श्रावण महिन्यातील पहिली भटकंती: उपांड्या घाट

                 उपांड्या घाट ट्रेक
              
           भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस किंवा मैत्री दिन साजरा केला जातो. इ.स. १९५८ पासून पेरुग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र- मैत्रिणी परस्परांना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देतात.
       ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते मैत्री दिवस साजरा करण्याचे. विशेषत: महाविद्यालयीन तरुणांमध्ये या दिवसाचे भलतेच आकर्षण असते. गेल्या काही वर्षांपासून जुन्या शालेय मित्रांसोबत ‘स्नेहमेळावा’ आयोजित करण्याचा ट्रेंड भलताच लोकप्रिय ठरू लागला आहे. हेच शालेय मित्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात एकत्र येऊन मैत्रीदिवस साजरा करताना आपणास जागोजागी आढळून येतात.
     याच मैत्री दिनाचे औचित्य साधून आम्ही भटकंती...गड दुर्गाची मित्र परिवार ग्रूप ने उपांड्या ते मधे घाट या ट्रेकचे  आयोजन माझ्या  नेतृत्वाखाली  करण्याचे ठरविले.
   ४ ऑगस्ट २०१९ रोजी  पहाटे ६ वाजता  खाजगी वाहनाने आम्ही भटकंती ग्रूप चे १४ सदस्य पुण्याहून  कात्रज , नसरापुर , वेल्हे मार्गे प्रथम भट्टी  या गावी पोहचलो.या ठिकाणी प्राचीन मंदीर आहे, तसेच वीरगळ ही आहे.

या वीरगळ विषयी रायबा यांनी माहिती दिली.

    नंतर आम्ही पुढे मार्गस्थ झालो, सकाळी ८.३० वाजता केळद या गावी पोहचलो.
     केळद हे  गाव पूर्वी अन्नछत्र नावाने ओळखले जायचे. त्याकाळी घाट चढून येणार्‍या पांथस्थांची क्षुधाशांती करण्यास येथे अन्नछत्र चालायचे.
    केळद गावी अंकुश  शिंदे यांच्या घरी चहा व गरमागरम कांदे पोह्याचा आस्वाद घेतला. अल्पोपाहार आटोपून येथूनच  ट्रेकच्या  श्रीगणेशाची  सुरुवात करण्यासाठी निघालो, त्या अगोदर आम्ही,

   नुकतेच १० जुन ला माझे पहिले पुस्तक प्रकाशीत झाले असल्याने, व आजच्या घाट वाटेचा या पुस्तकात समावेश असल्याने,केलद येथील  मंदिरात प्रथम आम्ही येथे पुस्तका बरोबर फोटो शुट केले. 


    सह्याद्री डोंगररांगांच्या पूर्वेला दख्खनचं पठार आणि पश्चिमेस कोकण ! या कोकणातून वर देशावर  येण्यासाठी पुरातन काळापासून अनेक घाटवाटांचा वापर केला जात असे.

     अश्याच एका घाट वाटेची भटकंती करण्यासाठी 
स्थानिक वाटाड्याला  बरोबर घेऊन केलद येथूनच पदभ्रमणाला  सुरुवात  केली.

प्रथम आम्ही मधे  घाट उतरून , नंतर  मधे उपांड्या घाट  चढून वर यायचे असा प्लान केला होता.परंतु या भागात पावसाचा  जोर जास्त असल्याने उपांड्या घाट उतरून मधे घाट चढायचा असा विचारविनिमय करून उपांड्या घाटाच्या दिशेने सुरुवात केली.

प्रथम अर्ध्या तासांचा  सपाटी भाग चालून आम्ही उपांड्या घाट उतरायला सुरुवात केली.

पाऊस मस्त बरसत होता, आज श्रावण महिन्यातील पहिल्या पावसात ओलेचिंब भिजून आनंद साजरा करायचा मानस करूनच आम्ही वाटचाल सुरू ठेवली.वेल्हे भागात पावसाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते.त्यामुळे या भागातील संपूर्ण परिसर हिरवाई ने नटलेला असतो.जेथेवर  नजर जात होती , त्या सर्व भाग हिरवाई ने नटलेला होता, व लहान-मोठ्या धबधबे नी नजरेस पडत होते. उपांड्या घाट उतरताना खुप काळजीपूर्वक  उतरावे लागते.अतिशय  त्रिव्र  स्वरूपाचा हा घाट उतार आहे.नागमोडी वळणे घेत ,

फोटो सेशन करीत 

आम्ही जवळपास तास ते सव्वा तासात  घाट उतरून कर्णावडी या गावी पोहचलो.४० ते ५० घरांची ही वस्ती आहे व अतिशय प्रेमळ स्वभावाची  माणसे आहेत येथे.या वस्तीच्या काही अंतरावर जननी मातेचे पुरातन मंदिर आहे, व काही वीरगळ ही आहेत.परंतु वीरगळ चे काही भाग तुटलेल्या अवस्थेत पाहावयस मिळाल्या.थोड्या च अंतरावर एक पाण्याचे प्राचीन कुंड ही नजरेस पडले.कर्णावडी वस्तीवर आम्ही थोडी पेटपुजा उरकून घेतली.आता मधे घाटाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.अर्धा -पाऊण तासांचे  पदभ्रमण केल्यानंतर एक ओढा लागला. ओढा पार करण्यासाठी आम्ही दोर झाडाला बांधला,व पलीकडे आमच्या सुदैवाने दोन जण मढे  घाट उतरून , उपांड्या घाटाने वर चढून जाण्यास येताना दिसले , झाडाला दोर बांधून आम्ही दोर त्यांच्या बाजूने फेकला.त्यांनी तेथील झाडाला दोर बांधला.येथून  पलीकडे जवळपास ७० ते ८० फुट पलीकडे दोर ला धरून ओढा पार करायचे ठरविले, परंतु यात आम्हाला यश आले नाहि.पाच ते दहा मिनिटांत पाण्याचा जोर एवढा वाढला की , पलीकडे जाने शक्यच झाले नाही. पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की दहा-पंधरा मिनिटांत ओढय़ाचे रूपांतर नदीत झाले.आम्ही ओढा पार करून पुढे न जाण्याचा निर्णय घेतला व परत आल्या वाटेने उपांड्या घाट चढून जाण्यासाठी निघालो.परंतु या ही ठिकाणी अवस्था खुपच बिकट झाली होती.ज्या घाटाने आम्ही उतरून खाली आलो होतो , 

तो भाग  जवळपास एक ते दीड फुटांनी पाण्याने वेढलेला होता.


त्याच अवस्थेत आम्ही मार्गक्रमन करीत ,एकमेकांच्या साथीने , क्वचित प्रसंगी हात देऊन घाटेची  चढाई  करीत होतो.वरून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू होता.कसे-बसे आम्ही तासा भरात  घाट चढून वरती माथ्यावर पोहचलो.व सपाटी भागावरून चालू लागलो , हा ही भाग पुर्ण  पाण्याने  व्यापला होता.तसेच आम्ही पुढे चालत राहिलो , 


थोड्याच वेळात आम्ही  मढे  घाट येथे पोहचलो.

या ठिकाणी दोन प्रचंड धबधबे वाहतात, एक लक्ष्मी व दुसरा केलेश्वर धबधबा.लक्ष्मी धबधबा पाहण्यासाठी जाता येते , परंतु केलेश्वर धबधबा आड बाजूला असल्याने तेथे जाता येत नाहि, दुरूनच पाहता येतो.लक्ष्मी धबधबा पाहण्यासाठी आम्ही येथुन खाली , जवळपास पंधरा ते वीस मिनिटे उतार उतरून पोहचलो.प्रचंड मोठ्या प्रमाणात धबधबा वाहत होता.

धबधब्या खाली मनसोक्त भिजलो.


या धबधब्या च्या बाजूने आम्ही मढे घाट चढून वर येणार होतो,परंतु ते शक्य झाले नाहि.मधे घाट पाहुन आम्ही येथूनच पुढे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या केलद या गावी पोहचलो.अंकुश शिंदे यांच्या  घरी गावरान जेवणाचा आस्वाद घेऊन पुण्याकडे मार्गस्थ झालो.


वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.

     आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.


Comments