अलंग, मदन, कुलंग (AMK) एक अविस्मरणीय भटकंती.
अलंग, मदन, कुलंग(AMK) एक अविस्मरणीय भटकंती.
सह्याद्रीच्या मावळ्या कडून गडांचे शतक पूर्ण ......
आज आम्ही एका दिवसात दोन गड करण्याचा बेत आखला , मदन व अलंग गड.
आत्तापर्यंत मी ९८ गडांची भटकंती केली होती, लक्ष्य होते गडांचे शतक करण्याचे. तो योग आज आला. भगवान चवले (एवरेस्ट विर) यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही AMK करण्यासाठी निघालो.
सह्याद्री च्या प्रेमात पडलो कि मन एकदम हरवून जाते, फक्त सह्याद्री चा विचार मनात घरं करून राहतो, कारण ही तसेच आहे, माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज या सहयाद्रीच्या अंगाखांद्यावर खेळून लहानाचा मोठा झाला, तसेच राजेंबरोबर असलेले त्यांचे सखे सोबती सुद्धा या सह्याद्रीवर अतोनात प्रेम करीत असे.महाराज फक्त आणि फक्त रयतेचा विचार करीत असे. राजे आग्रा कैदेत असताना तेथून ते निसटले , आग्रा ते राजगड अंतर बरेच असल्या कारणाने व वाटेत शत्रूचा धोका हि खूप असल्याकारणाने त्यांनी शंभू बाळाला मथुरेत ठेऊन ते राजगडाच्या दिशेने रवाना झाले, किती मोठा त्याग त्यांनी केला.तानाजी मालुसरे यांनी सुद्धा स्वराज्यासाठी स्वतःचे बलिदान दिले, या सह्याद्रीचे जो प्रेमात पडतो तो काहीही करू शकतो.
अरे पण हे काय आम्ही फक्त ट्रेकर्स मंडळी च याच्या प्रेमात पडतो हे बरं नाही! आपणही किमान महिन्यातून एकदा तरी सह्याद्री रांगेत फिरायला या, आपण नक्कीच याच्या प्रेमात पडाल याची मला खात्री आहे.फक्त तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेला शत्रू .... आळस याला बाहेर काढणे गरजेचे आहे.
तर चला मग आळस या शत्रूला झटकून टाका व या आमच्या बरोबर सह्यादी त भटकायला.
आलात तर तुमच्या बरोबर नाहीतर तुमच्या शिवाय....
शुक्रवार १५ डिसेंबर २०१७ रोजी आम्ही ३२ जण रात्री १० वाजता पुण्याहून निघालो.पहाटे ४ वाजता आंबेवाडी येथे पोहचलो.
नित्यकर्मे आटोपून पहाटे ५.३० वाजता मदन गडाच्या दिशेने निघालो.
आज माझा ९९ वा गड सर होणार यामुळे मी जाम खुश होतो.कारण ही तसेच आहे, गडांचे शतक करायचे तर काही तरी हटके करायचा हा संकल्प मी केला होता, व सह्याद्रीतील अत्यंत कठीण समजणाऱ्या गडावर स्वार होण्यासाठी सज्ज झालो,व सकाळी ७.४० वाजता गुहेपर्यंत पोहचलो.थोडी न्याहारी केली व पुढे निघालो.
पहिले ४० फुटाचे रॉक पॅच क्लाइंबिंग केले,
व पहिल्या दरवाज्यापाशी पोहचलो.
सकाळी ९.३० वाजता मदन गडाच्या माथ्यावर पोहचलो.
९९ वा गडाची भटकंती पूर्ण झाली. फोटो शूट केले, गड फिरून नंतर परत गुहेच्या वाटेला लागलो.गुहेत पेटपूजा आटोपली व जाताना गुहेत ठेवलेल्या बॅगा घेऊन अलंग गडाच्या दिशेने निघालो.आता माझी स्वप्नपूर्ती पूर्ण होण्याची वेळ आली. शंभराव्या गडाला गवसणी घालायची व तो ही अतिशय अवघड. भले-भले ट्रेकर्स ही या येथे शरणागती पत्करतात. असा गड माझ्या कडुन पादाक्रांत होणार या विचाराने मी आनंदित झालो. एक ग्रुप क्लाइंबिंग करत असल्याने आम्हाला येथे थोडी विश्रांती घ्यावी लागली. वेळ जास्त वाया जात होता त्यामुळे भगवान ने दुसरा रोप लावला व पुली च्या साहाय्याने सर्वांच्या बॅगा गुहेपर्यंत खेचून घेतल्या. त्या पाठोपाठ इतर सहभागी ट्रेकर्स ही ७० ते ८० फुटांचा हा खतरनाक व उभा कडा पार करत वर पोहचले.
दुपारी २.४५ वाजता अलंग गडाच्या माथ्यावर आम्ही पोहचलो.
खूप दिवसांची स्वप्नपूर्ती पुर्ण झाली. गडांचे शतक पुर्ण झाले.
अलंग गडावर मुक्काम करण्यासाठी दोन प्रशस्त मोठ्या गुहा आहेत.
एका गुहेमध्ये आम्ही काही जण विराजमान झालो. अजून आमचे बरेच सदस्य येणे बाकी होते, तोपर्यंत गुहेत थोडी विश्रांती घेतली.
व नंतर संपूर्ण गड फेरी मारली.
त्यानंतर आमच्या वल्लभ साथीदारांनी स्वादिष्ट खिचडी भात केला.सर्वाना जाम भुख लागल्या होत्या, व मलाही आज शनिवारचा उपवास असल्याने मी खिचडी भातावरच उपवास सोडला.व आजचा मुक्काम अलंग गडावरिल गुहेत केला.
दुसऱ्या दिवशी रविवारी पहाटे लवकर उठून कुलंग गडाला भेट द्यायची असल्यामुळे लवकर झोपी गेलो.
मदन गड
अलंग , मदन व कुलंग हे तीन गड सह्याद्रीच्या कुशीत अगदी कळसुबाई शिखराच्या शेजारी उभे आहेत, तिघांची उंची जवळपास कळसुबाई शिखराएवढीच.मदनगड हा आकाराने छोटा गड आहे, याच्या माथ्यावरून सभोवताली अलंग,कुलंग,कळसुबाई,रतनगड, आजोबाचा डोंगर, हरीचंद्रगड, भंडार दरा धरण परिसर दिसतो.अकोल्यापासून जवळपास ६० किलोमीटर वर मदन गड आहे, चढाई साठी अत्यंत कठीण समजणारा हा गड आहे.हा गड बराच प्राचीन आणि तेवढाच दुर्गम आहे.गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, दोन्ही मार्ग अलंग आणि मदन च्या खिंडीतून जातात. एक तर आंबेवाडी व दुसरा घोटी मार्गे, गडावर एक गृहा आहे. यात ३० ते ३५ जण सहज झोपू शकतात.गडाचा माथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.
अलंग गड
उंची ४५०० फूट आहे, ता: अकोले, जिल्हा: अहमदनगर. घनदाट जंगल व विरळ वस्ती मुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे, गडाचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठार च आहे, दोन गुहा आहेत, पाण्याची जवळपास ११ टाक्या आहेत, याच्या पूर्वेला कळसुबाई, पट्टागड, बीतंन गड, उत्तरेला हरिहर, त्र्यंबक गड, अंजनेरी, तर दक्षिणेला हरीचंद्रगड, आजोबा गड, खुट्टा सुळका, रतनगड, कात्राबाईचा डोंगर दिसतो.
आजच्या ट्रेकमध्ये आम्हांला मोलाची साथ लाभली, भगवान चवले, सुनील बलकवडे, तुषार खटा ल, किरण गावडे, शुभम हिंगे यांच्यामुळे आम्ही सह्याद्रीतले अत्यंत अवघड समजले जाणारे असे गड सर करू शकलो. या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
या ट्रेकमध्ये वय वर्ष १४ ते ७० या सर्व वयोगटातील लहान-थोरांचा समावेश होता.
१६ डिसेंबर ला आम्ही मदन ,अलंग गड पादाक्रांत केले. १७ डिसेंबर वार रविवार, पहाटे सर्व नित्यकर्मे उरकून,
६.४५ वाजता आम्ही अलंग गड उतरायला सुरुवात केली.
दोन ठिकाणी रॅपलिंग करित खाली उतरलो. नंतर आम्ही कुलंग गडाच्या दिशेने वाटचाल सुरु केली.
थोड्याच वेळात आम्ही खिंडीपाशी पोहचलो,
येथून पुढे चढनीची वाट सुरु झाली. २० ते २५ मिनिटे चालल्यानंतर खूपच त्रिव्र उतरण चालू झाली, वाट खूप घसरडी असल्याने उतरण खुप त्रास दायक होत होती.
झाडाला रोप बांधल्या नंतर उतरणे खुप सोपे झाले.
नंतर मजल-दर मजल करीत
आम्ही कुलंग च्या पायथ्याशी पोहचलो.
जवळील सर्व सामान, बॅग्स पायथ्याशी ठेवल्या व गडाच्या दिशेने निघालो.
सुरुवातीपासूनच कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्या, एकदम उभी चढण,
तासाभराच्या अंतराने आम्ही गडावर पोहचलो.
संपूर्ण गड फिरलो.
गडावर १० ते १२ पाण्याच्या टाक्या आहेत.
गडावर खूप मोठे पठार आहे,
संपूर्ण गड फिरायला एक तास लागतो.
गड फेरी पुर्ण करुन,
नंतर आम्ही गड पाय उतार झालो.गडावर येताना ज्या पायऱ्या चढून आलो, त्या आता उतरणे खूप कठीण होत होते, तासाभराने आम्ही ज्या ठिकाणी बॅगा ठेवल्या होत्या त्या ठिकाणी पोहचलो. व नंतर परत आंबेवाडी च्या दिशेने निघालो, खूपच त्रीव उतार चालू झाला.वाट खूपच घसरडी व भुसभुशीत माती असल्याने उतरणे कठीण जात होते. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आम्ही आंबेवाडी येथे पोहचलो. विठ्ठल केंकरे यांच्या घरी जेवण आटोपून, सायं.५ च्या सुमारास पुण्याच्या दिशेने गाडीने प्रवास सुरु केला.
Comments
Post a Comment