वाघेश्वर मंदिर
वाघेश्वर मंदिर ,
वाघोली.
३१ जानेवारी २०२०
महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत.आम्हा भटकी मंडळींना गड-किल्ले , प्राचीन मंदिरे , प्राचीन वाडे हे पाहण्याचा छंद.त्यामुळे आज आम्ही मी सुशिल दुधाणे व डॉ.अजय इंगळे अश्याच प्राचीन मंदिरे , वाडे यांना भेट देण्यासाठी पुण्याहून निघालो.
प्रथम आम्ही वाघोली पुणे येथील वाघेश्वर मंदिराला भेट दिली.
पुणे-नगर मार्गावर पुण्यापासून २२ कि.मी. अंतरावर वाघोली हे गाव आहे. येथे पुरातन वाघेश्वर मंदिर, हनुमान मंदिर,भैरवनाथ मंदिरे प्रसिद्ध आहेत. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्य शैलीतील आहे.
तसेच पेशवाईतील शूर कर्तबगार सरदार पिलाजीराव जाधवरावांची समाधी आहे.
वाघेश्वर मंदिराची रचना ही चौकोनी गाभारा, सभा मंडप, भिंतीवरील अनेक कोनाडे, शिखराची रचना टप्प्याटप्प्याची खालच्या टप्प्यापेक्षा वरचा टप्पा लहान होत जाणारा. त्यामुळे मंदिराकडे पाहिल्यास आपली नजर सरळ वर न जाता ती आडव्या रेषामध्ये जाते.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे.
मंदिरासमोरील नंदी मंदिराच्या भव्यतेत भर घालतो. नंदी पांढऱ्या रंगात रंगवलेला आहे.
मंदिराच्या बाहेरील प्रत्येक स्तंभाची रचना कलशावर कलश मांडून त्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या बाहेरील खांबावर दगडी शिल्पामध्ये राम अवतार, बळीवामन, शेषशाही विष्णू, नृसिंह अवतार, वराहअवतार, गरुड देवता, हनुमान, मत्स्य अवतार, कच्छ अवतार,यक्ष, व्याल, महिशाशूरमदिर्नी, मल्ल, व्याल,कल्की अवतार,
गणेशमूर्ती, नागदेवता,
सहस्त्न भाऊ आणि परशुराम युद्ध ,अश्वमेध यज्ञ, घोडा अशा शिल्पकृती दगडावर कोरलेल्या आहेत.
मंदिर पाहुन आम्ही गावातील जाधव वाडा पाहण्यासाठी निघालो.
पिलाजी जाधवराव :
पिलाजीरावांनी तलावाच्या शेजारील वाघेश्वर मंदिराजवळ बागेसाठी पेशव्यांकडे जागेची मागणी केली होती. गावातील लोकांना पाण्याची अडचण दूर होण्यासाठी तलाव बांधला. ही मागणी बाजीराव पेशव्यांनी १७२२ मध्ये मान्य करून पिलाजी आणि संभाजी जाधव रावास जमिन दिली. पिलाजीरावांनी दिवेघाटात तलाव बांधला. तो मस्तानी तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. दिवेघाटात वर पोहचल्यावर खाली नजर टाकल्यास मोठा पाण्याचा तलाव दिसतो हाच तो मस्तानी तलाव. १७२९ च्या पूर्वी या तलावाची बांधणी पिलाजीरावांनी केली. पुढे बाजीरावांकडे हा तलाव आला.
सरदार पिलाजीराव जाधवांची समाधी
मंदिराशेजारी पाषाणातील सुबक बांधकाम असलेली पिलाजीरावांची समाधी आहेत. या समाधीजवळच जाधवराव घराण्यातील अनेक पुरुषांच्या समाध्या दिसतात.
वाघोली गावात प्रवेश केल्यावर, गावाच्या मध्यभागी, सुस्थितीत असलेली वेस पाहण्यास मिळते. पूर्वी ती गावाच्या सीमारेषेवर होती. मात्र गावाचा विस्तार वाढत गेल्यानंतर ती आता गावाच्या मध्यभागी आली आहे. पंचवीस फूट उंचीच्या त्या वेशीचे चिरेबंदी बांधकाम गेली अडीचशे वर्षें ऊन, पाऊस, वादळ-वारा, थंडी यांना झेलत ताठ उभे आहे. वेशीची सुबक कमान पेशवेकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे.
वेशीतून आत प्रवेश केला, की थोड्याच अंतरावर सरदार पिलाजीराव जाधव यांचा वाडा आहे. वाड्याची तीस-पस्तीस फूट उंचीची तटबंदी पाहून वाड्याच्या भव्यतेची सहज कल्पना येते. तटबंदीजवळून पुढे सरकल्यावर उजव्या हाताला वाड्याचा प्रचंड दरवाजा नजरेत भरतो. त्यावरील कमळांची शिल्पे चित्त वेधून घेतात. दरवाजावरील वीटकामातील सज्जा मात्र पूर्णपणे ढासळला आहे. त्यासाठी वापरलेले लाकूडही जराजर्जर झाल्याचे दिसते. तरीसुद्धा तो सागवानी दरवाजा जाधवांच्या महानतेची जाणीव पाहणाऱ्याला करून देतो.
दरवाजातून प्रवेश केल्यावर झाडा-झुडुपांच्या आत दडलेली तेथील इमारतींची चिरेबंदी जोती आणि त्यांचे टोलेजंग स्वरूप दृष्टीपुढे उभे राहते. त्या वाड्यात पूर्वी आग लागून बऱ्याच गोष्टी नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे तेथे इमारतींच्या जोत्यांशिवाय व आतील चौकांशिवाय काही नाही. जाधवरावांच्या सध्याच्या वारसदारांपैकी संग्रामसिंहराव यांच्याकडून आतील मूळ वाडा सहा मजल्यांचा होता असे समजले.














Comments
Post a Comment