कर्दळीवन: एक अविस्मरणीय व अदभुत अनुभती

  कर्दळीवन एक अविस्मरणीय व अदभुत अशी परिक्रमा
            श्रीशैल्यम

     कर्दळीवन परिक्रमा करणे हे माझं स्वनं होते. ते मी या वर्षी  पुर्ण  केले .

 ११ फेब्रुवारी २०१५ रोजी दुपारी पुणे ते हैदराबाद रेल्वेने प्रवासास सुरवात केली.

३६ जनांचा ग्रुप  यामध्ये सहभागी झाला होता.
या परिक्रमेचे आयोजन स्वामी समर्थ मठ - मंडई , येथील  गुमास्ते गुरुजी यांनी केले.

   १२ फेब्रुवारी रोजी पहाटे आम्ही हैदराबाद ला पोहचलो.
येथून खाजगी वाहनाने आम्ही २१० किलोमिटरचा प्रवास करुन  ' श्री शैल्य ' येथे पोहचलो. श्री शैल्यम येथील एका धर्मशाळेत आमचा ज्या ठिकाणी आजचा मुक्काम होता, त्या ठिकाणी आम्ही गेलो.येथे फ्रेश होऊन आम्ही मल्लिकार्जुन च्या दर्शनासाठी निघालो.
     भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना१२(द्वादश)  ज्योतिर्लिंगे म्हणतात. 


    श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे.
 हैद्राबादपासून सुमारे २१० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पूर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगेत वसलेले हे (शिव) तीर्थक्षेत्र आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची ४७६ मीटर आहे. येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे. तसेच येथे कृष्णा नदीच्या (पाताळगंगेच्या) काठावर जाण्यासाठी रज्जूमार्ग आहे. येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मिमीती केंद्र आहे.
    येथे पूर्वी असलेल्या महाकाली मंदिरात नंदी तपस्या करत होता. या तपस्येत असलेल्या नंदीवर प्रसन्न होउन ,

मल्लिकार्जुन आणि ब्रम्हरंभा रूपात शिव-पार्वती येथे प्रगट झाले.

     श्रीशैलमचा इतिहास सातवाहन काळापर्यंत सापडतो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो. राजा प्रोलयाने पाताळगंगा (कृष्णा नदी) ते श्रीशैलम असा मार्ग बांधला. या नंतर अतिशय ताकदवान अशा विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे दगडी बांधकाम करण्यात आले. पुढे पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्य नावारूपास आणणारे राजा कृष्णदेवराय यांनी राजगोपुर आणि सलुमंतापस व इतर भागाचे निर्माण कार्य केले. इ.स १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुराचे बांधकाम केले.
     ज्योतिर्लिंगाचे मनोभावे दर्शन घेउन आम्ही धर्मशाळेत रात्री मुक्कामास गेलो.
      दुसऱ्या दिवशी सकाळी १३ फेब्रुवारीला आम्ही 
येथून जवळच,

     छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदीर असलेल्या ठिकाणी गेलो.

      छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७७ मध्ये मोहिमेदरम्यान श्रीशैल्यमला भेट दिली होती. त्या प्रीत्यर्थ उभारलेले हे मंदिर! दर्शनी भागातच शिवाजी महाराजांवरील पुस्तकांचा कक्षही आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज अतिथीगृहही येथे उभारण्यात आले आहे.


     देशभरातील एकमेव असलेले ‘श्री छत्रपती शिवाजी केंद्र’ अर्थात ‘शिवाजी महाराजांचे मंदिर’ शिवाजी महाराजांचा १२ फुटांचा सिंहासनाधिष्ठित छत्रधारी ब्राँझचा पुतळा,


    दहा हजार चौ. फू.चा दरबार हॉल महाराजांच्या बालपणापासून जीवनचरित्रावर सनावळीसही लावण्यात आलेले फलक!
      छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेउन आम्ही,

 कर्दळीवनाकडे जाण्यासाठी होडीकडे निघालो.

           कर्दळीवन परिक्रमा मार्ग 
      कर्दळीवन परिक्रमा करण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे श्रीशैल्य येथे जाऊन तेथून होडीने किंवा यांत्रिक बोटीने २४ कि. मी. चा प्रवास करून व्यंकटेश किनारी जाणे आणि तेथून कर्दळीवनात प्रवेश करणे.
       दुसरा मार्ग म्हणजे हैद्राबाद येथून श्रीशैल्य येथे येत असताना श्रीशैल्यमच्या अलीकडे साधारण १० ते १२ कि. मी. वर अक्कमहादेवी गुंफेकडे जाणारा मार्ग आहे. पण हा प्रचलितच नाही.

      आम्ही वर दर्शविलेल्या पहिल्या मार्गाने बोटीने  प्रवास  सुरु केला.
    कर्दळीवनामध्ये जाणे थोडे अवघड आहे, मात्र अशक्य नाही. कर्दळीवनाच्या परिक्रमेमध्ये एकूण पाच स्थानी दर्शन घ्यावे लागते आणि मग आपली परिक्रमा पूर्ण होते. ही स्थाने म्हणजे अक्कमहादेवी मंदिर, व्यंकटेश किनारा, अक्कमहादेवी गुहा, स्वामी प्रकट स्थान आणि बिल्ववन (मार्कंडेय ऋषी तपस्थळ) ही आहेत. या परिक्रमेमध्ये एकूण ३६ कि.मी. चालावे लागते. शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि श्रद्धावान अशी कोणतीही व्यक्ती ही परिक्रमा सहजतेने पूर्ण करू शकते. स्त्री-पुरुष सर्व जण ही परिक्रमा करू शकतात. आध्यात्मिक अनुभूतींबरोबरच कर्दळीवनातील जैवविविधता, तेथील निसर्ग, गुहा, घनदाट जंगल हेही मुख्य आकर्षण आहे. तरुणाईसाठी कर्दळीवन परिक्रमा म्हणजे एक साहसी आध्यात्मिक ट्रेकिंग आणि पर्यटन आहे. परिक्रमेची सुरुवात आदल्या दिवशी श्रीशैल्य येथे पोहोचून श्रीमल्लिकार्जुन स्वामी आणि श्रीभ्रमरांबा माता देवीचे दर्शन घेऊन करावी लागते. 

पाताळगंगेतून बोटीने साधारण २८ कि.मी.व एक तासाचा  प्रवास करून आपण व्यंकटेश किनार्‍याला पोहोचतो. 

     या येथे  आप्पा स्वामी
 यांच्याकडे चहा - पाणी करून दुपारी ४ वाजता ' 

अक्कम्मा गुहेकडे प्रस्थान केले.
या येथून पुढे चढण सुरु होते.चढण जास्त असल्याने चालताना दमछाक होते.आमच्या ग्रुप ची संख्या जास्त असल्याने व ग्रुप मधे ,

जेष्ठ नागरिक ही असल्याने एकमेकांना आधार देत मार्गक्रमण करित राहिलो.
    
    परिक्रमा मार्गावर श्री.स्वामी समर्थांचे चरण कमळ लागले.

     येथे मनोभावे दर्शन घेउन पुढे निघालो.
सायं. ६.३० वाजता आम्ही साधारणतः ७ किलोमिटर व अडीच तासांच्या चालिनंतर, 

अक्कमहादेवी गुहेत पोहचलो. 
आजच्या पहिल्या दिवसाचा मुक्काम  अक्का-महादेवी गुहेतच होणार होता.  

   अक्कमा गुहा ही एका कातळात आहे. अंदाजे सात-आठशे फूट रुंदीची व पन्नास-शंभर फूट उंचीचे हे पूर्ण कातळाचे आवरण, 
समोर खाली खोलवर हिरवीगार घनदाट झाडीमध्ये एकही आधार नसतानाही शेकडो वर्षे उभी असलेली व अनेक विवरे असलेली ही अक्कमा गुहा आहे. येथे श्री दत्तगुरू, शंकराची पिंड, नृसिंहसरस्वती, अक्कमा देवी यांच्या मूर्ती आहेत. इथे वीज नाही, वस्ती नाही, रात्री गुहेत पूर्ण अंधार असतो.
   या गुहेत अंदाजे शंभर ते सव्वाशे जण आरामात राहू शकतात.
      रात्री आम्ही खिचडी भाताचा प्रसाद ग्रहण केला.भजन-कीर्तन,स्वामी समर्था चा नामघोष घुमू लागला.


      १४  फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजता कर्दळीवन या स्वामी समर्थ प्रकटस्थानाकडे प्रस्थान केले.
   कर्दळीवनाकडे प्रयाण करू लागलो. अधिक भीती याच प्रवासाची होती,

 कारण मार्गात पुरुषभर उंचीची वारुळे,
 रानावनातून जाणारा चिंचोळा अरुंद असा रस्ता,अक्कमा गुहेपासून साधारण पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर फक्त,

 दोन ते तीन बांबूच्या व गवताच्या उतरत्या छपराने गोलाकार बांधलेल्या चेंचू आदिवासींच्या झोपडया लागतात.

कर्दळीवन हे ठिकाण आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिग क्षेत्राजवळ आहे. हैदराबादपासून २१० किमी अंतरावर श्रीशैल्य आहे. तेथे कृष्णा नदी पाताळगंगा या नावाने ओळखली जाते. हा सर्व परिसर अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेला आणि दुर्गम असा आहे. कर्दळीवनात चेंचुआ या जमातीचे आदिवासी लोक राहतात.


     श्रीअक्कमहादेवी गुहेपासून पश्चिमेकडे कर्दळीवनातील श्रीदत्तप्रभू व श्रीस्वामी-समर्थांच्या मूळ स्थानाकडे जायचा रस्ता आहे. 
हा कर्दळीवनातील दुसर टप्पा ५  कि. मी. अंतराचा आहे. 

हा रस्ता बहुधा सरळसोट आहे. 
मधे थोडाफार चढ-उतार येतो. मात्र या रस्त्यावर अतिशय घनदाट आणि निबिड अरण्य आहे. अगदी दिवसासुद्धा सूर्यकिरणे जमिनीवर पोहोचू शकत नाहीत.


   साधारणतः सकाळी  ७.३० वाजता आम्ही दिड तासांच्या  व ५ कि.मी च्या चालिनंतर प्रकटस्थानी  पोहचलो.


    प्रकटस्थानाचे दर्शन घेऊन, या  येथे ' श्री अनघा दत्त ' व  'अनघा लक्ष्मी ' याग गुमास्ते गुरुजी यांच्याकडून करुन  घेतला.

         कर्दळीवन स्थान महात्म्य  

       कर्दळीवन हे श्रीदत्तगुरूंचे गुप्त स्थान आणि श्रीस्वामी समर्थांचे प्रकटस्थान. श्रीपादश्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती स्वामी यांच्या अवतार कार्यात त्याला विशेष महत्त्व आहे. अक्कलकोट स्वामींच्या दत्तावतारपणाला पुष्टी देते ते आपण कर्दळीवनातून आल्याचे त्यांचे सांगणे. अन्य अनेक ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक संदर्भ या स्थानाला आहेत. एवढे सर्व असूनही कर्दळीवनात जाणाऱ्यांचे प्रमाण फारच थोडे आहे. दुर्गमता, सोयीसुविधांचा अभाव, भीती वाटावी असे प्रवाद या साऱ्यामुळे तेथे जायला फारसे कोणी धजावत नाही.
   फार प्राचीन काळापासून कर्दळीवन हे सिद्ध, योगी, मुनी आणि ऋषी यांचे अत्यंत आवडते आणि एकांतात तपश्चर्या करण्यासाठी अनुकूल असे ठिकाण आहे. कर्दळीवन परिसरात प्रवेश केल्याबरोबरच तेथील दिव्यत्वाची अनुभूती तत्काळ येते. त्या सर्व परिसरात दिव्य दैवी स्पंदने भरून राहिली आहेत. तेथे प्रवेश केल्याबरोबर आपले अष्टसात्त्विक-भाव जागृत होतात. शरीरातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत होतात. आपल्या अंतर्मनामध्ये चैतन्याचा आविष्कार होतो. एक विलक्षण जाणीव अंतरंगामध्ये पुलकित होते. मन आनंदाने भरून उठते. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंचा वास आहे, जेथे श्रीदत्तप्रभूंचे सर्व अवतार येऊन मिळतात आणि गुप्त रूपात तेथेच वास करतात त्या कर्दळीवनाचे माहात्म्य किती असेल याची कल्पना आपल्याला करता येणार नाही.

प्रकटस्थानी ध्यानाला बसल्यावर एक दिव्य अनुभव येतो.

     कर्दळीवन श्रीनृसिंहसरस्वती स्वामींच्या गुप्त होण्याचे आणि स्वामी समर्थाच्या प्रकट स्थानाचे हे परमपवित्र ठिकाण!

 एका छोटयाशा गुहेत स्वामी समर्थाच्या पादुका, नृसिंहसरस्वती,गगनगिरी महाराज यांच्या तसबिरी व शिवलिंग आहे. 

समोरच एक पुरातन वृक्ष पडलेला आहे. त्याच्या बाजूने मोठे वारूळ असावे असे जाणवते. येथे श्री स्वामी समर्थानी तपश्चर्या केली व तेथून प्रकट झाले असे सांगितले जाते.
     लौकिक अर्थाने खूप प्रसिद्धी झाल्यावर आणि आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर नृसिंह सरस्वती श्रीशैल्य येथे गेले. तेथे पाताळगंगेमध्ये जाऊन त्यांनी शिष्यांना ‘पुष्पाचे आसन’ करायला सांगितले. शिष्यांनी एक मोठी बांबूची टोपली तयार केली. त्याला सर्व बाजूंनी कर्दळीच्या पानांनी लपेटले. त्यावर शेवंती, कुमुद, मालती इ. फुले पसरून पुष्पासन तयार केले. त्या दिवशी गुरू कन्या राशीत होता, बहुधान्य नाम संवत्सर होते (शके १४४०), उत्तरायण सुरू होते. सूर्य कुंभ राशीत होता, माघ वद्य प्रतिपदा होती आणि शुक्रवार होता. त्या दिवशी प्रातःसमयी नृसिंह सरस्वती पुष्पासनावर बसले, पाताळगंगेतून कर्दळीवनाकडे गेले आणि दिसेनासे झाले. कर्दळीवनात सर्वत्र ते चैतन्यरूपाने राहत आहेत अशी समजूत आहे.
   नृसिंह सरस्वती यांनी तेथे निबिड अरण्यात एका प्रशस्त ठिकाणी समाधीच्या स्थितीत राहण्याचे ठरविले. नीरव शांतता, उंचच उंच वृक्ष असलेल्या ठिकाणी एका पहाडाच्या कोपर्‍यात एक गुहा होती. त्या गुहेला लागून वटवृक्ष, औदुंबर आणि अश्वत्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढलेले होते. त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून ध्यानस्थ बसले. असे म्हणतात की ३५० हून अधिक वर्षे ते तेथे समाधी अवस्थेत बसून होते. त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराभोवतीही एक प्रचंड मोठे वारूळ तयार झाले होते. ते वारूळ त्यांच्या मस्तकाहूनही ८ ते १० फूट उंच झाले होते. वारुळामध्ये नागांचा मुक्त संचार होत होता. एके दिवशी एक चेंचू आदिवासी लाकूड तोडण्यासाठी त्या घनदाट जंगलात भटकत होता. भटकता भटकता जेथे श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून बसले होते तेथे आला आणि तेथील वृक्षावर त्याने घाव घातला. तो घाव चुकून त्या वारुळावर बसला आणि समाधी स्थितीत बसलेल्या श्री नृसिंहसरस्वतींच्या मांडीपर्यंत पोहोचला. तेथून भळाभळा रक्त वाहू लागले. श्री नृसिंह सरस्वतींची शेकडो वर्षांची समाधी त्यामुळे भंगली आणि ते त्या वारुळातून स्वामी समर्थरूपाने बाहेर पडले.
   कर्दळीवनाची भूमी ही खरोखरच ध्यान, धारणा, तपश्चर्या, साधना करण्यासाठीच आहे. तेथील वातावरणात दिव्य लहरी आणि दैवी स्पंदने भरलेली आहेत. कर्दळीवन हे संपूर्ण जगातील फार मोठ्या आध्यात्मिक शक्ती केंद्रांपैकी एक अद्वितीय केंद्र आहे. या ठिकाणी आकर्षण-शक्ती फार जास्त प्रमाणात आहे. तेथे जाण्यासाठी आणि एकदा गेल्यावर पुन्हा जाण्यासाठी जबरदस्त ओढ लागते. कर्दळीवन ही देवभूमी आहे. तिथे जाण्यासाठी तीव्र साधना आणि उच्च योग आपल्या भाग्यात असणे आवश्यक आहे. कलियुगात प्रत्येकाने एकदा तरी कर्दळीवन यात्रा केली पाहिजे. श्रीस्वामी समर्थांच्या प्रत्येक भक्ताने श्रीस्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या कर्दळीवनास भेट देऊन जेथून श्रीस्वामी समर्थ आले तेथील दैवी स्पंदनाचा अनुभव घेतला पाहिजे.
    
       कर्दळीवनाचा इतिहास पाहताना कर्दळीवन या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे मोठे कोडे आहे. महाराष्ट्रभर कर्दळीवन हे नाव जरी रूढ झाले असले तरी आंध्र कर्नाटकात त्याला कदलीवन किंवा काडलीवन असे म्हटले जाते. एक मात्र खरे की कर्दळीवन या नावाचा आणि कर्दळीच्या झाडाचा काहीही संबंध नाही. कर्दळीवनात सगळीकडे चिखल आणि दलदल असून तेथे कर्दळीची झाडे फोफावली असल्याने त्याला कर्दळीवन म्हणतात हा समज चुकीचा आहे. श्रीनृसिंह सरस्वती ज्या बांबूच्या बुट्टीतून बसून कर्दळीवनात गेले, त्या बुट्टीला कर्दळीची पाने गुंडाळून आणि त्यावर फुले पसरून त्यांचे आसन तयार केले होते.
     कर्दळीवन हे घनदाट जंगलाने व्यापलेले आहे . वाटेमध्ये १०-१२ फूट उंचीची वारूळे आहेत,जंगला मधे हिस्त्र प्राणी सुद्धा आहेत.प्रकट स्थानाहुन दुपारी ४ वाजता आम्ही सर्व जण निघालो, दोन तासात मी सायं. ६  वाजता व्यंकटेश किनारा येथे पोहोचलो. त्यानंतर आमच्या ग्रुप चे एक-एक सदस्य येऊ लागले.आज आम्ही   व्यंकटेश किनारा येथे आप्पा स्वामी यांच्या आश्रमात  मुक्काम केला.
    १४  फेब्रुवारी रोजी श्रीशैल्यम च्या दिशेने बोटीने प्रवासास सुरुवात केली. 

जाताना आम्ही वाटेवरच असलेल्या अक्कमहादेवी मंदिराच्या दर्शनाला गेलो.

   साधारणता वीस-पंचवीस फूट उंचीची गृहा येथे आहे. ही गुहा निसर्गनिर्मित आहे.

सुरुवातीला उभे राहुन पुढे-पुढे जाता येते, 


नंतर वाकुन जावे लागते.येथे खुप आतवर एक शंकराची पिंड आहे, त्या ठिकाणी जायला खुप कष्ट घ्यावे लागतात.या येथे प्राणवायू ची कमतरता जाणवते. दर्शन घेऊन पुन्हा श्रीशैल्य कडे बोटीने प्रवास सुरु केला.तासाभरात आम्ही  श्रीशैल्यम येथे पोहचलो.
    श्रीशैल्यम येथून खाजगी वाहनाने आम्ही हैदराबाद येथे पोहचलो. हैदराबाद येथून ट्रेन ने  प्रवास करुन पुण्याला पोहचलो.
    कर्दळीवन परिक्रमा यात्रेमधे  वय वर्षे १४ ते वय वर्षे ७४  या सर्व वयोगटातील लहान-थोर सामील झाले होते.

Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर