पन्हाळा ते पावनखिंड
पन्हाळा ते पावनखिंड ऐतिहासीक पदभ्रमंती
ता : पन्हाळा
जि : कोल्हापूर
मार्ग : पुणे-सातारा-कराड-पन्हाळा.
पन्हाळा हा महाराष्ट्र राज्यातील एक गड आहे.
सध्या पन्हाळा हे एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. याच पन्हाळा गडाला सिद्दी जोहरने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफिने स्वता:ची सुटका करुन घेऊन विशालगडाकडे कूच केली.बाजी प्रभू देशपांडे व शिवा काशिद यांनी या सुटकेत महाराजांना मदत केली.
पन्हाळ्याला पर्णालदुर्ग नावाने देखील ओळखले जाते. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा गड इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा गड आहे.
जुलै महिन्यात धारकरी आणि शिवभक्तांना ओढ लागते ती पन्हाळा पावनखिंड मोहिमेची.
स्वराज्याच्या अग्निकुंडामध्ये अनेक विरांनी आपली आहूती देऊन तो धगधगत ठेवला. म्हणूनच रांगड्या मराठ्यांनी आपल्या मनगटाच्या जोरावर अनेकांना आपल्या तलवारीचे पाणी पाजले. पन्हाळगडावर सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटून जाण्यासाठी शिवछत्रपती ज्या ऐतिहासिक मार्गाचा वापर करून काही तासाच्या कालावधीत घोडखिंडीत पोहचले.
शिवकाळात १२व १३ जुलै १६६० या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर प्रचंड रणकंदन घडले. रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्या शिवछत्रपतींच्या रक्षणार्थ शेकडो मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. इतिहासातील या देदीप्यमान घटनेच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विविध इतिहासप्रेमी संस्था-संघटनांच्या वतीने ‘पावनखिंड’ संग्राम दिनाचे आयोजन केले जाते. पन्हाळगड ते पावनखिंड अशी साहसी पदभ्रमंती मोहीम काढली जाते.
विजापूरचा सरदार सिद्धी जौहरने प्रचंड सैन्यासह पन्हाळगडाला वेढा दिला. यातून निसटून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी शिवछत्रपतींनी गनिमी काव्याची योजना आखली. भर पावसात रात्रीच्या अंधारात कालओघात दुर्लक्षित झालेल्या जुन्या मार्गाने विशाळगडाकडे जाण्यासाठी ते बाहेर पडले. आदिलशाही सैन्याला चकवा देण्यासाठी दोन वेगवेगळ्या मार्गांनी दोन पालख्या पन्हाळगडावरून बाहेर पडल्या. एका पालखीत स्वत: शिवराय तर दुसर्या पालखीत हुबेहूब त्यांच्यासारखी वेशभूषा केलेले शिवा काशीद होते. योजनेनुसार सर्व सुरू असताना शिवा काशीद यांची पालखी आदिलशाही सैनिकांना दिसली. त्यांनी शिवा काशीद यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मिळालेल्या वेळेचा पुरेपूर फायदा घेत शिवछत्रपतींनी विशाळगडाकडे कूच केली.
इकडे शिवा काशीद यांचा बनाव लक्षात येताच आदिलशाही सैनिकांनी त्यांना क्रूरपणे मारले. यानंतर त्यांनी शिवछत्रपतींचा पाठलाग सुरू केला. पांढरेपाणी येथे त्यांना गाठले. पांढरेपाणी ते पावनखिंड (तत्कालीन घोडखिंड) या सुमारे 6 कि.मी. परिसरात अटीतटीची लढाई झाली. यात बांदल-मराठा सैन्यातील रायाजी बांदल, बाजी व फुलाजी प्रभू देशपांडे, संभाजी जाधव, विठोजी काटे असे अनेक ज्ञात-अज्ञात मावळे कामी आले. स्वत: शिवछत्रपतींनीही विशाळगडच्या पायथ्याशी लढाई करत आपली सुटका करून घेतली.
असा आहे खडतर मार्ग...
पन्हाळगड ते विशाळगड या दोन किल्ल्यांमधील अंतर सुमारे ८० कि.मी. इतके आहे. पर्वतरांगेतील चढ-उताराच्या खडतर मार्गावरून अनेक ओढे-नाले, पाण्याचे प्रवाह, चिखल-काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग आणि जंगल पार करत अबालवृद्ध मोहीमवीर ही मोहीम फत्ते करतात. पन्हाळगड-मसाई पठार - कुंभारवाडी - खोतवाडी - मांडलाईवाडी, आंबेवाडी - करपेवाडी - पाटेवाडी - सुकामाचा धनगरवाडामार्गे पांढरेपाणी ते पावनखिंड असा मोहिमेचा मार्ग आहे.
आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरूपौर्णिमेच्या आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरीत्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते.
पौर्णिमेची रात्र. चंद्रप्रकाश असूनसुद्धा पावसाळी ढगांमुळे फारसे काही दिसत नव्हते. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. फाझलखानाला शिवरायांच्या मागावर पाठवले. पाठलाग सुरु झाला ... शिवाजी राजे पालखीचा गोंडा पकडून बसले होते. बाजींचा आवाज त्यांच्या कानावर येत होता. 'चला गनीम पाठीवर आहे.'
दर काही मिनिटांना पालखीचे भोई बदलत, वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत ते ६०० वीर विजेच्या वेगाने पळत सुटले होते. उदिष्ट एकच होत - विशाळगड़. हातात नंग्या तलवारी घेउन बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते. मागचे आणि पुढचे हेर बित्तंबातमी राजांकड़े पोचवत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती. क्षण अन क्षण आता महत्त्वाचा होता.
अखेरीस १२ जुलै १६६० चा दिवस उगवला. हि आषाढ पौर्णिमा होती. गुरुतुल्य सह्याद्रीचाच आता विश्वास होता. सिध्दीला शरण येण्याची तयारी दर्शविल्यामुळे इतक्या दिवस डोळ्यात तेल घालून पहारा करणारे सिध्दीचे सैनिक सुस्तावले होते. रात्री नउ वाजता महाराज पन्ह्याळ्यावरील राजदिंडीच्या वाटेने निघाले.
याच भागात पुसाटी बुरुजाकडून येणार्या डोंगर धारेला मसाई पठाराची डोंगरसोंड मिळाली होती. साहजिकच या चिंचोळ्या डोंगरधारेमुळे या भागात पहारा कमी होता. ईथूनच महाराज आणि हिरडस मावळातील ( सध्याच्या भोरचा आसपासचा भाग) सहाशे मावळे निघाले. रोखल्या श्वासानेच पहारा ओलांडून मसाईचे पठार गाठले पण सिध्दीच्या सैनिकांना चाहुल लागलीच. अजुन एक पालखी लगबगीने पुढे आली आणि यात आणखी एक शिवाजी बसला. सापडल्यानंतर काय होणार याची स्पष्ट कल्पना असूनही साक्षात मृत्युच्या पालखीत बसणारा तो वीर होता, पन्हाळ्याच्याच कुशीतल्या एका गावाचा, नेवापुरचा, "शिवा काशिद".
इकडे शिवाजी पळाला हे समजल्यानंतर चिडलेल्या जोहरने स्वताच्या जावयाला, सिध्दी मसुदला पाठलागावर सोडले. शिवा काशिदची पालखी मसुदला सापडली, पण हा भलताच शिवा आहे हे कळताच मसुद्ने शिवाच्या छातीत भाला खुपसून ठार केले. अजुन एक प्राण स्वराज्य कामी खर्ची पडले. त्वेशानेच मसुद पुन्हा महाराजांच्या पाठलागावर निघाला. आणि पांढरपाणी गावापाशी त्याला लांबवर महाराजांचे सैन्य दिसू लागले.
नाजुक परिस्थिती पाहून बाजीप्रभू देशपांडेनी महाराजाना विशाळगडाकडे तीनशे सैन्य घेऊन जाण्यास सांगितले आणि केवळ तीनशे सैन्यानिशी ते, फुलाजी प्रभू व जयसिंग जाधव मसुदचा मुकाबला करण्यास सिध्द झाले. महाराज विशाळगडापाशी पोहचले तर तिथे जसवंतराव पालवणीकर व सुर्यराव सुर्वे राहु, केतु सारखे आडवे आले. त्यांचे पारिपत्य करुन महाराज सधारण दुपारी दोन वाजता गडावर पोहचले आणि ईशारतीच्या तोफा झाल्या. पण तोपर्यंत तिकडे बाजीनी शर्थीने घोडखिंड अडवून घरली होती. बरेचसे सैन्य कामी आले होते, पण अखेरीस तोफेचा आवाज एकून बाजीनी आपले प्राण सोडले आणि घोडखंड पावन झाली.
*"ज्या वाटेवरून चालणे मुश्कील आहे, त्या वाटेवरून आमचे मावळे पळत गेले, ज्या पावन-खिंडीत उभा राहणे मुश्कील आहे, तिथे आमचे मावळे लढले*
पन्हाळा ते पावनखिंड
या ऐतिहासिक पदभ्रमण साठी पन्हाळा गडाच्या जवळच असलेल्या फुटक्या नंदीपासून सुरुवात करावी.
अतिशय दाट जंगला तून आपले मार्गक्रमण सुरू होते.
सुरूवातीला थोडा उतार लागतो, नंतर सपाटी मार्गक्रमण सुरू होते.जवळपास पाऊण तास अंतर व सव्वा दोन किलोमीटर चालून गेल्यावर आपण एक छोट्याश्या तूरूक वाडी येथे पोहचतो.या येथे थोडे पाणी पिऊन पुढे मार्गक्रमण चालू ठेवावे.येथुन पुढे आपण साधारणतः ८०० मीटर चालल्यावर म्हाळुंगे या वस्तीवर पोहचतो.येथुन पुढच्या वस्तीवर पोहचण्यासाठी अंतर खुप असल्याने या वस्तीवरूनच आपल्याकडील रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घ्याव्यात.येथुन पुढे जर आपण पावसाळ्यात ही भ्रमंती करीत असाल तर चिखलातून वाट काढत जावे लागते.पाऊस जास्त प्रमाणत पडत असल्यास खुप चिखल होतो या भागात.
येथून पुढची वाट खूपच खडतर अशी आहे.
जवळपास दोन तास व ८ किलोमीटर चे पदभ्रमण करून आपण कुंभारवाडी येथे पोहचतो.येथून पुढे ३ किलोमीटर व साधारणतः पाऊण तासात आपण खोत वाडी या वस्तीवर पोहचतो.आपणाला या मार्गावरील ज्या वस्त्या लागतात, त्या सर्व वस्त्यांवर घराच्या दारापाशी पाईप द्वारे आलेले पिण्याच्या पाण्याचे नळ प्रत्येक वस्तीवर नजरेस पडतात.येथून पुढे तास-सव्वा तास व ४ किलोमीटर चे पदभ्रमण करून आपण तळेवाडी येथे पोहचतो.या येथे थोडी विश्रांती घेऊन अवघ्या ६०० मीटर अंतर असलेल्या मांडलाई या वस्तीवर पोहचतो.दोन किलोमिटर चालून गेल्यावर आपणाला धनगर वाडा लागतो.येथून पुढे मात्र आपणाला एकदम सपाटी व खुप दूरवर असलेले पठार चालू होते ,
यालाच मसाई पठार म्हणतात.
थोड्याच वेळात आपल्याला मसाई देवीचे मंदिर लागते.या ठिकाणी देवीचे दर्शन घेऊन आपण पुढे मार्गक्रमण चालू ठेवावे.विस्तीर्ण असे हे पठार आहे.पाऊस जास्त असल्यास व धुके ही असल्यास वाट दिसेनाशी होते.वाऱ्याचा जोर ही खुप असतो या ठिकाणी.पठार काही संपता संपत नाहि , असे आपल्याला जाणवायला लागते.पठार चालत असताना मार्गावर आपणाला अजुन,
एक मसाई देवीचे मोठे मंदिर लागते.
या ठिकाणी दर्शन घेऊन थोडी पेट पुजा करावी.जवळपास साडे पाच किलोमीटर चे मसाई पठार पार करून आपण आंबेवाडी येथे पोहचतो.हे भरे मोठे पठार पार करताना महाराजांना याचा खुप उपयोग झाला होता.शिवा काशिद जेव्हा महाराजांच्या वेशात दुसऱ्या पालखीत बसून जात होता, तेव्हा महाराजांना या पठारावरून लवकर व कमीत कमी वेळात पुढे जाण्यास मदत झाली.
आंबेवाडी येथे आपण जवळपास ८ तास व २५ किलोमीटर चे पदभ्रमण करून पोहचतो.
या ठिकाणी आपण मुक्काम करावा.या वस्तीवर घरे ही खुप आहेत.त्यामुळे येथे जेवणाची व राहण्याची सोय होऊ शकते.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून सर्व नित्यकर्म उरकून पुढील वाटचाल सुरू करावी.आज मात्र आपणाला बऱ्याच संकटांना सामोरे जात वाटचाल करावी लागते.जर आपण पावसाळ्यात या ठिकाणी येत असाल तर,
या वाटेवर लहान-मोठे अनेक ओढे पार करावे लागतात.
काही ठिकाणी तर झाडाला रोप लावुन ओढा पार करावा लागतो.येथुन पुढे पावणे चार किलोमीटर व साधारणतः सव्वा ते दीड तास चालून आपण रिंगेवाडी येथे पोहचतो.येथुन पुढे अवघ्या ५०० मीटर वर माळेवाडी लागते.येथुन पुढे आपणाला महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पाटेवाडी ही वस्ती जवळपास दीड किलोमीटर अंतर पार केल्यावर लागते.येथून पुढे चार किलोमीटर वर सुकाम्याचा धनगर वाडा लागतो.येथून पुढे तीन किलोमीटर वर म्हसवडे ही वस्ती लागते.जवळच एक किलोमीटर पदभ्रमण केल्यावर माण चा धनगर वाडा लागतो.माण चा धनगर वाडा सोडून पुढे गेल्यावर उतार संपताच एक किलोमीटर वर आपण पांढरे पाणी च्या फाटय़ावर पोहचतो.येथून पुढे साधारणतः ७०० मीटर वर आपल्याला रस्त्याच्या उजव्या बाजूला ' शिवकालीन मार्ग ' असा फलक दिसतो.या ठिकाणी अवश्य जावे.येथुन थोडी फार जंगलाची वाट सुरू होते, प्रथम आपल्याला असे वाटते कि या मार्गावर जाऊन उपयोग नाहि , परंतु असे वाटत असले तरी चालत रहावे.थोड्याच वेळात आपल्याला फरासबंदी मार्ग लागतो.
या ठिकाणी एक फलक लावलेला आहे.
' बाजी आणी शिवराय यांची शेवटची भेट याच आसमंतात झाली'
या च ठिकाणी गनिम मागे पाठ सोडत न्हवता , त्यामुळे बाजी प्रभू देशपांडे यांनी महाराजांना सांगितले कि आपण पुढे निघावे.या ठिकाणी मन गहिवरून येते.हे ठिकाण पाहुन तसेच पुढे निघावे. ७०० मीटर पुढे पांढरे पाणी हे गाव लागते.पांढरे पाणी या गावात आपण पन्हाळा पासून जवळपास ४० ते ४१ किलोमीटर चे पदभ्रमण करून पोहचतो.
या गावात महाराजांनी गावकऱ्यांना बांधून दिलेली विहिरी आहे.
या विहिरीचे पाणी गोड आहे.या ठिकाणी पाणी पिऊन, पुढे ६ किलोमीटर असलेल्या पावनखिंड च्या दिशेने पायी किंवा वाहनाने जावे.सहा किलोमीटर डांबरी रस्ता असल्याने चालताना पाय दुखू लागतात, त्यासाठि वाहनाने गेलेले बरे.बरेच जन फाट्यावर उभे असलेल्या वाहनाने थेट पावनखिंड च्या दिशेने निघतात, त्यांना पांढरे पाणी या गावात असलेली ही माहीत पडत नाहि.पावन खिंड येथे गेल्यावर खिंड अवश्य पहावी.दगडांच्या पायरी मार्गाने साधारणतः ४०० ते ५०० मीटर वर खिंड आहे.खाली उतरायला लोखंडी जिना आहे, या ठिकाणी सावध पणे उतरावे.पावसाळ्यात या ठिकाणी खाली उतरणे धोक्याचे आहे.योग्य ती खबरदारी घ्यावी.
स्मारक स्तंभाचे मनोभावे दर्शन घ्यावे.
याच ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे यांची प्राणज्योत मावळली.तसेच अनेक मावळे स्वराज्यासाठी कामी आले.या ठिकाणी मन भरून येते व डोळ्यातून अश्रू येतात.हे ठिकाण पाहुन झाल्यावर येथुन पुढे १६ किलोमीटर आपल्या खाजगी वाहनाने विशाळ गडाकडे मार्गस्थ व्हावे.
सूचना :
१) ही ऐतिहासिक पदभ्रमण मोहीम आपण बारमाही करु शकतो.उन्हाळ्यात मात्र उन्हाची झळ जास्त लागते.
२) छत्रपती शिवाजी महाराज या मार्गाने जुलै महिन्यात गेले होते, त्याचे औचित्य साधून बरेच ट्रेकर्स संस्था व ट्रेकर्स मंडळी जुलै मधे या मोहिमेचे आयोजन करतात.
३) पावसाळ्यात या भागात पाऊस जास्त पडल्या नंतर ओढे-नाळे भरभरून वाहत असतात , अश्या वेळी वाहणाऱ्या ओढ्यातून मार्ग काढत जावे लागते.अश्या वेळेस आपणाकडे १०० फुट रोप जवळ बाळगावा.
४) मोहिमेची सांगता पावन खिंड येथे पूर्ण करु शकता.पावन खिंड येथुन विशाळगडाकडे गाडीने प्रवास करून जाऊ शकतात.
वरिल वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
Comments
Post a Comment