इंदुरीचा दुर्ग /गढी
इंदुरीचा दुर्ग
आज रविवार अनंत चतुदर्शी.आज २३ सप्टेंबर २०१८ रोजी आम्ही डॉ.अजय इंगळे व मी सुशिल दुधाणे पहाटे ६.१५ वाजता ,
दुचाकी वाहनाने प्रवासास सुरुवात केली.
पुणे- मुंबई जुन्या मार्गाने तळेगाव च्या अलीकडे बेगडेवाडी फाट्यापासून पुढे इंदुरी गावात पोहचलो.
आत्तापर्यंत बरेच दुर्ग समुद्र किनाऱ्यावरील, जलदुर्ग, वनदुर्ग, गिरिदूर्ग अश्या अनेक गडांना भेटी दिल्या.आता भुईकोट दुर्गांना भेटी देण्याचा बेत आखला.आज अनंत चतुर्दशी असल्याने बाप्पाला निरोप देण्यासाठी लवकर घरी यायचे असल्याने आम्ही जवळच असलेल्या भुईकोट दुर्गाला भेटी देण्यासाठी निघालो.
तळेगाव - चाकण रस्त्यावर, इंदुरी गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी आहे. या गढीला इंदुरीचा दुर्ग म्हणून ओळखले जाते. छ.शाहू महाराजांचे सेनापती खंडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावा ला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. छ.शाहू महाराजांचे सेनापती खंडेराव दाभाडे यांनी हा दुर्ग बांधला होता.
छ. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे होते. इ.स.१७०५ ते १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांनी गुजरात प्रांतात धडक मारुन बडोदा पर्यंतचा प्रदेश काबिज केला. छ.शाहू महाराजांनी ११ जानेवारी १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्ती केली. इ.स.१७२०-२१ मध्ये खंडेराव दाभाडे यांनी इंदुरीची गढी बांधली, त्याला "इंदुरीचा दुर्ग " ,सरसेनापतींची गढी" या नावानेही ओळखले जाते.
खंडेराव दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंबर १७२९ मध्ये तळेगावच्या जून्या राजवाड्यात झाले. त्यांची समाधी इंद्रायणी नदी काठावरील बनेश्वर मंदिराजवळ आहे.
इंद्रायणी नदीकाठी किल्ल्याची भक्कम तटबंदी व बुरुज आजही पाहायला मिळतात. या तटबंदीच्या कडेकडेने इंदुरी गावात प्रवेश केल्यावर,
दुर्गाचे भव्य प्रवेशव्दार दिसते. हे आहे मुख्य प्रवेशद्वार .या दुर्गा चे वैशिष्ट्य म्हणजे या दुर्गा ला दोन प्रवेश द्वार आहेत, या दोन प्रवेश द्वाराची लांबी २६ फुट आहे.
प्रवेशव्दाराच्या दोनही बाजूस भव्य बुरुज आहेत.
किल्ल्याच्या दगडी बांधणीच्या प्रवेशव्दाराच्या कमानीवर दोनही बाजूस शरभ कोरलेले असून मधोमध गणपती कोरलेला आहे.
प्रवेशव्दाराच्या वरील बाजूस नगारखाना बांधलेला असून त्याचे बांधकाम मातीच्या वीटा वापरुन केलेले आहे.
प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत.या देवड्या च्या पाठिमागे खोल्या आहेत, पण आजमितीस आपणाला तेथे आत जाता येत नाही. या ठिकाणी आजमितीस तेथे स्थानीक लोकांनी जुन्या वापरात नसलेल्या दुचाकी गाड्या , तसेच टाकाऊ वस्तू येथे रचून ठेवल्या आहेत.
दरवाजातून आत शिरल्यावर उजव्या बाजूने गेल्यास आपण दरवाजाच्या वरचा बाजूस जातो.
येथे झरोके असलेला सुंदर हवामहाल आहे.
याच्या छतावर कोरीव काम केलेले आहे.
आजमितीस तेथे वर आपल्याला जाता येत नाही.जंगल खूप वाढले आहे.
दुर्गाच्या आवारात कडजाई देवीचे मंदिर आहे.
कड्यावर असल्यामुळे कडजाई हे नाव पडले आहे.
कडजाई देवी म्हणजे माता पार्वती.
मंदिराच्या परिसरात हत्ती शिल्प पहायला मिळते.याला गजमुख म्हणतात.
हत्ती शिल्पात हत्तिची सोंड जमिनीला टेकलली आढळते.जमिनीला टेकली म्हणजे लक्ष्मी मानली जाते, लक्ष्मी म्हणजे संपती.
ही जी दगडी शिल्पे दिसतात, ते आहेत समाधी.
समाधी नेमकी कोणाची हे ठाम पणे सांगता येत नाही.
तसेच दगडात कोरलेल्या नंदी व पिंड ही परिसरात नजरेस पडतात.
गडाच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वहाणारे इंद्रायणीचे पात्र व दुरवरचा प्रदेश दिसतो. नगार खाण्याच्या वरच्या भागातून आपणाला तळेगाव चा पंचकोश, घोराडेश्वर, विजयखिंड, कामशेत चा डोंगर,लोणावळा पर्यत चा परिसर, नवलख्या हा सर्व परिसर दिसतो.दुर्गाच्या तटबंदीची रूंदी ३ फूट आहे. बुरुजांचा फांजीपर्यंतचा भाग दगडांनी बांधलेला असून त्यावरील भाग वीटांनी बांधलेला आहे.तटबंदी व बुरुजांमध्ये जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे.आजमीतीस या गडाची अवस्था खूपच बिकट झाली आहे.गडाची तटबंदी बघण्यासारखी आहे, पन झाडे झुडपे खूप वाढल्यामुळे तटबंदी दिसत नाही.
Comments
Post a Comment