जर आपणाला इंदुरी ची मढी/किल्ला पाहण्यासाठी जायचे असेल तर येथूनच आपण जाऊ शकता, जर आपणाकडे दुचाकी वाहन असेल तरच.कारण येथील पुलावरुन फक्त दुचाकी गाडी च पूल उतरुन येऊ शकते.जर आपणाकडे चार चाकी वाहन असेल तर आपण परत बेगडेवाडीला जाऊन हाईवेने तळेगाव मार्गे  इंदुरीला जावे.
       आम्ही कुंडमळा येथून इंदुरी ला गेलो, इंदुरी चा किल्ला बाहेरुनच पाहिला.इंदुरीहुन तळेगाव मार्गे पुण्याकडे मार्गस्थ झालो.
      अश्या या  धार्मिक, नैसर्गिक, अपरिचित व उपेक्षित  ठिकाणाला भेट देऊन खूप आनंद झाला.

Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर